Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सातारा-देवळाईकरांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी मिळणार?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दक्षिणेला असलेल्या सातारा - देवळाई व बीड बायपास भागातील १२ जलकुंभाचे भूमिपूजन सोहळा १ नोव्हेंबर २०२१ रोजी आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला होता. यावेळी दीड वर्षात सातारा - देवळाईकरांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळेल, असे आश्वासन त्यांनी भूमिपूजन प्रसंगी सातारा - देवळाईकरांना दिले होते.‌ मात्र, योजनेच्या चार वर्षात एकाही जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे.

दुसरीकडे मुख्य व अंतर्गत जलवाहिनींचे काम देखील अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या भागातील दीड लाख नागरिकांना नळाचे पाणी कधी पाजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनीसाठी सातारा - देवळाईतील रस्त्यांची कामे दुरुस्तीसाठी रखडलेली आहेत. सोबतच बरिच विकासकामे रखडली आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला अपयश आले आहे.

ओव्हरलोडच्या नावाखाली या भागात अघोषित लोडशेडींग सुरू आहे. त्यामुळे खाजगी टँकरधारकांकडून लाईट आली तर पाणी मिळेल, असे ऐकूण घेण्याची नामुष्की सातारा -  देवळाई व बीड बायपासकरांवर ओढवली आहे. याकडे आमदार शिरसाट आता तरी लक्ष देतील काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

छत्रपती शहरातील २७४० कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेत सातारा-देवळाईचा समावेश करण्यात आला. दरम्यान या भागात सुधाकरनगर परिसरातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत तसेच सुधाकरनगरलगत डोंगरालगत, आमीरनगर, सातारा गावातील मल्हारगडाच्या पायथ्याशी, सातारा पोलिस स्टेशनच्या पाठीमागे संग्रामनगर, देवळाई परिसरातील म्हाडा काॅलनी, देवळाई गावातील म्हाडा टेकडीलगत, एम. एच. २० हाॅटेलच्या पाठीमागे असलेले आनंदनगर, एशियाड काॅलनी, सातारा तांडा गट क्रमांक - २२८ आदी भागात तब्बल १२ मोठे जलकुंभ उभारण्यात येत आहेत.

यापैकी अद्याप एकाही जलकुंभाचे काम करण्यात आलेले नाही. तसेच अंतर्गत व मुख्य जलवाहिनीचे काम देखील ५० टक्केही पूर्ण झाले नाही. दरम्यान १ नोव्हेंबर २०२१ रोजी साताऱ्यातील नाथ टॉवरजवळ बांधण्यात येणाऱ्या दुसऱ्या जलकुंभाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या भागातील नागरिकांना येत्या दीड वर्षात नळाचे पाणी मिळेल, असे दिलेले आश्वासन फोल ठरले. याउलट नागरिकांना पैसे देऊनही खाजगी टॅंकरचे पाणी मिळत नसल्याची बोंबाबोंब सुरू आहे.

दुसरीकडे चार महिन्यांपूर्वीच बोअर आणि विहिरी आटल्याने या भागात पिण्याची व सांडपाण्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यात ओव्हरलोड होताच सारखी लाईट जात असल्याने खाजगी टॅंकर चालकांकडून लाईट असेल, तर पाणी मिळेल, असे सांगण्यात येत असल्याने सातारा - देवळाईसह बीड बायपासकरांवर "पाणी पाणी रे" म्हणण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात या भागातील अनेक लोक शहरात घर भाड्याने घेऊन राहत असल्याची खंत देखील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.

सातारा देवळाई व उर्ववरीत बीड बायपास काही भागाचा ९ वर्षांपूर्वी मतांचा टक्का वाढविण्यासाठी महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला.‌ येथील नागरिकांना अद्याप नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय झालेली नाही. काही प्रमाणात नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणि तत्कालीन सिडको प्रशासनाच्या अखत्यारीत झालर क्षेत्रात असताना मिळालेल्या विकास निधीतून व जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तसेच नाबार्डच्या अर्थसहाय्यातून झालेले निकृष्ट रस्ते देखील जलवाहिनी आणि मलनिःसारण वाहिनीसाठी कुरतडण्यात आले.

यात जलवाहिनीचा कंत्राटदार आणि मलनिःसारण वाहिनीचा कंत्राटदार अंकिता इंटरप्रायझेसकडून बहुतांश रस्त्याची माती करण्यात आली आहे. त्यात सातारा आणि देवळाई परिसरातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात नागरिकांच्या नशीबी दगडधोंडेच वाटेत येतात.

या भागातील  नागरिकांना हक्काचे घर आणि पाण्याची सुविधा देखील नाही. या भागातील गुंठेवारी व कर यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक बैठक घेऊन देखील प्रश्न सोडविता आला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना २७४० कोटींवर पोहोचल.

या योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे काम सुरु आहे. जेव्हीपीआर या हैदराबाद येथील कंपनीला जलवाहिनीचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने चार वर्षांपूर्वी सातारा - देवळाईसह बीड बायपासकरांसाठी सुरूवातीला आठ ठिकाणी जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेतला. तद्नंतर या भागातील वाढत्या वसाहतीचा आवाका पहाता चार जलकुंभ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

चार वर्षांपूर्वी जलकुंभाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, या योजनेअंतर्गत सातारा - देवळाईत एकाही  जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतीपथावर नसून कंत्राटदार मनुष्यबळ मिळत नसल्याचे तर कधी निधी नसल्याचे म्हणत जलकुंभाचे काम सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

या भागात जलवाहिनीचे काम देखील मागील चार वर्षांत ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात झाले आहे. दरम्यान जलवाहिनीसाठी खोदून ठेवलेले रस्ते आणि खड्डे, आरपार नाल्यातून सातारा - देवळाईकरांना वाहने काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या  योजनेतून नागरिकांना पाणी पाजणार की, जीव घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

या योजनेअंतर्गत सुमारे सातारा - देवळाईकरांसाठी ९० हजार घरगुती नळजोडण्या दिल्या जातील, असे गृहीत धरून काम सुरू करण्यात आले होते.