Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शहरविकास आराखड्यातील 'हा' साठ फूट रस्ता अतिक्रमणांनी पुन्हा अडविला

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दमडीमहल ते चंपाचौकपर्यंतचा शहर विकास आराखड्यातील ६० फुटाचा रस्ता रूंद आहे. परंतु दोन्ही बाजूला होत असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंग तसेच दोन्ही बाजूच्या किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वापरातील रस्ता अरूंद बनला आहे. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. या रस्त्यावरून चालत जातानाही अडथळ्यांशी सामना करावा लागतो.

दमडी महल-चंपाचौक-रेंगटीपुरा-जुना मोंढा- ते जालना रोड हा रस्ता १९९१ च्या शहर विकास आराखड्यात साठ फुटाचा रस्ता आहे.‌मात्र विकास आराखडा तयार करण्यापूर्वीच गुंठेवारी या मार्गावर जवळपास सहाशे मालमंत्ता आहेत. दमडी महल ते चंपाचौक हा रस्ता ३० मीटर रोड प्रशस्त आहे.मात्र  दोन्ही बाजूला असलेले भंगार विक्रेते, गॅरेजधारक आणि नागरिक वाहने रस्त्यावरच पार्किंग करतात. त्यामुळे दोन्ही बाजूचे पार्किंग नित्याचेच असते‍. चंपाचौकात रस्त्यावरच रिक्षा थांबाही आहे. शहरातून उत्तर-दक्षिण  दिशेने जाणारे बस, अवजड वाहने, कार, दुचाकी याच रस्त्याने जातात. दोन्ही बाजूच्या पार्किंगमुळे आमने-सामने दोन मोठी वाहने आल्यास जाऊ शकत नाहीत.अनेकवेळा संबंधित वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत असतात.गॅरेजवाल्याच्या  भंगार वाहनांची पार्किंग चंपाचौक ते दमडीमहल मार्गाच्या दुभाजकाच्या मधोमध पार्किंग केलेली आहेत. येथील गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे वाहतुकीला अडथळा होईल असे पार्किंग काढावे, असे कोणी सांगण्याचाही प्रयत्न करत नाही.

रस्त्याच्या मधोमध भंगार वाहनांची थप्पी दिसत असताना देखील वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेतात. अंत्यंत वर्दळीच्या या मार्गावर चारचाकी वाहन जात असल्यास त्या मागे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. ओव्हरटेक करण्यासाठी देखील संधी मिळत नाही. परिणामी कामावर वेळेत पोहोचण्याचे नियोजन केलेल्यांचे ‌उद्दि‌ष्ट साध्य होत नाही. चंपाचौकापासून रेंगटीपुरा ते कैसर काॅर्नरपर्यंत  मुख्य श दोन्ही बाजूला मांसविक्रेते, बांबू, टिनपत्रे विक्रेते आणि गॅरेज तसेच पानठेले, रेडिमेड कपडे, आदी‌ वस्तू विक्रीची दुकाने आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची दुचाकी दुकानासमोर लावलेली असते. काही विक्रेते रस्त्यावर बसलेले असतात. त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना रस्त्यावरच ‌थांबावे लागते. शहागंज भागात मोठ्या संख्येने लोक येतात. यामुळे चौकापासून रेंगटीपुरा, कैसर काॅलनीपर्यंत यात्रेसारखी गर्दी असते. चालत जाणेही मुश्किल होते. सकाळी सात ते अकरापर्यंत गर्दी कायम असते.