Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'पे ॲन्ड पार्क'च्या नावाखाली जनतेच्या खिशावर डल्ला

पार्किंगच्या जागा कागदावर, पिवळे पट्टे रस्त्यांवर

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका हद्दीत महत्त्वाकांक्षी पार्किंगच्या जागा कागदावरच ठेवत याउलट पार्किंग धोरण राबविण्याच्या नावाखाली गजबजलेल्या मुख्य व्यापारी पेठांसमोर रस्त्यांवरच पिवळे पट्टे मारून पार्किंग शुल्कच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशात डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केला आहे. यासाठी खास एका ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. टेंडरनामाकडे उपलब्ध कार्यारंभ आदेशानुसार ठेकेदाराला २६ मे २०२२ च्या स्थायी समितीच्या एका ठरावानुसार द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात टेंडर प्रसिद्ध केल्याची तारीख याचा कुठेही उल्लेख नसल्याने विना टेंडर सात ठिकाणी पे ॲन्ड पार्कचा ठेका दिल्याचा संशय बळावत आहे.

महापालिकेच्या अनधिकृत जागेवर पे ॲन्ड पार्क शुल्क रद्द करावे, याबाबत राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश सचिव हर्षवर्धन श्रीराम प्रधान यांनी कॅनाॅट प्लेस परिसरातील दुकानात येत असलेल्या सर्व सामान्य जनतेकडून महापालिकेमार्फत सुरू असलेली पे ॲन्ड पार्क वसुलीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच  कॅनाट प्लेस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा खर्डे यांच्याशी संपर्क केला असता, यासंदर्भात शुक्रवारी सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पे ॲन्ड पार्कच्या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. ग्राहक दुकानात पाऊल ठेवण्याआधीच त्याला पे ॲन्ड पार्कचा तगादा लावला जात असल्याने व्यापारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. आम्ही वस्तु व सेवाकरासह इन्कम टॅक्स व मालमंत्ताकर भरतो.महापालिकेने  घनकचराचा अतिरिक्त लादलेला बोजाही सहन करतो. मात्र आता व्व्यापारीपेठेचा उंबरठा चढण्याआधीच ग्राहकाला पे ॲन्ड पार्कसाठी तोंड द्यावे लागत असल्याने सरकारला द्यावा लागणारा कर व्यापाऱ्यांनी कुठुन भरावा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याची खंत व्यापार्यांनी व्यक्त केली दुसरीकडे महापालिकेच्या या मनमानी धोरणाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार किशनचंद तनवानी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, सहकारमंत्री अतुल सावे , पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील व्यापार्यांच्या पाठीमागे असल्याचा कौल देत पे ॲन्ड पार्कच्या टेंडरचीच चौकशी करणार असल्याचे टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत महत्त्वाकांक्षी पार्किंग धोरण राबविण्याचे निर्देश महापालिकेला खंडपीठाने दिले होते.यात दिलेले निर्देश महापालिकेने आजही कागदावरच ठेवले. शहरातील मुख्य आणि वर्दळीचे रस्ते, व्यापारीपेठा यातील गिळलेल्या पार्किंगच्या जागा मोकळ्या न करता बड्या बिल्डरांना अभय दिले. त्याउलट पार्किंगच्या चुकीच्या धोरणाअंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काही व्यापारीपेठात पिवळे पट्टे रस्त्यावर आखून महापालिका मोकळी झाली आहे. कायद्यानुसार पिवळा पट्टा हा पार्किंगचा असला तरी हे पट्टे वाहतूक पोलिस आणि टाउनप्लॅनिंगच्या परवानगीशिवाय आखता येत नाहीत. व थेट रस्त्यावर पार्किंगची ठिकाणं करता येत नाही. शिवाय रस्त्यावर पार्किंगला परवानगीच  नाही, तशी खंडपीठाची देखील भूमिका आहे. मात्र स्मार्टसिटीच्या प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी मारलेल्या पिवळ्या पट्ट्यांवर आता महापालिका  सर्वसामान्यांच्या खिसा कापत आहे.

यात विशेष म्हणजे महापालिकेने पे ॲन्ड पार्क लागु केल्यावर महापालिकेने वाहतूक पोलिस आणि संबंधित पोलिस ठाण्याला देखील माहिती दिली नाही. पोलिस आणि महापालिकेमध्ये समन्वय नाही. विशेष म्हणजे कॅनाॅट या व्यापारीपेठेचा आराखडा निर्माण करताना सिडकोने कानाकोपर्यात दुकाने काढली. सिडकोने व्यापारीकरण करताना मात्र व्यापार्यांसाठी स्वतंत्र पार्किंग ठेवलीच नाही. येथील बहुमजली इमारतीच्या खालीच पार्कींगची जागा असल्याचे सिडको सांगते. मात्र येथील व्यापारी व ग्राहकांची वाहने लावण्यास तेथील लोक मज्जाव करतात. आता महापालिकेने रस्त्यावरच पिवळे पट्ट्याच्या आत पे ॲन्ड पार्क सुरू केल्याने त्याचा भुर्दंड छत्रपती संभाजीनगरकरांनी  का सोसायचा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. येथील पे ॲन्ड पार्क शुल्क वसुल करताना दररोज कर्मचारी आणि लोकांमध्ये वाद सुरू आहेत. परिणामी कॅनाॅटसारख्या व्यापारी पेठात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे.

या संदर्भात प्रतिनिधीने कर्बलेट पार्किंग ॲन्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ठेकेदार स्नेहलचंद्र सलगलकार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, 'महापालिकेकडून आम्हाला रितसर कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आम्ही बसविलेले  पार्किंग, नो पार्किंग आणि पे ॲण्ड पार्किंगचे फलक देखील लोक काढून फेकतात. तसेच पिवळे पट्ट्याच्या आत चारचाकी वाहनासाठी एका तासासाठी तीस रूपये, दुचाकी वाहनासाठी दहा रूपये व पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहने लावल्या दोनशे रूपये दंड आकारतो. पण कुणीही शुल्क देत नाहीत. याऊलट कर्मचार्यांशी वाहनधारक हुज्जत घालत आहेत. 'पे-ॲण्ड पार्किंग'चे फलक लावलेल्या ठिकाणी आम्ही महापालिकेने दिलेल्या अटी व शर्तीनुसारच शुल्क वसुल करतो. कॅनाट व्यापारीपेठेत उद्यानाच्या चारही प्रवेशद्रारासमोर मोफत पार्किंग आहे. तेथे कुठलेही शुल्क आकारले जात नाही. प्रत्येक दुकानदाराला दोन वाहनांना मुभा दिली आहे. त्यांच्याकडून पार्किंग शुल्क आकारले जात नाही.पुणे , मुंबईच्या  धर्तीवर गर्दीच्या ठिकाणी आणि अरूंद रस्त्यांवर वाहतुक जाम होऊ नये यासाठी महापालिकेचा स्तुत्य उपक्रम आहे. आमचे कर्मचारी देखील कुणाशीही हुज्जत घालत नाहीत. तरी त्यांना गुंडप्रवृत्तीची उपमा देत काही राजकीय मंडळी बदनाम करत आहे.महापालिकेने दिलेल्या आदेशानुसारच शुल्क वसुल करत आहोत. जेणेकरून वाहनधारकांना शिस्त लागावी हाच त्यामागे प्रामाणिक हेतू आहे, असे ते म्हणाले. महापालिकेचे उपायुक्त तथा मालमत्ता अधिकार्यांशी संपर्क साधला असता , प्रश्न करण्याआधीच मला काही माहीत नाही, मी सुट्टीवर असल्याचे म्हणत त्यांनी या संदर्भात बोलणे टाळले. मात्र प्रतिनिधीने कॅनाॅट परिसरात फेरफटका मारला असता महापालिकेच्या या चुकीच्या धोरणाबाबत व्यापारी आणि ग्राहकांचा पारा सरकलेला आहे.

असे आहे महापालिकेची पार्किंग धोरण

महापालिकेने मुळात मुख्य रस्त्यावरील तसेच गर्दीच्या व अरूंद रस्त्यालगत व व्यापारी पेठातील बड्या बिल्डरांनी ग्राहक व व्यापार्यांसाठी आरक्षित ठेवलेल्या पार्किंगच्या गिळलेल्या जागांचा शोध न घेता थेट घाईगरबडीत पार्किंगचे धोरण राबविण्याची पूर्ण प्रक्रिया केली. रस्त्यांवरच  पिवळे पट्टे मारलेल्याची जागी पे ॲन्ड पार्कच्या नावाखाली वसुलीसाठी कर्बलेट पार्किंग ॲन्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या  ठेकेदाराची नियुक्ती केली. त्याला शहरातील टि.व्ही.सेंटर, निराला बाजार, उस्मानपुरा, पुंडलीकनगर, कॅनाॅट, सुतगिरणीचौक, अदालतरोड आदी ठिकाणी पे ॲन्ड पार्कचे शुल्क वसुलीसाठी २३ जुन २०२२ रोजीच वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र त्याने दहा दिवसापूर्वी कॅनाट व्यापारीपेठेपासून शुल्क वसुलीला सुरूवात केली कसी, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी राबवली प्रक्रिया

त्यासाठी महापालिकेने थेट रस्त्यांवरच पार्किंग झोन तयार केलेत. त्याअनुषंगाने महापालिकेने पार्किंग चालविण्याकरिता २६ मे २०२२ रोजी झालेल्या स्थायी समितीचा ठराव क्रमांक ४०२ ची पुष्टी जोडत  २१ जुन  २०२२ रोजी ठेकेदाराशी द्विपक्षीय सामंजस्य करार केला. सोबतच काही अटी व शर्तीच्या अधिन राहून ठेकेदाराला २३ जुन २०२२ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पार्किंग झोनसाठी महापालिकेच्या  तिजोरीतून छदामही खर्च झाला नसून मग कोणत्या आधारे थेट रस्त्यांवर पार्किंग झोन टाकून छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशातूनच पैसा  गोळा केला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची दुहेल लूट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.