छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील १६ वॉर्डांची तहान भागिणाऱ्या हर्सूल तलावात वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी केली होती.
तलावाची ३६४ एकर जागा असून, या जागेत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पॅनेल बसविण्यासंदर्भात त्यांनी विविध कंत्राटदार कंपन्यांशी चर्चा देखील सुरू केली होती. तसेच तलावात बोटिंगही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच खाम नदी पात्रातील दुरवस्था झालेल्या तीन बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून पुढाकार घेतल्याचा दावा केला होता.
मात्र, ना बोटींग सुरू केली, ना वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला, ना बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली. एकूणच छत्रपती संभाजीनगरकरांसाठी लोकप्रतिनिधींसोबत अधिकारी देखील कशा पद्धतीने आश्वासनांचा पाऊस पाडतात, दुसरीकडे अंमलबजावणीचा कसा दुष्काळ असतो, ही बाब यातून समोर येते.
जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सूल तलाव कोरोना काळात २०२० आणि २०२२ मध्ये ओव्हरफ्लो झाला होता. ३० फूट क्षमता असलेल्या तलावात ३० फुटांहून अधिक पाणी बंधाऱ्याच्या भिंतीवरून सांडव्याद्वारे खामनदीच्या पात्रात सोडण्यात आले होते. दरम्यान शहराच्या पाण्याची नाथसागरावर मदार असली तरी काही वर्षांत हर्सूल तलावाने महापालिकेला दिलासा दिला होता. तलावात जलसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने तलावातून दररोज आठ ते नऊ एमएलडी पाणी उपसा केला जात असे. त्यामुळे जायकवाडीवरील पाणी योजनेवरचा ताण काहीसा कमी झाला होता.
जायकवाडी धरणातून शहरापर्यंत पाणी आणताना महानगरपालिकेला अनेक ठिकाणी पंपिंग करावे लागते. त्यामुळे वीज कंपनीला तब्बल सहा ते सात कोटी रुपये वीज बिल भरावे लागते. परिणामी राज्यातील सर्वाधिक महाग पाणी छत्रपती संभाजीनगरकरांना घ्यावे लागत आहे.
पाणी पुरवठा योजनेवरील वीज बिल कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी जायकवाडी धरणात सौर ऊर्जेचे पॅनेल बसवून वीज निर्मिती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही.
दरम्यान पांण्डेय आणि कराड यांनी हर्सूल तलावात हा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. यासंदर्भात पांण्डेय यांनी, हर्सूल तलावातून दररोज १० वॅट वीज निर्मिती झाल्यास महापालिकेच्या वीज बिलाचा खर्च कमी होईल असा दावा करत, त्यानुसार कराड यांच्या आढावा बैठकीत देखील या प्रकल्पावर सकारात्मक चर्चा होती. वीज निर्मितीसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यासोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटिंगही सुरू करण्यात येईल, असे पांण्डेय यांनी सांगितले होते.
हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर खाम नदीला पूर येतो. हे पाणी अडविण्यासाठी खाम नदीपात्रात जुने तीन बंधारे होते. मात्र त्याची पडझड झाल्याने नदीपात्रात पाणी थांबत नाही. या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून नदीत कायम पाणी राहील, यासाठी बंधारा दुरुस्तीसाठी त्यांनी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे म्हणत हा निधी देखील सीएसआरमधून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पांण्डेय यांनी घोषित केले होते. पण त्याचेही पुढे काही झाले नाही. परिणामी खामनदीला पुराचा धोका कायम आहे.