sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : जलवाहिनीच्या खोदकामामुळे बघा साताऱ्यात काय घडले? नागरिकांनी का केली गुन्हा दाखल करण्याची मागणी?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीड बायपास ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी रोड ते सोलापूर - धुळे हायवे या शेकडो वसाहतींना जोडणाऱ्या मार्गावर भूमिगत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम भर पावसाळ्यात गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होऊन, प्रवाशांसह वाहनचालक हैराण झाले आहेत.

अनेकदा येथे किरकोळ अपघात आणि वाद होत आहेत. आज दुपारी सातारा भागातील एका जेष्ठ नागरिकाचा मोठा अपघात झाला. त्यांना एका रुग्णालयात भरती केले असून डाॅक्टरांनी त्यांची मोठी शस्त्रक्रिया सांगितल्याचे त्यांचे चिरंजीव सुधीर भालेराव यांचे म्हणणे आहे. काल याच मार्गावर एक मुलगी घसरून पडली तीला आठ टाके पडले आहेत. कंत्राटदारांकडून खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनाचा वापर केला जात नाही. लोखंडी बॅरिकेड्स देखील लावले जात नाहीत.

यामुळे या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्‍याचे वाहनचालकांसह येथील स्थानिक नागरिकांचे म्‍हणणे असून हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. झालेल्या दोन गंभीर अपघातांमुळे संबंधित कंत्राटदारावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या भागात जोर धरत आहे.

रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी या मार्गावर गेले दोन आठवड्यापासून खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकांसह प्रवासी आणि स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. आधीच हा रस्ता केवळ साडेपाच मीटरचा आहे. त्यात यापूर्वी जलवाहिनी साठीच एमआयडीसीने म्हाडा कॉलनीत जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम केले होते. त्यानंतर एका बाजूला मजीप्रानेच खोदकाम करून आता दुसऱ्या बाजूला नव्याने भूमिगत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे.

यापूर्वी खोदकाम झालेला रस्ता दुरुस्त न करताच दुसऱ्या बाजूने खोदकाम केल्याने रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहत नाही. आता हे काम झाल्यानंतर पुन्हा भूमिगत गटारीचे पाइप रस्त्याच्या मधोमध टाकले जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर देखील दुरुस्तीसाठी रस्ता खोदला जाईल. उरल्या सुरल्या रस्त्यात खाजगी व सरकारी कंपनीच्या केबल टाकण्यासाठी वापर केला गेला आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी साडेतीन कोटी रुपये खर्च करून त्यावर आता चिखल माती, रेतीचे ढिगारे साचले आहेत.

अर्ध्याहून अधिक मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे बीड बायपासकडून म्हाडा काॅलनीकडे जाणारा मार्गावरील मोठे वाहन अडकताच वाहतुकीचा तास तास चक्का जाम होत आहे. कित्येक किरकोळ अपघात आणि वाद होतात. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

काय म्हणतात नागरिक?

देवळाई चौक ते साई टेकडी रस्त्याप्रमाणे प्रचंड वर्दळ असलेला रेणुकामाता कमान ते सोलापूर हाय-वे रस्त्याचे पण काम होणे गरजेचे आहे.

- लक्ष्मीकांत जाधव

सद्यस्थितीत रेणुका माता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक यामधील रस्त्याचे बाजूला पाईप लाईनमुळे झालेले खोदकाम लेव्हलमध्ये करणे व दोन दोन फूट खोल खड्डे बुजवणे, असे काम केले तर ठीक राहील. अन्यथा रोजच ट्रॅफिक जाम व अपघात वाढण्याची शक्यता आहे. अक्षरशः जीवमुठीत घेऊन कमानी पर्यंत जावे लागत आहे.

- दत्ता जोशी

खोदकामामुळे हा रस्ता पूर्ण चिखलमय झाला असून, आज सकाळी याच मार्गावर काठोड फार्म समोर स्कूल व्हॅन फसल्यामुळे वाहतुकीचा बराच तास चक्काजाम झाला होता. देवळाई रस्त्याचे काम सुरू झाल्याने अन्य वसाहतीसाठी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई होळकर हा एकमेव पर्यायी रस्ता असल्याने वाहतुकीचा भार अधिक वाढला आहे. या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करावेत.

- पद्मसिंह राजपूत, उद्योजक

माझे वडील या खोदकामामुळे रस्ता चिखलाचा झाल्याने त्यावरून घसरून पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

- सुधीर भालेराव

शहरातील रस्त्यापैकी सातारा - देवळाईसाठी अत्यंत महत्वाच्या या रस्त्याची खूप वाईट परिस्थिती झाली आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारा परिसर मरण यातना भोगतो आहे. ढिम्म मनपा प्रशासन याकडे लक्ष देईल का?

- आबासाहेब देशमुख

या मार्गावरील चौधरी हेरिटेजच्या बाजूला ज्ञानेश्वर नगर रोड वरती भाजीपाला दुधाचे व किराणा दुकान आहे त्यांनी रोडवरती निम्मा सामान लावल्याकारणाने त्या ठिकाणी दुकानावरती येणाऱ्या ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे या रोडवर नेहमी करता ट्रॅफिक जाम होत आहे. याकडे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. हा त्रास सामान्य जनतेला होत आहे तरी याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती.

- अजयकुमार पाण्डेय