छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा परिसरातील गट नंबर १४८ मधील चंद्रशेखरनगरातील अंतर्गत रस्त्याची पार वाट लागली आहे. संपूर्ण रस्ते चिखलाचे झाल्याने या भागात पाण्याचे टँकर, भाजीपाल्याची गाडी, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने देखील येत नाही. येथील एका मुख्य रस्त्यासाठी आमदार पावले, त्यांनी सरकारकडून ५० लाखाचा निधी मंजुर करून आणला, सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर देखील काढले, वर्क ऑर्डर पण झाली. ठेकेदाराने पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याचे काम देखील सुरू केले. खोदकाम करून खडी पसरवली. मात्र पावसामुळे अडचण झाली. बांधकाम साहित्याच्या गाड्या चिखलात फसू लागल्याने कामच बंद करावे लागले. सद्यःस्थितीत पावसाळ्याच्या दिवसांत पर्यायी रस्त्यावर चिखल साचल्याने विद्यार्थ्यांसह, रूग्ण वअन्य नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सातारा परिसरातील चंद्रशेखर नगरातील नागरिकांचे पक्क्या रस्त्याअभावी मोठ्याप्रमाणावर हालापेष्टा सुरू आहेत. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात या भागात एका मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले होते. मात्र पावसाळ्यापूर्वी एकाच वेळी ड्रेनेजलाईन आणि जलवाहिनीचे काम झाल्याने रस्त्याची तोडफोड करण्यात आली. टेंडरमधील अटीशर्तीनुसार रस्त्याची दुरूस्ती करणे संबंधित ठेकेदारांची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळा सुरू होताच येथील रस्त्यांची घसरगुंडी झाली. लोक पायी चालताना देखील घसरून पडत आहे. दररोज याभागात किरकोळ अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे पावसाळ्यापूर्वीच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते.
याभागात अद्याप महापालिकेचे पाणी पोहोचले नाही. पिण्यासाठी आणि दररोजच्या वापरासाठी बोअरच्या पाण्यावर भिस्त आहे. मात्र बोअरही आटल्याने खाजगी टँकरवर नागरिकांना अवलंबुन राहावे लागत आहे. मात्र चिखलामुळे टँकरही मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यात परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याभागातील काॅलनी अंतर्गत किराणा दुकानं आहेत. मात्र चिखलामुळे त्यांना मालाचा पुरवठा करणारी एजन्सीची वाहने येत नसल्याने व्यापारी देखील हवालदिल झाला आहे. स्वतः खरेदीसाठी गेले तरी दुकानापर्यंत ओझे वाहनाद्वारे आणता येत नाहीत. साधी भाजीपाल्याची आणि घंटागाडी देखील येत नसल्याने महिलांपुढे दररोजचाच प्रश्न पडला आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बसेस आणि रिक्षा येत नाहीत, मुलांना शाळेत सोडवताना धड पायीही चालता येत नाही. परिणामी मुलांना शाळा बुडविण्याशिवाय पर्यात राहत नाही. ड्रेनेजलाईन आणि जलवाहिनीचे एकाच वेळी पावसाळ्याच्या तोंडावर काम करण्यात आले. त्यामुळे होता त्या रस्त्याचा आधारही हिरावला.
आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नाने नगरातील मुख्य रस्त्यांसाठी ५० लाखांचा निधी नगर विकास खात्याने मंजुर केला, ठेकेदारही नेमला, पण रस्ता बांधकामाची सुरवातच उशीरा झाल्याने आता पावसाळ्यात या रस्त्याचे काम थांबले आहे. याउलट रस्त्यावर खडी पसरल्याने वाहने घसरून पडत आहेत. मुळात आठ वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाईचा विकास झालाच नाही. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व लोकप्रतिनिधींचा डोळेझाकपणा यामुळे हाल होत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे. तूर्तास रस्ते होतील तेव्हा होतील वाहतुकीसाठी आणि पायी चालण्यासाठी निदान खडीकरण व मजबुतीकरणाचे काम तरी महापालिकेने हाती घ्यावे, अशी केविलवाणी मागणी याभागातील नागरिक करत आहेत. मात्र त्याकडे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकवर्गणीतून लोक रस्त्यावर मुरूम टाकत आहेत. मात्र त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, येणाऱ्या-जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.