Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : साताऱ्यातील 'या' प्रमुख रस्त्याचा मार्ग मोकळा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा, देवळाईतील गणेश विसर्जनासाठी व सातारा गावठाणाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न महापालिकेने निकाली काढला आहे. दोन्ही विहिरीच्या कडेला असलेल्या नाल्यावर सिमेंटची भिंत बांधण्यात येत असल्याने गावठाणाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत नाल्याचे पाणी पाझरणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. दुसरीकडे याच भिंतीला खेटून साडेपाच मिटरचा रस्ता तयार करण्यात येत असल्याने दोन्ही विहिरीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे सातारा-देवळाईकर समाधान व्यक्त करत आहेत.

सातारा, देवळाईतील गणेश विसर्जनासाठी व सातारा गावठाणाला पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या काळापासून जुन्या विहिरी आहेत. पूर्वी या विहिरींकडे जाण्यासाठी एका खाजगी भुखंडातून रस्ता होता. मात्र भुखंडधारकाने गृहप्रकल्पाचे काम सुरू केल्याने दोन्ही विहिरींकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी महापालिकेकडे तगादा लावल्यानंतर तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी तातडीने दखल घेत येथील नाल्याला खेटून सिमेंटची सुरक्षाभिंत बांधून त्याच्या बाजूने साडेपाच मीटर रूंदी व १३० मीटर लांबीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आदेशाने याकामासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन प्रा.लि.या कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीने या कामासाठी दिड कोटीचे अंदाजपत्रक तयार केले. त्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने याकामासाठी सहा महिन्यांपूर्वी टेंडर काढण्यात आले होते. यात पाच कंन्स्ट्रक्शन कंपनीनी सहभाग नोंदवला होता. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील दिलीप डावकर यांच्या समृद्धी कन्स्ट्रक्शन कंपनीने १९ टक्के कमी दराने टेंडर भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले.

महापालिकेचे तत्कालीन प्रशासक व आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ चौधरी यांच्या निर्णयामुळे पाणीपुरवठा व गणेश विसर्जन विहिरीकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याने सातारा, देवळाईतील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.सातार्यातील गणेश विसर्जनसाठी शहरातील काही मंडळेही येतात. याशिवाय सातारा तांडा, देवळाई व बीडबायपास परिसरासह सातारा प्रभागातील ४२ गणेश मंडळांमार्फत येथे गणेश विसर्जन केले जाते. याशिवाय देवळाई व बीड बायपास परिसरातील इतर २५ मंडळे देखील येथील गणेश विसर्जन करतात. याशिवाय घरगुती गणपतीचे विसर्जन देखील या विहिरीत करण्यात येत असते. मात्र खाजगी मालमत्ताधारकाने रस्ताच बंद केल्याने गणेश भंक्तांना गणेश विसर्जन विहिरीकडे जाण्यासाठी मार्ग बंद झाला होतो.

दुसरीकडे गावठाणाला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली विहीर देखील गणेश विसर्जन विहिरीच्या शेजारीच असल्याने महापालिकेचे टॅंकर देखील विहिरीत पाणी ओतण्यासाठी जात नसल्याने गावठाणाचा पाणीपुरवठा बंद झाला होता. मात्र आता रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याने गावठाणातील दुष्काळाचे संकट दुर झाले आहे.याकामासाठी आमदार पुत्र तथा माजी नगरसेवक सिध्दांत संजय शिरसाट, सातारा-देवळाईतील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सोमीनाथराव शिराणे तसेच पद्मसिंह राजपुत, असद पटेल, आबासाहेब देशमुख, बद्रीनाथ थोरात ॲड. शिवराज कडू पाटील, रमेश बाहुले, विनोद सोळणार, राम काळे, गोरख आरते, शुभम पारखे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे काम मार्गी लागले.