Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

मंत्र्यांच्या बैठकीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी अन् स्मशानभूमीला समस्यांची साडेसाती

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : प्रभाग क्रमांक सातमधील कैलासनगर स्मशानभूमीतील शौचालयाची दुरावस्था झाल्याने हे शौचालय अनेक वर्षांपासून बंद आहे.तत्कालीन आमदार शालीग्राम बसैये यांच्या निधीतून बांधलेल्या श्रध्दांजली सभागृहाची देखील वाईट अवस्था आहे. २ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त डी.एन.वैद्य यांच्याकाळात शौचालय आणि श्रध्दांजली सभागृह बांधण्यात आले होते. कंत्राटदार जावेद खान यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते बांधण्यात आले होते.

काही दानशूर लोकांनी दिलेल्या अस्थीलाॅकरची देखील तोडकी - मोडकी अवस्था झाली आहे. स्मशानात अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांना देखील धड बसायची सोय नाही. यामुळे महानगरपालिकेच्या वतीने शौचालय, श्रध्दांजली सभागृह आणि लाॅकरची दुरूस्ती तसेच स्मशानात स्वच्छतेची गरज आहे. मे महिन्यात शहरातील सर्वच स्मशानांची दुरूस्ती करण्यासाठी डीपीआर तयार करण्याची घोषणा महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली होती. परंतू या घोषणेस पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील महापालिकेने कोणतेही काम केले नाही.  अत्यंत बकालीत अडकलेल्या नादुरूस्त शौचालयामुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शौचालयाची दुरूस्ती तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

या संदर्भात नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रतिनिधीने थेट गुरूवारी  कैलासनगर स्मशानभूमीची आतून-बाहेरून पाहणी केली. स्मशानाच्या प्रवेशदारातच मोठ्या प्रमाणात कचराकोंडी झाली असून अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांना नाकाला रूमाल बांधूनच आत प्रवेश करावा लागतो. यावेळी प्रतिनिधीशी बोलताना नागरिक म्हणाले की, स्मशानभूमीमधील सार्वजनिक शौचालय आणि इतर श्रध्दांजली सभागृह बांधून तब्बल तीस वर्षे झालेली आहेत. या वास्तू  अत्यंत जीर्ण झाल्या असून त्यातील भिंतींना मोठ-मोठे तडे गेल्याने सदर वास्तू कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. परंतू पाच महिने उलटल्यानंतर देखील दुरूस्तीसाठी काही हालचाली केल्या नाहीत. शौचालय आणि श्रध्दांजली सभागृहासमोरच कचर्याचे ढीग आहेत. बंद पथदिवे आणि पाण्याचा अभाव असल्याचे देखील नागरीक म्हणाले. महापालिकेकडून जी - २० च्या आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या नावाखाली मंत्र्यांच्या दिमतीखाली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे काम किती चांगले आहे, याचा वरिप्ठांवर भास निर्माण करण्यासाठी शहरभर फक्त जाहिराती, सुशोभिकरण , विद्युतरोषणाई व रंगरंगोटीवर वारेमाप जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली गेली. त्यामुळे कचर्यात गेलेल्या कोट्यावधींची उधळपट्टी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कारभार म्हणजे ‘दिव्या खाली अंधार’ असाच आहे.

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला वर्ग, तसेच नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतू याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारीवर्ग तसेच महानगरपालिका प्रशासकांना नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील त्यांना विकासकामांसाठी सवड मिळत नाहीए. महापालिका प्रशासकांचा अधिकार्यांवर अजीबात   वचक राहिलेला नाही. त्यामूळे आता पालकमंत्री संदीपान भुमरे व राज्यमंत्री अतुल सावे यांनी स्वतः  यात लक्ष घालून शौचालय , श्रध्दांजली सभागृह , नागरिकांना पुरेशी आसनव्यवस्था व दिवाबत्तीसह पाण्याची सोय करावी व इतर मुलभुत सुविधांचे काम तात्काळ पुर्ण करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत,अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कैलासनगर, बसैयेनगर, बायजीपुरा, संजयनगरातील नागरिकांनी दिला आहे.