छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश होऊनही मुलभुत सोयीसुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे.रस्त्यांविना नागरिकांनाचे हाल सुरू आहेत. अशा मुलभुत सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या सातारा, देवळाई परिसरातील वसाहतींसाठी महापालिकेने गुंठेवारी कायदा लागू करू करण्याच्या हालचाली सुरू करत सातारा,देवळाईकरांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आधी सोयी सुविधा द्या तसेच गुंठेवारी कायदा रद्द करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
मुलभुत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या सातारा, देवळाई परिसरातील दर्शनविहार सोसायटीसह बहुतांश रहिवासी भागात पावसाने कच्चे रस्ते अक्षरक्ष: पाण्यात बुडाले आहेत. गटार, पाणी, वीज या सुविधा नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.१० ते १२ वर्षांपासून या भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. तसेच ड्रेनेज, वीज व पिण्याचे पाणी या सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. येथील बहुतांश रस्ते अंत्यंत चिखलमय, निसरडे होऊन जातात.पाऊस थांबला तरी पाणी जाण्यास वाव नसल्याने रहिवासी भागात तळे कायम साचून राहते. त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी त्यावर उत्पन्न होणारे डास यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. दुचाकी किंवा अन्य वाहने घराबाहेर काढून बीड बायपास पर्यंत आणण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. या भागातील नागरिकांनी घरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी दारासमोरच शोषखड्डे तयार केले आहेत.त्यातून ते घाण पाणी जिरवण्याचा प्रयत्न करतात.परिसरात खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया वा अन्य आजारांची साथ वाढण्याचा या भागात नेहमीच धोका आहे. विशेष म्हणजे बोअरच्या पाणी दुषित होऊन काॅलरा, गॅस्ट्रोची लागण असे आजार वाढण्याचा धोका कायम आहे. परिसरात डाबक्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने वर्षानुवर्षे डाबके कायम राहते.
अशा सुविधांची बोंबाबोंब असताना नागरिकांना मुलभुत सोयीसुविधांचे कर्तव्य बजावण्याचा विसर पडलेल्या महानगरपालिका प्रशासनाने सातारा, देवळाई परिसरातील एक लाख ते दीड लाख घरांना गुंठेवारी कायदा लागू केला आहे. त्यामुळे आपली घरे नियमित करण्यासाठी या भागातील मालमत्ताधारकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आधी सातारा, देवळाईला मुलभुत सोयीसुविधा द्या असे म्हणत गुंठेवारी कायद्याला विरोध केला आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने बुधवारी भर पावसात सातारा व देवळाई परिसरातील वॉर्ड कार्यालय, लक्ष्मी कॉलनी, आमदार रोड, अलोकनगर, नाईकनगर, सारा सिद्धी, छत्रपतीनगरासह म्हाडा काॅलनी, दर्शन विहार सातारा, देवळाई गावठाण व इतर ठिकाणी भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डाॅ. विनायक निपुण, आस्तीककुमार पांण्डेय व आत्ताचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर तीव्र शंब्दात संताप व्यक्त केला. यातील सर्वच बड्या अधिकाऱ्यांनी सातारा, देवळाईची पाहणी केली. मात्र आमचे प्रश्न कधी संपणार? असा सवाल महिलांनी.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकास होईल, असे वाटले होते; मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे. ग्रामपंचायत असताना नागरिकांना मोफत पाणी मिळत होते; रस्ते दुरूस्त केले जात होते. दिवाबत्तीची सोय केली जात होती. पण आता महापालिकेला कर भरूनही कोणत्याच सुविधा मिळत नाही. नवीन पाणीपुरवठा योजना होईपर्यंत किमान तीन वर्ष आम्हाला पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. बांधकाम व्यावसायिकांनी तुम्हाला सेवा-सुविधा का दिल्या नाहीत, असा प्रश्न टेंडरनामाने केला असता, आता या भागात सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आमच्याकडून कर घेतात, वेळेत भरला नाही, तर शास्ती लावतात . परंतु सुविधांसाठी कानाडोळा का करतात असा सवाल देखील महिला-नागरिकांनी केला.