Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बीड बायपासच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्याला 'बायपास' करणार्‍या मनपावर नागरिक का संतापले?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बीड बायपासच्या दुतर्फा विकास आराखड्यातील बंदिस्त सर्व्हिस रस्ता मोकळा करावा, चुकीच्या अंदाजपत्रकानुसार बांधण्यात आलेल्या बीड बायपासच्या बांधकामात सुधारणा कराव्यात यासाठी सातारा-देवळाईसह बीड बायपास परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. टेंडरनामाने याबाबत वृत्त प्रकाशित केले. अनेकांनी बीड बायपासच्या संदर्भात महत्वाच्या सुचना व्यक्त केल्या. अनेकांनी वळण मार्गावर वाहतुक सिंग्नल, दिशादर्शक फलक, वाहतुकीची स्पीड मर्यादा असणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, पांढरे पट्टे व अतिक्रमण मुक्त बीड बायपास करण्याच्या सुचना केल्या. नियमबाह्य पद्धतीने तयार केलेला दुभाजक तोडून ज्यात झाडी व पथदिवे लावता येतील असा दुभाजक तयार करावा तसेच बीड बायपायपासच्या सर्व्हिस रस्त्यावरील वाहनांची पार्किंग तातडीने कायमस्वरूपी बंद करावी, अशा सुचना देखील नागरिकांनी केल्या. नागरिकांच्या सर्व सुचना प्रतिनिधीने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पाठविल्या आहेत.आता ते काय तोडगा काढतात यावर टेंडरनामाचे लक्ष असेल.

काय म्हणतात सातारा-देवळाईकर

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खाली वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे.अजूनही वाहनधारकांना कोणत्या दिशेने वळवावे हे वाहतूक पोलिसांना देखील कळत नाहीऐ. दररोज पुलाखाली एकमेकांच्या वाहनांना धक्के खावे लागत आहे. यामुळे दररोजची कटकट वाढली आहे. यातून अपघातही होत आहेत. संग्रामनगरच्या उतारापासून पुढे बीड बायपासच्या दुसऱ्या पुलाच्या वळण मार्गावरच अनधिकृत भाजी मार्केट भरल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व भाजी मार्केट रस्त्यावर येणार नाही यासाठी पोलिसांची संख्या वाढवावी. असाच प्रकार रेणुका देवीच्या कमानीच्या चौकात झालेला आहे. इथे सुद्धा कधी कसा अपघात होईल सांगता येत नाही. वाहतुकीचे सिग्नल लाईट बसवणे गरजेचे आहे. त्याही पेक्षा धोकादायक चौक म्हणजे आयपा मंदिराकडे जाणारा चौक. येथे ना काही सिग्नल, ना कोणत्या प्रकारची मार्किंग.  देवळाई चौकाकडून येणारे वाहनधारक, रोड क्रॉस करणारे वाहनधारक, दोन्ही बाजूला दोन पेट्रोल पंपांकडून ये-जा करणारे वाहनधारक, शाळेच्या बसेस, विद्यार्थ्यांचे रिक्षा इत्यादींची रेलचेल झालेली आहे.मुळातच बीड बायपास रोडचे रुंदीकरण समाधानकारक नाही. बीड बायपासच्या दुतर्फा ६० मीटर मनपा हद्दीतील सर्व्हिस रस्ता ताब्यात घेऊनच बांधकाम विभागाने रस्ता मोठा करायला हवा होता. चौका चौकात वाहतूक सिग्नल बसवणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांची ही नियुक्ती करणे गरजेचे आहे.

- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा देवळाई जनसेवा कृती समिती

बीड बायपास रस्त्याचे काम अद्याप सुरू आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पण कुठेच वाहतुक नियमांचे बोर्ड नाहीत. रोड फर्निचर जसे की, रेडियम किटकॅट ऑईज, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे, नाहीत. कोणी कसेही गाडी वळवतात. वाहतुक पोलिस हा प्रकार माहीत नसल्यासारखे दुर्लक्ष करत ते ऐका कोपऱ्यात तंबाखू चोळत किंवा मोबाइल वर गप्पा मारीत उभे असलेले दिसतात. संग्राम नगर उड्डाणपूलाची परिस्थिती तर भयाण आहे . प्रचंड भार यापुलावर आणि खाली आहे.  पण वाहतुकीचे कुठलेही नियमन नाही. दुचाकी दोघांसाठी असते हे लोकं विसरले. धाक आणि भीती ही राहीली नाही. यात शंंकाच नाही. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या आसपास भाजी व फळविक्रेत्यांनी रस्ता पार व्यापून टाकला आहे. सकाळी व संध्याकाळी तसेच सनावाराच्या दिवशी या भागात पायी चालणे अवघड होते. स्कुटी वगैरे चालवणे फार अवघड होते. वाहतुक पोलीस आणि मनपा अतिक्रमण पथकाचे याकडे अजिबात लक्ष नाही. एखाद्या मोठ्या अपघातात  बळी गेल्यानंतर यंत्रणेला जाग येणार काय ?

- शंतनु पोळे, सातारा परिसर, रहिवासी

उड्डाणपूलांखाली सिंग्नल आणि जिथे युटर्न आहेत तिथे ब्लिंकर्स तरी लावायला पाहिजेत. बायपासच्या सर्व्हिस रस्त्यावर चुकीच्या दिशेने प्रवास करणारे वाहनधारकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जबिंदा ग्राउंड आणि हायकोर्ट कॉलनीकडे जाण्यासाठी जो रुट आहे तिथे वळण मार्गावरच एक मोठी खदान आहे. तिथून गौण खनिजाच्या हायवाट्रक स्पीडने रोडवर येतात , साईडलाच वाइन्शॉप आहे.तिथुन डुलक्या घेत मद्यपी रस्त्यावर येतात. पुलाच्या खाली चक्क बाटल्या घेऊन दारू पित बसतात. भाजी विक्रेत्यांचा वेगळाच त्रास आहे. राष्ट्रीय महामार्गावर ग्राहक गाड्या लाऊन खरेदी करतात. लोक कायदा हातात घेऊ शकत नाहीत. कायद्याची घोंगडी आणि काठी गार झालेली आहे. प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही.  बायपासवर २४ तास   रहदारी वाढली आहे. सिग्नल असेल तर अपघाताचे प्रमाण रोखता येईल व चुकीच्या मार्गाने प्रवास करणार्यांना रोखता येईल. मुळात संपूर्ण बीड बायपास रस्त्याचा आराखडा चुकलेला आहे. रस्ता करायचा म्हणून केलेला आहे.हे या रस्त्याच्या वाहतुकीवरूनस्पष्ट होत आहे.  एक तर कॉन्ट्रॅक्टरने मुदतीत रस्ता पुर्ण केला नाही. काम चालु असतानाच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा बळी गेला.कसेबसे रस्त्याचे काम पूर्ण केले. आता वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.  निकृष्ट दुभाजक वाहनांच्या धडकेत फुटलेत.सर्व्हिस रोडलगत लोखंडी बॅरिकेड्स देखील वाटलेच. ब्रीजमध्ये तडे गेलेले आहेत. रस्ता क्रॉस करताना सतत राँग् साईड वाल्या वाहनधारकांचा सामना करावा लागतो. नव्या रस्त्यावर खड्डे आणि क्रॅक पडले आहेत. उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण केलेले नाही. मोकळ्या जागांचा वापर रात्री खुली मधुशाळा आणि जुगार अड्डयासाठी होत आहे. बीड बायपास रात्री ९ नंतर महिलांसाठी असुरक्षित ठरत आहे. शिवाजीनगर रेल्वे रूळ आणि बीड बायपासवर मास विक्रेत्यांचे अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करत मार्ग काढावा लागत आहे.  बीड बायपासवरील  सव्हिर्स रोड "असून अडचन नसून खोळंबा " अशी गत झाली आहे. रस्त्याचा बेकायदा पार्किंग म्हणून वापर होत आहे. नेहमी चारचाकी व ट्रक उभ्या केल्या जात असल्याने वाहन चालविणे अवघड होत आहे. 

- स्मिता पटारे, सदस्या, जनसेवा महिला कृती समिती, सातारा

बीडबायपासला सर्व्हिसरोडला जोडणी चुकीची झाली आहे. उड्डाण पुलावरून थेट वाहनधारक रस्ता क्रॉस करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. यात बीडबायपासवरून जड वाहने थेट गतीने बायपासच्या सर्व्हिस रोडला कनेक्ट होत आहेत.त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन सर्व्हिस रोडवर प्रवास करावा लागत आहे. सायकलस्वार विद्यार्थ्यांनाजास्त धोका निर्माण झाला आहे. बीड बायपास दत्त मंदिर जवळ तर खूप अपघात होत आहेत. मनपाने पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा स्वतंत्र सर्व्हिस रस्त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- सुचिता कुलकर्णी, रहिवासी, देवळाई परिसर.

आधीच बीड बायपास रस्ता ३० मीटर इतकाच रूंद होता. त्यात मुख्य रस्त्याच्या लेन कमी करून आहे, त्याच रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार केला. त्यापेक्षा हा रस्ता चार पदरी करून मनपा हद्दीतील विकास आराखड्यातील सर्व्हिस रोड मोकळा करायला हवा होता. संग्रामनगर उड्डाण पुलावरून खाली आल्यावर राधा मंगल कार्यालयाकडे अर्थात आमदार रोडकडे जातांना सर्विस रोड नाही तसेच गोदावरी ढाबालगत पेट्रोल पंपाकडून येणारे वाहने त्याच रोडवर चुकीच्या दिशेने येतात. पर्यायी रस्ताच  नसल्याने समोरासमोर वाहने येऊन धडकतात. बीडबायपासच्या सर्व्हिस रोडवर चारी खोदुन लोखंडी बॅरिकेड्स न लावता झाडी लावली असती, तर धुळीचे प्रमाण कमी झाले असते.

- चंदा जाधव, सदस्य, जनसेवा महिला समिती.

बीड बायपासलगत रेणुका माता मंदिर कमानी समोर जुन्या मुख्य रस्त्यावर संघर्ष समितीच्या प्रयत्नाने स्पीड ब्रेकर टाकलेले होते. मात्र वाहतुकीचा वेग पाहता ते फुटले. मनपाने तात्काळ  स्पीडब्रेकर मुख्य रस्त्यावर टाकणे गरजेचे आहे. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रेणुका माता कमानी समोरील भागातून रस्ता ओलांडणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे तेथे बरेच वाहन चालक रस्ता ओलांडताना कन्फ्युज असतात. रेणुका माता कमान ते अहिल्याबाई होळकर चौक या रोडवर दोन-तीन ठिकाणी मध्ये डेअरी जवळ आणि थोडसं कमानीत पाच ते आठ या वेळी पायी चालणं सुद्धा अवघड झालंय .ट्रॅफिक नियमांच पूर्णपणे उल्लंघन होत आहे..तिथे इतकी ट्रॅफिक जाम होत असते, की तिथेकोणी लक्ष देत नाही आणि तिथले किराणा दुकानदार ,दूध डेअरी वाले ,आणि भाजीवाले दुकानाच्या बाहेर माल लावतात आणि त्याच्या बाहेर लोक उभे राहतात त्यामुळे गाड्या पूर्ण रस्त्यावर येतात कार सोडा टू व्हीलर नेणं सुद्धा अवघड जात.रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई होळकर हा रस्ता  पाईप लाईनसाठी एकाबाजूने खोदण्यात आला. त्यामुळे जवळपास  3 फूट रुंदी कमी झालेली आहे. या  रोडवर काही अतिक्रमण आहे ते काढून रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे तसेच कमानीच्या बाजूला जि जागा आहे तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे

- हनुमंत सोनवणे, सदस्य, सातारा-देवळाई विकास समिती.

बीड बायपास रस्त्यावरील जाळ्या अत्यंत  धोकादायक आहेत. रस्त्याचे काम पूर्ण होण्याआगोदरच त्या जागोजागी वाकल्या आहेत. त्यावर धडकून अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत... त्यावर उपाय होणं गरजेचे आहे.सर्वात जास्त त्रास म्हणजे शहानुर मियाॅ दर्गा पूल उतरल्या पासून आहे. उतारावरच रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर व रस्त्यावर सर्व अतिक्रमण झाले आहे. इतका मोठा रस्ता असून सकाळ पासून रात्री पर्यंत ट्रॅफिक जाम असते , गोदावरी ढाबालगत संग्रामनगर उड्डाणपुलावर चौक व रस्ते पूर्ण मोकळे झाले  पाहिजेत.
सर्व परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे या रोडवर वाहने खूप सुसाट वेगाने वाहतात येथे पण मोठ्या चौकामध्ये  गतिरोधक पाहिजे. गतिरोधक टाकायला काय अडचण आहे,हे कळतच नाही.या रोडवर गतिरोधक ची मागणी खूप दिवसापासून आहे पण कोणीच मनावर घेत नाही. आमच्या भागातील नागरिकांनी ऑनलाईन पोर्टलवर कंप्लेंट टाकली होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.फॉर्च्यून पार्क जवळ विश्वकर्मा चौकात बऱ्याच वेळा छोटे-मोठे अपघात होतात.आतापर्यंत रेणुका पुरमच्या रहिवाशांचे छोटे मोठे तीन चार वेळा अपघात झालेले आहेत.

- पद्मसिंह राजपुत, उद्योजक, सातारा परिसर.

याशिवाय या भागातील अनिता कुमावत, सोनाली बोरसे, सुनिल वारके, श्रीकांत हुलीयारकर, स्मिता अग्नीहोत्री, राजेंद्र नारळे, याकुब शेख, सुनिल कुलकर्णी, दिपक सुर्यवंशी, असद पटेल, सोमीनाथ सुर्यवंशी, आबासाहेब देशमुख, तुकाराम जोशी, दत्ता जोशी, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, चतरसिंग राजपुत, सुरेश बोर्डे, अजिंक्य पाटील, दिलीप पाळदे,लक्ष्मीकांत जाधव, कुसुम मते, मीना वाढेकर, भानुदास जाधव, ॲड. शिवराज कडु पाटील व वैशाली कडु पाटील, मंगल थोरात इतर शेकडो नागरिकांनी टेंडरनामाच्या अभ्यासात्मक बातमीचे कौतूक केले व नियोजन शुन्य कारभाऱ्यांच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे.