Sambhainagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar News : 3 कोटींचा निधी मंजूर; मग 3 वर्षांपासून पुलाचे काम का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहानुरवाडी परिसरातील ज्योतीनगर - शम्स नगर - श्रीनिवास काॅलनी - देवानगरी या मार्गातील नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून तीन कोटी रुपये मंजुर केले. मात्र तीन वर्ष उलटल्यानंतर देखील पुलाचे बांधकाम आणि रस्त्याचे बांधकाम रखडल्याने नागरिकांना जुन्याच धोकादायक पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यात मोठा पाऊस झाल्यास पुलावर पाणी चढत असल्याने या रस्त्यावरून संपर्क तुटण्याची शंक्यता निवास काॅलनी, शम्स नगर, देवानगरी भागातील नागरिकांनी व्यक्त केली.‌

शहरातील हा एकच पूल नव्हेतर नदी नाल्यावरील इतरही पुलांची दयनीय अवस्था असल्याने छत्रपती संभाजीनगरकरांना पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे मात्र जबाबदारीने कोणीही पाहत नसल्याचे समोर आले आहे.

तत्कालीन नगर परिषदेच्या काळात येथील नाल्यावर कमी उंचीचा नळकांडी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. गेल्या चाळीस वर्षात महानगरपालिका प्रशासनाने जीर्ण अवस्था झालेल्या पुलाच्या बांधकामासाठी तत्परता दाखवली नाही. त्यात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून गत तीन वर्षांपूर्वी ३१७ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामात हा जुना पूल तोडून अधिक उंचीचा पूल बांधण्यासाठी ३ कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीलाच हे काम देण्यात आले. मात्र इतक्या मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली असताना मागील तीन वर्षांपासून हे काम अपूर्णावस्थेत आहे.

तसेच याच धोकादायक पुलाच्या नाल्याच्या प्रवाहावर प्रतापगड स्मशानभूमी समोर असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम देखील गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

येथील पुलाच्या बांधकामासाठी प्रतापगड स्मशानभूमीत येणाऱ्या अंत यात्रेकरूंना लांबचा फेरा मारावा लागत आहे. सातारा - देवळाईसह बीड बायपास वसाहतीकडून येणाऱ्या अंत यात्रेकरूंना संग्रामनगर उड्डाणपुलावरून शहानूरवाडी एकता चौक, ज्योतीनगरकडून दोन ते अडीच किलो मीटरचा फेरा मारावा लागत आहे. देवानगरी - निवास काॅलनी - शंम्स नगर या मार्गातील पुलाचे काम न झाल्याने हा पूल जडवाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाचा नागरिकांना फायदा पोहोचत नाही.

कोरोना काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे हे दोन्ही पुलाचे कठडे वाहून गेले होते. पुलाच्या कठड्यांलगत रस्त्यावर भगदाडे पडली आहेत. लोक पुलांवर कचरा टाकत असल्याने रस्तेही अरूंद झाले आहेत. पावसाळ्यात पुलांवर पाणी वाहत असल्याने अनेक वसाहतींचा परिसराशी संपर्क तुटल्याने या भागातील शेकडो वसाहतीतील नागरिक वाऱ्यावर आहेत. पुलाचे न झालेले बांधकाम व नाल्यात व नाल्याच्या रस्त्यांवर मोठ-मोठे कचऱ्याचे ढिगारे ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांना आधीच धोकादायक असलेल्या पुलावरून नाक दाबून मार्ग काढावा लागत आहे. त्यात पुराचा धोका निर्माण झाल्याने नागरिक भयभीत अवस्थेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील याच पुलाबरोबर संग्रामनगर - देवानगरीकडे शंभूनगर लगत रस्त्यांवरील पूल देखील धोकादायक आहे. सिडको एन - २ परिसरातील विनय काॅलनीतील पुलाचे कठडे तुटले आहेत. फुलेनगर रेल्वेगेट ते एमआयटी मार्गावर देखील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून रस्ता झाला पण नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडलेले आहे. शहरातील अशाच प्रकारे नदी - नाल्यांवरील हा गंभीर प्रश्न असताना लोक प्रतिनिधी व प्रशासन कमालीचे सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी होवून ठेकेदारासह संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर  कठोर कारवाई करावी, अन्यथा पुलांवर पाणी शिरल्यास मोठी दुर्घटना झाल्यावर पुलांचा प्रश्न मार्गी लावणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात आमदार - खासदार यांच्यासह सरकारी अनुदानातून कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्त्यांची कामे केली गेली. मात्र सुखना, खाम नदीसह शहरातील नाल्यांवरील पुलांचे बांधकाम केले जात नाही. येथे ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्ते आहेत. पण मध्येच पुलांचे व रस्त्यांचे काम केले जात नसल्याने खटक्यांच्या त्रास कायम आहे.

रस्ते कामाच्या अंदाजपत्रकात पुलांचा समावेश केला जात नाही. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने शहरातील बहुतांश पुलांचे तीन तेरा वाजले आहेत.‌ पावसाळा वगळता इतर दिवसातही दुचाकी वाहनेही जावू शकत नाहीत,  अशी पुलांची स्थिती आहे.

पुलांजवळ नाल्यातील कचऱ्यामुळे तसेच पाणी पुढे जाण्यास दगड व मातीच्या ढीगाचा अडथळा पाइपात ठरत असल्याने या नाल्यातील पाणी काठांवरील घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याच्या व नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचा घटना शहरात प्रत्येक पावसाळ्यात घडतात. यापूर्वी नाल्यांचे भगदाड आणि धोकादायक कठड्यांमुळे पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. असे असताना कशामुळे पुलांचे काम रखडवले जाते‌? यास जबाबदार कोण? याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे.

गेल्या तीस ते चाळीस वर्षांंपासून जुन्या पुलांचे बांधकाम धोकादायक अवस्थेत असताना नाल्यांवर कचरा, डेब्रीज साहित्य टाकून मुख्य पात्रातच मोठ-मोठे दगड व मुरुमाचे ढीग असल्याने पाणी पुढे प्रवाहीत होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे नाल्यातील पुराचे पाणी पुढे प्रवाहीत न होता वसाहतीत शिरते. रात्रींबेरात्री घरात शिरून संसारोपयोगी साहित्यासह इतरही नुकसान होत असते मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही धोकादायक पुलांची दुरुस्ती केली जात नाही.