Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कधी झळकणार सोनेरी महाल?; केंद्रीय मंत्र्यांची घोषणा कागदावरच

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एखाद्या चित्राप्रमाणे वास्तूरचनेचा उत्तम नमुना असलेला सोनेरी महाल इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. पर्यटकांना अधिक आकर्षक करण्यासाठी या ठिकाणी लाईट ॲण्ड साउंड शो सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय वित्त राज्यमंत्र्यांनी केली होती. त्यासोबतच सोनेरी महालाचे मूळ सौंदर्य जपत देखभाल दुरुस्तीसह नूतनीकरण व पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी काही कामे हाती घेण्याचे नियोजन पुरातत्व खात्याकडून आखण्यात आले होते. केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतर या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे कामही पुरातत्व विभागाने हाती घेतले होते. मात्र पुढे मंत्र्यांची घोषणा "हवेत" विरली. केवळ जी-२० च्या धर्तीवर सोनेरी महलाची रंगरंगोटी करण्यातच धन्यता मानण्यात आली. महलाच्या चारही बाजूने आणि आतल्या भागात आकाशाला गवसनी घालणारे गवत आणि रानटी झुडपे महलाची शोभा घालवत आहेत. "टेंडरनामा" पाहणीनंतर पुरातत्व विभागाने गवत काढण्याची तत्परता दाखवली.

सद्यस्थितीत सोनेरी महालाच्या वरच्या मजल्यावर राज्य पुरातत्व विभागाचे प्रशासकीय  कार्यालय आहे. तर खालच्या मजल्यात प्राचीन वस्तूसंग्रहालय आहे. तोफा, तलवारी, बंदूक, ढाल आणि इतर ऐतिहासिक वस्तू पर्यटकांना पाहण्याची सुविधा आहे. तर महाल परिसराच्या चबुतऱ्यावरील आणि दर्शनीभागातील जागेतील कारंजेही बंद असल्याचे पर्यटकांनी सांगितले. सोनेरी महाल ही ऐतिहासिक वास्तू सातारा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आहे. बुंदेलखंडातील सरदार पहाडसिंग यांनी या महालाची निर्मिती केली आहे. १६५१ ते १६५३ या काळात हा महाल बांधला गेला असावा, असे मानले जाते. निसर्गसंपन्न परिसरात उभारलेल्या महालाचे विविध पैलू आहेत. मात्र, मुबलक पाण्याची सोय असताना बंद पडलेले कारंजे, गवतात हरवलेला बगीचा आणि भक्कम तटबंदीच्या पाठीमागे साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे सोनेरी महाल ही वास्तू पर्यटकांसाठी नकोशी झाली आहे.

सध्या महालाच्या वरील भागात राज्य पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तर खालच्या मजल्यावर प्राचीन वस्तूसंग्रहालय आहे. तोफा, तलवारी, बंदूक, ढाल आणि इतर ऐतिहासिक वस्तू पर्यटकांना पाहण्याची सुविधा आहे. तर महाल परिसरात कारंज्यांची जागा अजूनही अस्तित्वात आहे. यात प्राचीन रूप जपण्यासाठी घडीव दगड बसवल्यामुळे महालाच्या मूळ सौंदर्यात भर पडली आहे. वास्तू पाहिल्यानंतर पर्यटकांना प्राचीन काळाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी या ठिकाणी लाइट ॲण्ड साउंड शो सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा १३ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी केली होती. त्यासोबतच महालाचे मूळ सौंदर्य जपत देखभाल दुरुस्तीसह नुतनीकरण व पर्यटकांच्या सोयी सुविधा उभारणे, उद्यान विकास यासह अन्य विकासकामे करण्याचे नियोजन करण्याबाबत त्यांनी पुरातत्व विभागाला सूचना केल्या होत्या. या विकास प्रकल्पासाठी  कराड यांनी पुढाकार घेतल्याची वार्ता पसरल्याने छत्रपती संभाजीनगरकरांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना याबाबत प्रस्ताव सादरही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसेच जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे कराड म्हणाले होते.

वर्षभरापासून घोषणेची प्रतीक्षा

गेल्या काही वर्षांपासून सोनेरी महाल परिसरात छत्रपती संभाजीनगर-वेरुळ महोत्सव आयोजित करण्यात येतो. यानिमित्ताने अनेक दिग्गज कलाकार  त्यास हजेरी लावतात. देशी-विदेशी पर्यटक व रसिक येतात. मात्र केवळ या महोत्सवापुरतीच बागेतील व महालाची स्वच्छता केली जाते. नंतर वर्षभर पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यातही पर्यटकांना अधिक आकर्षक करण्यासाठी या परिसरात लाइट ॲण्ड साउंड शो सुरू करणे तसेच पर्यटकासाठी सोयी सुविधा उभारण्याचा कराडांनी व्यक्त केलेला मानस आणि त्यादृष्टीने प्रयत्न झाले नसल्याने पर्यटक व छत्रपती संभाजीनगरवासीयांची थट्टाच केली, असे मत व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात राज्य पुरातत्व विभागाशी संपर्क केला असता कराडांनी घोषणा केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नसल्याने आम्ही काहीही हालचाली केल्या नाहीत. आता या कामासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध होणार आहे. लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.