Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बाॅटनिकल उद्यानात स्वच्छतागृह बंद; उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-आठ परिसरातील बाॅटनिकल उद्यानात येणाऱ्या उद्यान प्रेमींसाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह, चेंजिंग रूम बांधण्‍यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील स्वच्छ्ता गृहाचे बांधकाम देखील पूर्ण करण्‍यात आले आहे. मात्र सहा ते सात महिन्याचा काळ लोटुनही अद्याप उद्यान प्रेमींसाठी व येथील कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाचा वापर सुरू करण्यात आला नाही.

यासंदर्भात असंख्य जागृक नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी बारापर्यंत उद्यानाची पाहणी केली. दरम्यान नवाकोऱ्या स्वच्छतागृहाच्या इमारतीला उद्‌घाटनाची प्रतीक्षा असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्वच्छतागृह बांधले खरे पण लोकार्पणाच्या नावाखाली बंद ठेऊन नागरिकांची अडचण वाढवत बांधकाम विभाग व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने उद्यानप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सिडको एन-आठमधील बाॅटनिकल उद्यानात बच्चेकंपनीसाठी झुकझुक गाडी आणि याच उद्यानालगत पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानातील तलावात बोटींग सुरु केल्याने व बच्चेकंपनीसाठी विविध खेळण्या सुशोभिकरण केल्याने तब्बल साडेतेरा एकर जागेत विस्तीर्ण पसरलेल्या या दोन्ही उद्यानात हजारोच्या संख्येने उद्यान प्रेमी येतात. दोन्ही उद्यानांना तिकिट आकारण्यात येत असल्याने चिमुकल्यांसोबत येणारे आजी आजोबा, पालकवर्ग तसेच शतपावली करण्यासाठी दुरवरून येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी बाॅटनिकल उद्यानाच्या आवारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व चेंजिंग रूम बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत  मंजुरी मिळाली. १५ लाख रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाला. स्वच्छतागृह सहा ते सात महिन्यांपूर्वीच बांधून पूर्ण झाले. स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन कधी होणार, याला मुहूर्त कधी मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.यासोबतच बाॅटनिकल उद्यानाप्रमाणेच नेहरु उद्यानात स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावी, अशी मागणी उद्यानप्रेमींनी केली आहे.