Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'या' रस्त्याचे स्मार्ट सिटी प्रशासन काम कधी पूर्ण करणार; वाहनचालकांचे कंबरडे मोडले!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-१ मधील एका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून थांबले आहे. या रेंगाळलेल्या कामामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास ५० मीटर अंतरात रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. या रस्त्यावर राडारोडा, सांडपाणी नलिका, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटरलाइन उघड्या पडल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

एपीआय क्वार्नर हाॅटेल लोकसेवा ते मोहित ऑटो कार्स प्लाॅट क्रमांक - ९३ सरदारसिंग पटेल पेट्रोल पंपाच्या मागे एपीय क्वार्नर ते सिडको बसस्थानक सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याच्या मधोमध हाॅटेल लोकसेवा ते मोहित ऑटो कार्सपर्यंत रस्त्याचे काम गत वर्षभरापासून बंद आहे.तिन्ही बाजूंना झालेला सिमेंट रस्ता आणि मधोमध खोलगट रस्त्याचे रखडलेले काम यामुळे तिन्ही बाजूंच्या नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर चढ-उतार करताना नागरिकांना खटक्यांचे झटके खावे लागत आहेत.यामुळे मानेला आणि कमरेला दुखापत सोसावी लागत आहे. दरम्यान मालवाहू रिक्क्षा, दुचाकीस्वार  पलटी होऊन येथे मोठे अपघात होत आहेत. शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्याला एपीआय क्वार्नर ते सिडको बसस्थानक हा समांतर आणि  १२ मीटरचा रस्ता आहे. याच मार्गावरून सिडको बसस्थानक तसेच जळगाव रस्त्याला जाता येत असल्याने जालना रोडवरील सिडको टी पाॅईंटचा सिग्नल टाळण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करतात. याशिवाय सिडको बसस्थानक गाठण्यासाठी शेकडो प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. तसेच याच रस्त्यावर चिकलठाणा स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असल्याने उद्योजक व कामगारांची मोठी वाहतूक असते. या मुख्य रस्त्यामुळे जालना रस्त्याचा वाहतुकीचा भार देखील कमी होतो. मात्र गत वर्षभरापासून हाॅटेल लोकसेवा ते मोहित ऑटो कार्स पर्यंत रस्त्याचे काम रखडलेले आहे.

रस्त्याच्या शेजारीच उघडा नादुरूस्त नाला अपघाताला आमंत्रण देत आहे. येथे नाल्यात सिमेंट पाइप आणून ठेवले आहेत. तेही रस्त्यातच ठेवल्याने आधीच खड्ड्यात रस्ता त्यात पाइपांचा अडथळा येत असल्याने येथे सायंकाळी व सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नाला दुरूस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आले नाही. रस्त्याच्या कामासाठी  खोदकाम केल्यानंतर तेथे पॅव्हरब्लाॅक टाकायचे की सिमेंट रस्ता करायचा हा गुंता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभार्यांना उमजत नाही. परिणामी कंत्राटदार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम करता येत नाहीऐ. रस्त्यावर राडारोडा इतस्ततः पडलेला आहे. रिकाम्या सांडपाणी नलिका, स्टॉर्म वॉटरलाइन उघड्यावर पडलेल्या आहेत. ११ महिन्यांपूर्वी  येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र अर्धवट काम सोडून यंत्रणा पसार झाली. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वर्षांचा कालावधी लागणार आहे. याचे उत्तर कोणीही देत नाही.