Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : रास्ते पे 'खिले', दुभाजक पे 'फुल'! महापालिका कारभाऱ्यांचे चाललेय तरी काय?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील बहुतांश मार्गावर सायकल ट्रॅक व वळणमार्गासाठी लावलेले बोलार्ड उखडून रस्त्यात ठोकलेल्या खिळ्यांमुळे नागरिकांना अंगठेफोड सोसावी लागत आहे. टायरांना खड्डे पडून हवा गुल होत असताना महापालिका भरपावसात दुभाजकात फुलझाडे लावत आहे. यामुळे रास्ते पे
'खिले' दुभाजक पे 'फुल' असे चित्र शहरात दिसत आहे.

मराठवाडा मुक्तिदिनाचे औचित्य साधून शिंदे आणि मोदी सरकारने आगामी महापालिका व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शक्कल लढवली आणि मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली. तब्बल सात वर्षानंतर मराठवाड्यात बैठकीचे आयोजन केल्याची दवंडीही पिटवली जात आहे. यानिमित्ताने सुशोभिकरणाच्या नावाखाली जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी देखील केली जात आहे.

धक्कादायक म्हणजे जी - २० च्या दरम्यान सहा महिन्यांपुर्वी रंगवलेल्या ठिकाणीच पुन्हा रंगरंगोटी करून जनतेच्या पैशाला चुना लावला जात आहे. कोट्यवधींची कामे मंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी घाईगरबडीत विनाटेंडर केली जात आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहांचा दौरा व मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी सुशोभीकरणाला वेग आलेला आहे.

यात भरपावसात शहरातील व्हीआयपी मार्गावरील महावीर चौक ते चिकलठाणा विमानतळ तसेच सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट, महावीर चौक ते दिल्लीगेट दुभाजकात फुलझाडे खोचली जात आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. जी - २० च्या काळात केलेल्या अशा  सुशोभीकरणाची महिन्याभरातच वाट लागून जनतेच्या घामाच्या आणि कष्टाचे कोट्यवधी रुपये वाया गेलेले असल्याचा भागचा अनुभव असताना आता भर पावसात फुलझाडे लावली जात आहेत.

दुसरीकडे शहरातील बहुतांश मार्गावर सायकल ट्रॅक व वळणमार्गासाठी लावलेले बोलार्ड उखडून रस्त्यात ठोकलेल्या खिळ्यांमुळे नागरिकांना अंगठेफोड सोसावी लागत आहे. टायरांना खड्डे पडून हवा गुल होत असताना महापालिका भरपावसात दुभाजकात फुलझाडे लावत आहे. यामुळे रास्ते पे 'खिले' दुभाजक पे 'फुल' असे चित्र शहरात दिसत आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात बहुतांश मार्गांवर सायकल ट्रॅकची निर्मिती केली होती. काही चौकांमध्ये वळणमार्गासाठी देखील बोलार्ड लावले होते. परंतु ज्या रस्त्यांवर हे काम पूर्ण झाले आहे त्या रस्त्यावरील सायकल ट्रॅकसाठी लावलेले बोलार्ड उखडून गेले आहेत. त्यामुळे यावरचा कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. या कामामुळे जनतेच्या घामाचा आणि कष्टाचा पैशाला मोठ्या प्रमाणात चुना लागला आहे.

बोलार्ड रस्त्यात घट्ट टिकून राहण्यासाठी बड्या खिळ्यांचा वापर केला गेला आहे. हे खिळे उघडे पडल्याने नागरिकांच्या महागड्या गाड्यांच्या टायरला खड्डे पडून हवा गुल होत आहे. पादचाऱ्यांना अंगठेफोड सोसावी लागत आहे. व्हीआयपींसाठी सुशोभिकरणाकडे लक्ष घातलेल्या महापालिकेसह स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कारभाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत ज्या ज्या शहरांचा समावेश झाला त्या त्या शहरांना शासनाने शहराच्या काही भागांमध्ये सायकल ट्रॅक तयार करण्याची सूचना केली होती. 'सायकल फॉर चेंज' असे नाव गोंड्स नाव या उपक्रमाला देण्यात आले होते. नागरिकांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा. सायकल चालवणे आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी (फिटनेस) चांगले असते असा संदेश देत महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेची मदत घेत क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर रेल्वेस्टेशनकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूने शहरातील पहिला सायकल ट्रक तयार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार सायकल ट्रॅकसाठी स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल चार कोटींची तरतूद करण्यात आली होती.

त्यानंतर शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कार्पोरेशनने पुर्ण केले आहे. त्यात प्रामुख्याने मध्यवर्ती जकात नाका ते एमजीएम आणि डॉ. सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर चौक, चिश्तिया चौक ते एमजीएम, कॅनाॅट गार्डन , प्रोझोन माॅल ते कलाग्राम व अन्य रस्त्यांचा देखील समावेश आहे.

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन दरम्यान तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. मात्र आठ-साडेआठ महिन्यातच या ट्रॅकची अवस्था बिकट झाली होती. पाठोपाठ सर्वच सायकल ट्रॅकची अशी अवस्था झालेली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने सुमारे अडीच ते तीन मीटर जागा सायकल ट्रॅकसाठी सोडण्यात आली होती. त्यात विशिष्ट प्रकारचे खांब खिळे ठोकून लावण्यात आले आहेत. परंतु आता या सायकल ट्रॅकचे वाटोळे होऊन खिळे उघडे पडल्याचे चित्र या रस्त्यांवर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर खिळ्यांचे दर्शन होत आहे.

शहरात असे विद्रूपीकरण असताना दुसरीकडे मात्र सहा महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली, त्याच ठिकाणी आता मंत्रिमंडळ बैठक आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत महापालिकेतर्फे शहरात रंगरंगोटी केली जात आहे. रस्त्यांवर अपघाताला आमंत्रण देणाऱ्या खिळ्यांकडे दुर्लक्ष करून व्हीआयपी मार्गांच्या दुभाजकात फुलझाडे लावून सुशोभिकरणाचा देखावा केला जात आहे.