Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'त्या' स्मार्ट रस्त्यांमधील भेगा, खड्डयांची कंत्राटदाराकडून‌ लिपापोती

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या स्मार्ट सिमेंट रस्त्यांच्या मध्यभागातील डांबर, सिमेंट निघून भेगा (गॅप) तयार झाले आहेत. त्यात दुचाकी वाहनांचे चाक जाऊन होणाऱ्या अपघातांमध्ये नागरिक जखमी झाले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रश्‍नावर 'टेंडरनामा ‌’ने सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर अखेर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत संबंधित सर्वच रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे.

शहरातील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून तब्बल ३१७ कोटी रूपयातून १११ रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यात चिकलठाणा औद्योगिक वसाहत, जवाहरनगर पोलिस ठाणे ते टिळकनगर चौक, जळगाव रोड ते बजरंग चौक, खा.कल्याण काळे यांचे सत्यमनगरातील घर ते मथुरानगर चौक, सिडको एन - १ , हर्सुल, निजामगंज ते दमडीमहल, टाइम्स काॅलनी ते कटकटगेट, सादातनगर व  अशा काही प्रमुख रस्त्यांसह जुन्या शहरातील व सिडकोहडकोसह सातारा - देवळाई भागातील  रस्त्यांमध्ये भेगा पडल्या आहेत. अनेक भागातील रस्त्यांवरचा सरफेस उखडलेला आहे. यात दुचाकीचे चाक गेल्याने अपघात होऊन लोक जखमी होत आहेत. अनेक भागात पूलांचे काम अर्धवट असल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘टेंडरनामा’ने या समस्येची दखल घेत शहराच्या विविध भागातील रस्त्यांवरील वास्तव मांडले होते.

अखेर या प्रश्‍नाची दखल घेऊन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून कंत्राटदाराने रस्त्यांमधील भेगा, खड्डे दुरुस्तीला सुरुवात केली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची पाहणी करून भेगांमध्ये डांबर ओतण्याचे काम धडाक्यात सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांचा सरफेस उखडला आहे. तेवढा भाग कापून नव्याने रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत. रस्त्यांमधील भेगा, खड्डे दुरुस्त झाल्यास दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या आणि त्यामुळे नागरिक जखमी होण्याच्या, जीवितहानी होण्याच्या घटना टळू शकणार आहेत.

महापालिकेसह बांधकाम विभागाकडून हे अपेक्षित

- महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देखील शहरात कोट्यावधी रुपयांचे सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरले आहे.त्या रस्त्यांवर देखील भेगा, खड्डे दुरुस्तीसह रस्ते समतल करणे अपेक्षित आहे.

- सिमेंट रस्त्यांना जोडणारे जोड रस्ते एकसमान उंचीवर आणणे अपेक्षित आहे.

- तुटलेल्या दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करणे व दुभाजकातील कचरा काढुन सुशोभीकरण करणे अपेक्षित आहे.

- शहरातील अती उंचीचे गतिरोधक काढुन रबरी गतिरोधक टाकून त्यावर आयआरसीच्या मानकाप्रमाणे थर्माप्लास्टीक पट्टे मारणे, रिफ्लेक्टर लावणे, सुचना फलक लावणे गरजेचे आहे.

- ज्या ठिकाणी पुलांचे कठडे तुटले आहेत त्यांचे तातडीने बांधकाम करणे गरजेचे आहे.

- शहरातील फुटखालुन टाकलेल्या भुमिगत मलनिःसारण वाहिनीच्या मेनहोलची झाकणं‌ टाकणे आवश्यक आहे.

- धोकादायक इमारती, होर्डींग्ज, धोकादायक झाडे याकडे पावसाळ्यात तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.