Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : शहराच्या सिडको एन - ८ येथील बाॅटनिकल गार्डन, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, यासोबतच सिध्दार्थ उद्यान व मजनुहिल परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानापाठोपाठ आता सिडकोतील कॅनाट उद्यानाचा चेहरामोहरा बदलला जात असून सोबतच बाळासाहेब ठाकरे स्मारक, सातारा - देवळाई परिसरातील गट नंबर १६८, ९२/ ९३ व ११४ आदी गट नंबरमध्ये तसेच उल्कानगरी व गारखेडा भागातील काही उद्याने विकसित केली जाणार असल्याचा संकल्प महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी आखला आहे. त्यापैकी कॅनाट उद्यानाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे.
एकेकाळी हिरवळीने बहरलेली, मेंदीच्या श्रृंगाराने नटलेले आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळणारे छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्याने आता वाळवंट झाले आहेत. आता वाळून गेलेली झाडे, तुटलेल्या खुर्च्या, जनावरांचा मुक्तसंचार आणि पसरलेली घाण असे दृश्य दिसून येते. बालकांच्या खेळण्याचा आधार, वृद्धांच्या विरंगुळ्याचे ठिकाणच मागील काही वर्षांपासून महानगरपालिकेच्या नियोजनशून्यतेने हिरावले आहे. शहरात सिध्दार्थ उद्यानाशिवाय नागरिकांना दुसरा पर्याय नाही. आता शहरात कुठेही विरंगुळ्याचे ठिकाण दिसत नाही.
सिडकोच्या काळात सिडको हडकोत वाहतूक उद्यान, शामा प्रसाद मुखर्जी उद्यान, कॅनाट उद्यान, टाऊन सेंटर उद्यान,स्व. प्रमोद महाजन महाजन उद्यान, हर्सुल तलाव परिसरातील स्मृतीवन, सिडकोतील कॅटली गार्डन, किलेअर्क परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टिळकनगरातील भारतमाता उद्यान, ज्योती नगरातील कवितेची बाग, सहकार नगरातील लोक कलावंत उद्यान, टिव्ही सेंटर भागातील मजनूहिल परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान तसेच शहरातील प्रत्येक लेआउटमध्ये संपूर्ण परिसरात सर्वांग सुंदर उद्याने होती.
उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या जागांचे महानगरपालिकेने बहुतांश भागात श्रीखंड केल्याचा आरोप देखील महानगरपालिका कारभार्यांवर आहे. शहरात अनेक भागात मोठी उद्याने आणि नवीन वस्त्यांमध्ये उद्यानाच्या खुल्या जागा दृष्टीक्षेपात आहे. गेल्या २५ वर्षात उद्यानाच्या विकासासाठी अनेक तक्रारी झाल्या. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. लोकप्रतिनिधींना सांगितले तर बघू-करूची भाषा बोलतात. या उद्यानांमध्ये २५ वर्षात कधी वृक्षारोपणच झालेले नाही, ना फुलझाडे ना लॉन लावण्यात आली. मुलांसाठी खेळणीही चोरीस गेली आहे. केवळ सुरक्षा भिंत बांधणे म्हणजे उद्यानाचा विकास होय का, असा प्रश्न नागरिक करीत आहे.
उन्हाळ्यामध्ये वाळवंट आणि पावसाळ्यामुळे वाढणारे गाजर गवत एवढीच काय ती उद्यानाची व्याख्या झाली आहे. उद्यानाला सुरक्षा भिंत असली तरी असामाजिक तत्वाचा वावर होतो. उद्यानाची झालेली दुरावस्था महानगरपालिकेला आजवर कधी दिसली नाही. परंतु कुणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून वाळवंट झालेल्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी चांगला पुढाकार घेतला आहे. शहरातील एकमेव सिध्दार्थ उद्यानाशिवाय नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चारही बाजूंनी वाढलेल्या शहराला उद्यानांची गरज असल्याचे त्यांच्या मनाला पटले.
त्यांनी महानगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सिडको एन - ८ भागातील बाॅटनिकल उद्यान व त्याला लागूनच असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचा कायापालट केला यातील एका उद्यानात अनेक वर्षांपासून धुळखात पडलेली मिनिट्रेन सुरू केली तर दुसऱ्या उद्यानात नौकानयन सुरू केले. त्याच बरोबर सिध्दार्थ उद्यानात देखील मिनिट्रेन सुरू केली. सोबतच स्वामी विवेकानंद उद्यानात देखील मिनिट्रेंन सुरू केल्याने बच्चेकंपनीचा ओढा वाढला.
आता शहरातील एमजीएम परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक उद्यान, सातारा - देवळाई परिसरातील गट क्रमांक - १६८ व गट क्रमांक - ९२ /९३ तसेच ११४ गटात एक ते दीड एकर जागेवर भव्य उद्यान उभारण्यात येणार असल्याचा संकल्प ते पूर्ण करणार आहेत. प्रत्येक उद्यानात आकर्षक फुलझाडांचे सुशोभिकरण, सिंथेटिक ट्रॅक, मैदान, खुले जीम , स्वच्छतागृहे, पाण्याची सुविधा, बसण्यासाठी बाके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गत कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरकरांना चांगल्या उद्यानांची प्रतिक्षा होती. उद्यानांची बकाल अवस्था झाल्याने उद्यानप्रेमी पाय ठेवत नव्हते. लहान मुले व पालक तसेच वृध्दांसाठी चांगल्या उद्यानांसाठी जी. श्रीकांत यांनी यंत्रणा कामाला लावली. त्यांच्या प्रयत्नांनी सिध्दार्थ उद्यानात संगित कारंजे, इलेक्ट्रिकल ट्रेन, एन - ८ येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानात नौका विहार, स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन, सिडको एन - बाॅटनिकल उद्यानात ट्रेन सुरू करण्यात आल्याने उद्याने बालगोपाळांच्या किलबिलाटाने बहरू लागली.पालकांच्या व आजी आजोबांच्या चेहऱ्यावर मुले, नातवंड बागडू लागल्याने तिकीट काढले तरी पैसा वसूल म्हणत समाधान व्यक्त केले जात आहे.
आता केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून ६ कोटी रुपयातून त्यांनी पहिल्या टप्प्यात ७ उद्यानांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. आता केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून शहरात चार ठिकाणी हरितपट्टे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती संभाजीनगर - पैठण रोडवरील इटखेडा भागातील गोल्डन सिटी, भावसिंगपुर्यातील पेठे नगर, साकेत नगर व सिडको एन - २ संत तुकोबाराय नगरी येथील खुल्या जागांची निवड केली आहे.