Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर 'त्या' (अ)स्मार्ट कोट्यवधींच्या रस्त्यांची दुरूस्ती सुरु

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या रस्त्यांना ४० दिवसांतच भगदाडे पडली, या भागातील माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे व हुशारसिंग चव्हाण यांनी आवाज उठवला. त्यानंतर कारभाऱ्यांनी तांत्रिक सल्लागार समितीसह कंत्राटदाराला सोबत घेऊन पाहणी केली. तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करू असे म्हणत कारभाऱ्यांनी माजी नगरसेवकांचा आवाज दाबत शांत केले. मात्र, सहा महिन्यानंतरही ती बुजवावी कुणी, यावरून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांत आणि कंत्राटदारात वाद निर्माण झाला होता. टेंडरनामाने तपास करून पाठपुरावा केला. त्यामुळे कारभाऱ्यांनी कंत्राटदाराला आदेश दिले आणि रखडलेले माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांचे घर ते राज्यमंत्री अतुल सावे यांचे संपर्क कार्यालय ते मथुरानगर चौक व देवगिरी बॅंक ते बजरंग चौकापर्यंतच्या रस्ते दुरूस्तीला अखेर दुरूस्तीसाठी मुहूर्त लागला.

गेल्या चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेल्या या नव्याकोऱ्या सिमेंट रस्त्यावर चाळीस दिवसांत भगदाडे पडली. रस्त्यावर आरपार भेगा पडल्या. रस्त्याचा पृष्ठभाग उखडून रस्ता खराब झाला. खराब रस्त्याची दुरूस्ती व्हावी म्हणून परिसरातील असंख्य नागरिकांच्या तक्रारीनंतर माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे व हुशारसिंग चव्हाण कंत्राटदार, महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांकडे चकरा मारत होते; पण त्यांना कुणीही दाद देत नव्हते. टेंडरनामाने हा प्रश्न उचलला व त्याचा कायम पाठपुरावाही केला. त्यामुळे अखेर  ए. जी. कन्स्ट्रक्शनचा कंत्राटदार असलम राजस्थानी व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे कारभारी ताळ्यावर आले आणि या संपूर्ण रस्त्यांची दुरूस्ती सुरू केली.

सिडकोतील व्हीआयपी जळगाव रस्त्याला जोडणाऱ्या माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांचे घर ते राज्यमंत्री अतुल सावे यांचे संपर्क कार्यालय ते मथुरानगर चौक व देवगिरी बॅंक ते बजरंग चौकापर्यंत खड्डे, ओबडधोबड रस्ता आणि चिखल यामुळे चालणेही मुश्कील होत होते. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून १०८ रस्त्यांसाठी ३१७ कोटींचा भरभरून निधी दिला.त्यात सिडकोतील हे रस्तेही मंजूर करण्यात आले होते. या रस्त्यांसाठी साडेबारा कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला, मात्र निकृष्ट काम केल्याने सिमेंट रस्ते तयार होऊनही त्याचे महिनाभरातच पार वाटोळे झाले होते. परिणामी या भागातील रहिवाशांना पूर्वीप्रमाणेच त्रास सहन करावा लागत असे. प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यावरून जाताच वाहनधारकांना भगदाडातून व फोफोट्यातून वाट काढावी लागत असे. यामुळे या भागातील रहिवाशांनी माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे व हुशारसिंग चव्हाण यांच्याकडे तगादा लावला. त्यानंतर संतापलेल्या नगरसेवकांनी महापालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे उंबरठे झिजवले. मात्र कुणीही दाद देत नव्हते. अखेर त्रस्त नगरसेवकांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली.

या रस्त्यांची पाहणी करून वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी आयआयटीच्या तज्ज्ञ पथकासह कंत्राटदारांसमवेत रस्त्यांची पाहणी केली. अयोग्य प्रकारे मालाचा वापर, धम्मस न करता केलेले काम आणि बांधकामावर पाणी टाकण्यात केलेली हयगय यामुळे रस्ता उखडल्याचे समोर येताच आधी रस्ता दुरुस्त करा, मगच बिल सादर करा, अशी तंबी दिली होती. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा या रस्त्यांचे पॅचवर्कसुरू केले व आता लोकांचा मार्ग सुकर करत आहे.