Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अतिक्रमणांनी अडकली नौबत दरवाजा ते पंचकुआ सिमेंट रस्त्याची दुसरी वाट

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या शहरातील मुख्य नौबत दरवाजा ते कोहीनूर प्लाझा लगत पंचकुआ कब्रस्तान पुलापर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या कामावर "टेंडरनामा"ने सुरुवातीपासूनच लक्ष ठेवले आहे. अत्यंत कासवगतीने सुरु असलेल्या या कामावर वाचा फोडताच कंत्राटदाराने नौबत दरवाजापासून ते पंचकुवा कब्रस्तान ते कोहीनुर प्लाझा नाल्यांपर्यंत पूर्वेकडील एका बाजुचे काम पूर्ण केले आहे. मात्र आता नौबत दरवाच्या पश्चिमेकडील बाजूने ॲप्रोच रस्ता अतिक्रमणात अडकल्याने काम बंद असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. परिणामी कामासाठी खोदून ठेवलेला रस्ता आणि नौबत दरवाजाच्या दिशेने मोठा मातीचा उतार आणि पंचकुआ कब्रस्तानपुढे नाल्यावरील चढ, त्यात आसपासच्या वसाहतीतील वाहुन आलेले डाबके साचल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. 

रस्त्याच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेतील  बांधकाम, नगरविकास आणि अतिक्रमण विभागाचा अद्याप ढिम्म कारभार असल्याचे "टेंडरनामा" तपासात समोर आले आहे. यापूर्वी रस्त्याचे काम चालू असताना महानगरपालिकेचे अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला होता. यावर "टेंडरनामा"ने वाचा फोडताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला जागे करत रस्त्याची एक बाजू पुर्ण केली. मात्र, पुन्हा दुसऱ्या बाजूने अतिक्रमण "जैसे थे" असल्याचे म्हणत कंत्राटदाराने काम बंद करून यंत्रणा पसार केल्याने या भागासह प्रवाशांच्या हाल अपेष्टा वाढल्या आहेत. या रस्त्यासाठी तीन कोटींचे टेंडर महापालिकेच्या वतीने काढण्यात आले होते. मकरूम सिद्दीकी या कंत्राटदारामार्फत काम सुरु करण्यात आले आहे. सध्या किलेअर्क परिसरातील व्हीआयपी रस्ता ते नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्तान पुलापर्यंत मुख्य रस्त्याचे दरवाजाच्या बाजूला एका बाजूने काम पुर्ण झाले आहे.रस्ते कामात दोन्ही बाजूंना स्ट्राम वाॅटर यंत्रणा, फुटपाथ आणि सुशोभीकरण आदी कामांचा समावेश असल्याने शहरात एकमेव आदर्श रस्ता ठरणार आहे. मात्र याठिकाणी सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यास किमान अजून किती दिवस लागतील, याचे उत्तर देताना कंत्राटदाराने महापालिकेतील नगररचना व अतिक्रमण विभागाकडे बोट दाखवले आहे.

हा रस्ता एका बाजूने पुर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत त्याच्या बाजूने स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा उभारणीचे व पंचकुवा कब्रस्तानापर्यंत उद्यानाचे काम हाती घेण्यात येणार आहे. पण नौबत दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने जोड रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने अद्याप अतिक्रमण काढुन कंत्राटदाराला रस्ता मोकळा करुन दिला नाही. त्यामुळे एकाच नव्या रस्त्यावर वनवे ट्राफीक सुरू असल्याने रस्त्यावर वाहतुकीचा भार वाढल्याने रस्त्याला क्षती पोहोचू शकते. याशिवाय एकाच बाजूने कोंडी वाढल्याने अपघाताची शंक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूने रस्ता खोदलेल्या ठिकाणी केवळ खडी मुरुम करून रोलरने दबाई करून दिलेला आहे. परिणामी रस्त्यात  चिखल झाल्याने या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवासी घसरून पडत आहेत.दररोज अशा दहा ते पंधरा घटना घडत असल्याचे नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नौबत दरवाजा ते किलेअर्क एका बाजुने अतिक्रमण काढून रस्त्याचे काम कसेबसे पुर्ण झाले. नौबत दरवाजापासून पुढील दुसऱ्या बाजूचा रस्ता अतिक्रमणाने बाधित आहे ; परंतु महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदारामार्फत काम करण्यास विलंब होत आहे. नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्तान पुलापर्यंत रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

कंत्राटदाराकडून आता रस्त्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण त्यांच्याकडून सांगितले जात आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी  मागणी या भागातील नागरिक करत आहेत. किलेअर्क परिसरातील व्हीआयपी रस्ता ते नौबत दरवाजा ते पंचकुआ कब्रस्तानकडुन हा रस्ता रोहीलागंल्ली, सिटीचौक, बुढीलाईन, लोटाकारंजा, पैठणगेट, गुलमंडी, सब्जीमंडी, कासारीबाजार, दिवानदेवडी, रंगारगल्ली, खोकडपुरा व औरंगपुरासह महत्वाच्या बाजारपेठेत जात असल्याने सिडको- हडकोसह नागरिकांसाठी महत्वाचा रस्ता आहे. अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहतूककोंडी आणि अपघाताची संख्या वाढत असल्याने  नागरिकांचा पारा वाढलेला आहे.