Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सिद्धार्थ उद्यानातील 'या' प्रकल्पामुळे सीबीएस मार्गावर वाहतूक कोंडी; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने काही वर्षांपुर्वी सिध्दार्थ उद्यानासमोरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंची मोक्याची जागा बीओटी प्रकल्पासाठी दिली होती. विकासकाने त्यात ८० गाळे उभारून भव्यदिव्य व्यापारी संकुल उभारले. मात्र गाळेधारकांनी थेट प्रवेशद्वारासमोरच फूटपाथ आणि खुल्या जागेचे खाऊ गल्लीत रुपांतर केले आहे. तसेच येथे येणारे खवय्ये थेट रस्त्यावरच वाहने उभे करत असल्याने सीबीएस मार्गावर वाहतुकीला अडथळा होत आहे. याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर सिडको - हडकोत वाहतुकीला कुठलाही अडथळा नसताना रहिवाशांच्या दारासमोरील ओटे, फरशा शेड काढून टाकण्यात आले. बहुतांश व्यवसाय असुरक्षित केले. कॅनाटमधील सावली व पावसाच्या पाण्यापासून सुटका व्हावी यासाठी फुटपाथवरील शेड काढण्यात आले. यामुळे ग्राहक व्यापाऱ्यांना आता उन - पावसाच्या त्रासात भर पडली आहे. अतिक्रमणाच्या कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र महानगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी थेट सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सीबीएस मार्गावरील फुटपाथ गायब करून थेट आता मोकळ्या जागेत टेबल, खुर्ची आणि छत्र्या ठोकल्या, रस्त्यावरच खवय्ये गाड्या पार्क करतात.

एकीकडे सिडको - हडकोत दमदार कारवाई करायची आणि स्वतःच्या जागेतील बीओटी तत्त्वावर दिलेल्या व्यापारी संकुलातील अतिक्रमणांकडे महानगरपालिका सोयीस्कर डोळेझाक करत आहे. उद्यानाबाहेरील प्रवेशद्वाराच्या समोरून येणाऱ्या चिमुकल्यांच्या सहलींना देखील अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथ गायब केल्याने जेष्ठ नागरिक प्रवाशांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. लगतच सीबीएस असल्याने दिवसभरातून हजारो बसेस येथूनच वळण घेत स्थानकात आत - बाहेर येत असतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.

सिध्दार्थ उद्यानात मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. तसेच शहरातील हे एकमेव मोठे उद्यान असल्याने देश - विदेशातील पर्यटकांसह उद्यान - प्रेमींची मोठी गर्दी होते. मात्र उद्यानाच्या प्रवेशद्वारातच तिकीट खिडकीच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणधारकांची बजबजपुरी वाढल्याने नव्याने  झालेल्या या व्यापारी संकुलात उद्यान प्रेमींसह सीबीएस मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना प्रभावित केले आहे.

महानगरपालिकेने काही वर्षांपुर्वी सिद्धार्थ उद्यानाची मुख्य रस्त्यालगतची जागा बीओटी प्रकल्पासाठी देण्यापूर्वी औरंगाबाद एकात्मिक विकास योजनेतून सन -२००६ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याचे डांबरीकरण केले होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत तीन मीटर रूंदीचा मोठा फुटपाथ तयार केला होता. त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र तद्नंतर कित्येक वर्षे रस्त्याचे बांधकाम रखडले.

जी - २० दरम्यान या रस्त्याचे भाग्य उजळले. तसेच रस्त्यालगत याच फूटपाथला चिटकून असलेल्या भगदाडे पडलेल्या भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली. पण खिंडार पडलेल्या अतिक्रमित फुटपाकडे कारभारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आता अगदी वर्दळीच्या सिध्दार्थ उद्यानासमोरील बांधलेल्या व्यापारी संकुलाने फूटपाथच गिळल्याने अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून मार्ग काढताना अडचणींचा समाना करावा लागतो आहे.