छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील रेल्वे स्थानकाचे रुपडे ३० महिन्यांत पालटणार असून, केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत तब्बल २४१ कोटींचा निधी मंजूर झाल्याने कंत्राटदारामार्फत काम सुरू करण्यात आले आहे.
इंजीनिअरींग प्रोक्युरमेंट ॲन्ड कन्स्ट्रक्शन (EPC) या तत्त्वावर बांधकाम केले जाणार असल्याने जसेजसे काम होणार तसतसे कंत्राटदाराला देयके दिली जाणार असल्याने निधी अभावी काम रखडले असे होणार नाही, असा दावा प्रकल्प व्यवस्थापक राजकुमार शर्मा यांनी टेंडरनामाशी बोलताना केला.
जागतिक दर्जाच्या विमानतळाच्या धर्तीवर बांधकाम होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर व स्थानक परिसरातील निघणार औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. सद्य: स्थितीत दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारती समोरील खुल्या जागेत २५५ स्क्वेअर मीटर जागेवर तात्पुरती इमारत बांधून तेथे पहिल्या टप्प्यातील जनरल रेल पोलिस आणि रेल्वे पोलिस बल आणि क्राईम ब्रॅच व इतर कार्यालय तात्परते शिफ्ट करण्यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
सदर बांधकामाचे कंत्राट लखनौच्या जी. एस. एक्सप्रेस कंपनीला देण्यात आले असून, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून मध्य प्रदेशच्या एल. एन. मालविया या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत मोहम्मद वासिक उप प्रकल्प प्रमुख, तर वैभव पाटील यांची सुरक्षा अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर शेख आमेर क्षेत्रीय व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळत असून दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता प्रकाश प्रजापत यांच्या निगराणी खाली हे काम केले जात आहे.
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी २४१ कोटींचा निधी मंजूर झाला झाल्याने या निधीतून रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटणार आहे. टेंडरनामाने येथील रेल्वेस्टेशनच्या पायाभूत सुविधांबाबत सातत्याने वाचा फोडली होती. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या विशेष प्रयत्नांतून विकास निधी मंजूर झाला आहे. हे स्थानक देशातील आदर्श रेल्वेस्थानक बनणार आहे. ज्यामुळे शहराच्या आणि परिसराच्या औद्योगिकरणाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले होते.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होती. विकासाची प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी होती. त्यांची दखल रेल्वेच्या पाहणी समितीने घेऊन रेल्वेस्थानकावर असेलेल्या गैरसोयी आणि त्रुटीं पाहून विविध विकासकामे रेल्वे मंत्रालयाला सुचवली होती. रेल्वे मंत्रालयाकडून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून स्थानक विकासासाठी २४१ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
यातून प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील २६,३४८ चौरस मीटर क्षेत्रफळाची आकर्षक इमारत तयार होणार आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील ५,६७५ चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारतीचे बांधकाम होणार आहे. इतर ७२ मीटर जागेत दुहेरी स्तरीय एअर कॉन्क्युर्स कनेक्टिंग टर्मिनल इमारत आणि सर्व प्लॅटफॉर्माचे रुपडे पालटणार आहे. ७२ बाय ६६ मीटरचा रुफ प्लाझा नव्या इमारतीचा लूक बदलणार आहे.
रेल्वे स्थानकातून थेट बाहेरील बसस्थानकापर्यंत कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे. आरएलडीएद्वारे २५९० चौरस मीटर जागेवर मल्टीलेव्हल कार पार्किंग उभारली जाणार आहे. सर्व प्लॅटफॉर्मच्या तरतुदीत सुधारणा, पिण्याचे पाणी, आरओ आणि वॉटर व्हेडिंग मशीन, सुसज्ज कॅन्टिनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आणि सुरक्षेसाठी परिभ्रमण क्षेत्रावर पुरेशी प्रकाश व्यवस्था अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केली जाणार आहे. रेल्वेस्टेशनवर लिफ्टसह रॅम्पची सुविधा केली जाणार आहे. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना होणार आहे. ई-स्टेशनसह सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
स्थानकावरील गैरकृत्ये रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जादा कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकाच्या दोन्ही बाजूला संरक्षित भिंत बांधून स्टेशन बंदिस्त केले जाणार आहे. जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून तेथे परकीय चलन विनिमय दालन, प्री-पेड टॅक्सी काउंटर, एक्झिक्युटिव्ह लाॅन, चिल्ड्रन्स पार्क, सलून, मेडिकल शाॅप, क्राफ्ट सेंटर, विमानाच्या तिकिटांचे काउंटर, एसटी बस बुकिंग सेंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.