Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : ग्रीन वेस्ट प्रकल्पाची आवश्यकता; उघड्यावर जाळला जातोय कचरा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरामध्ये उघड्या डीपींना, रस्त्यावरच्या झाडांना तसेच जलवाहिनी पाइपांना कचरा जाळल्यामुळे आग लागून अनेक भागात झाडं, पाइपं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. या घटनेकडून कोणताही धडा छत्रपती संभाजीनगर महाालिकेने घेतला नसून, शहरात सिडको एन-२ मुकुंदनगर हाउसिंग सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर, सिडको कॅनाॅट प्लेस वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या पाठीमागे, जालनारोडवर व अन्य भागात रोजच साचणारा कचरा तेथेच जाळला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जेथे कचरा जाळला जातो तेथेच मोठी केबल वायर, डीपी आणि झाडे आणि शहरभर नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाइप पडलेले आहेत. त्यावर देखील आत-बाहेर पडलेल्या कचऱ्याला आग लावली जात असून, कचरा जाळताना झाडं, डीपी आणि पाइपही जळतात.

वारंवार येथेच कचरा जाळण्यात आल्याने येथील झाडांचे खोड पूर्णत: जळाले असून, ते झाड कधीही कोसळू शकतात, अशी भीती संपुर्ण शहर परिसरातील विविध भागातील नागरिकांना आहे. तसेच येथील केबल वायरदेखील अर्धवट जळाली असून, तिच्या तारा पूर्णपणे उघड्या आहेत.यापूर्वी शहरातील विविध भागात डीपी, झाडं आणि पाइप जळाल्याच्या घटना घडल्यानंतर देखील महापालिका बोध घेत नाही.

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

शहरात ओला आणि सुका कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कंत्राटदाराच्या मुसक्या महापालिकेने अनेकदा आवळल्या. मात्र, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण योग्य रित्या केले जात नाही, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर रोख लावला जात नाही. रस्त्यांवर पडलेले कचऱ्याचे ढिग वेळेवर उचलले जात नाहीत. दारोदार घंटागाडी फिरवत कचरा संकलन केला जात नाही. यापूर्वी कंपनीला जबर बंद करण्याची तरतूद महापालिकेने अनेकदा केली आहे. त्यासाठी स्वच्छता निरीक्षकांना देखील जबाबदार धरले गेले आहे. मात्र शहरातील प्रत्येक रस्त्यावरील ओला, सुका व ग्रीन वेस्टचे पसरलेले ढिग पाहता महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, तसेच प्रभाग अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांचा कंपनीवर वचक दिसत नसल्याचे दिसून येत आहे.‌ शहर परिसरात विविध हॉटेल्स आहेत तसेच विविध पदार्थांच्या गाड्याही रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. फूड स्टॉलवाले कचरा याच परिसरात उघड्यावर टाकत असल्याने भटकी कुत्री, गायी यांचा इथे मुक्त वावर असतो.

महापालिकेने शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे सहा वर्षापूर्वी खासगीकरण केले आहे. बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कंपनीच्या कामाबद्दल नागरिकांकडून सतत तक्रारी प्राप्त होतात. कंपनीला कचऱ्याच्या वजनावर महानगरपालिका पेमेंट करते. प्रतिटन तीन हजार रुपये कंपनीला दिले जातात. कचऱ्याचे वजन वाढावे व जास्तीचे पेमेंट मिळावे यासाठी कंपनीचे कर्मचारी हातचलाखी करत असल्याची प्रकरणे यापूर्वी अनेकदा उघड झाली आहेत. कचऱ्याच्या गाडीत दगड, माती, विटा आढळून आल्या आहेत.या गैरकारभाराबाबत शहरातील विविध पोलिस ठाण्यात तत्कालीन घनकचरा प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशाने गुन्हे देखील दाखल केले आहेत.कंपनीकडून दुपारनंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला कचराही उचलला जात नाही, घंटागाड्यांबद्दलही तक्रारी आहेत. या सर्वांची दखल घेत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कंपनीवर अनेकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उचललेला आहे.

यापूर्वी कचरा संकलन पॉइंटवर तसेच वॉर्डांमधील अंतर्गत रस्त्यांवर पडलेला कचरा सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलला गेला नाही, तर रेड्डी कंपनीला पहिल्या दिवशी एक हजार रुपये , दुसऱ्या दिवशीही कचरा न उचलल्यास दोन हजार रुपयांचा दंड केला गेला आहे. याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर टाकण्यात आली होती. स्वच्छता निरीक्षकांनी वॉर्ड अधिकाऱ्याकडे दररोज अहवाल सादर करावा, असे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाने वारंवार दिले आहेत. घंटागाडी वॉर्डांमध्ये उशिरा येत असेल, घंटागाडीवरील भोंगा बंद असेल तर प्रतिघंडागाडी पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. कचरा वेचणाऱ्या व घंटागाडीवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज व अन्य सुरक्षा साहित्याची सक्ती करण्यात आली आहे. हे साहित्य स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे नसेल, तर १०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड कंपनीला केला गेला आहे. मात्र यातील कुठल्याही सुचना कंपनीकडून पाळल्या जात नसल्याचे समोर आले आहे.

ग्रीन वेस्ट प्रकल्पाची आवश्यकता 

आधीच अस्वच्छतेच्या बाबतीत जगभर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून चिकलठाणा, पडेगाव, हर्सुल येथे ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लॅंट उभारले आहेत. दुसरीकडे कांचनवाडी येथे ओल्या कचर्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे.‌ असे असताना शहरात कचराकोंडी मोठ्या प्रमाणात का दिसून येत आहे, हा संशोधनाचा विषय आहे.दुसरीकडे शहरातील ग्रीन वेस्टसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. कचर्याचे संकलन करणाऱ्या कंत्राटदारामार्फतही तो उचलला जात नाही. परिणामी शहरभर ग्रीन वेस्टे ढिग दिसून येत आहेत.‌ शहरात इंदुरच्या धर्तीवर शहर भरातून निघणाऱ्या ग्रीन वेस्टसाठी मोठ्या ट्रेंचिंग ग्राउंडची आवश्यकता आहे. तिथे हा सर्व कचरा डंप करून त्यावर योग्य ति प्लॅंटमध्ये प्रक्रिया केल्यास महानगरपालिकेला मोठे उत्पन्न मिळेल.‌ यासाठी इंदुरच्या धर्तीवर पीपीपी तत्वावर १५० टन क्षमतेच्या ग्रीन वेस्ट वर प्रक्रिया करणारा प्लांट उभारणे आवश्यक आहे. इंदूर महापालिकेच्या धर्तीवर शहरातील कांचनवाडी भागात मोठ्या प्रमाणावर सरकारी गायरान जमीन आहे. त्याभागात जागेची निश्चिती करून प्लाॅंट उभारण्यात यावा. यासाठी निवड झालेल्या कंत्राटदाराला इंदुरच्या धर्तीवर साडे तीन रुपये दराने प्रति किलो ग्रीन वेस्ट विकता येईल. यामुळे महानगरपालिकेला उत्पन्न देखील मिळेल.‌ छत्रपती संभाजीनगर महापालिकेमार्फत शहरातील ग्रीन वेस्टचा निपटारा करण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही. महावितरण कंपनी देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली वीजतारांना स्पर्श करणारी मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांवर घाव घालते. छाटनी झाल्यानंतर झाडांचे मोठमोठे बुंधे काही लोक जाळण्यासाठी घेऊन जातात. मात्र छोट्या फांद्या पालापाचोळा रस्त्यांवरच पडलेला असतो. महानगरपालिकेचा उद्यान आणि घनकचरा विभाग देखील याकडे लक्ष देत नाही.‌ जर हा सर्व पालापाचोळा,फांद्या व मोठमोठ्या बुंधे उचलून  ट्रेंचिंग ग्राउंड मध्ये डंप करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. शहरात दर पावसाळ्यात दिडशे ते दोनशे टन निघते. इतर दिवसात त्याचे प्रमाण ५० ते ७५ टन असते. हा सर्व ग्रीन वेस्ट ट्रेंचिंग ग्राउंड मध्ये डंप करण्यात यावा. 

असे करावे काम 

ज्या मोठ्या लाकडांपासून फर्निचर तयार होईल. त्या वेगळ्या काढण्यात याव्यात. ते फर्निचर वाल्यांना लिलाव काढुन विकता येऊ शकते. छोटे लाकुड, फांट्या व पालापाचोळा एजंन्सीला देण्यात यावा. त्याच्या बदल्यात एजंन्सीला प्रति किलो साडेतीन ते चार रूपये दर आकारावा. जेणेकरून महापालिकेच्या वाहतुकीचा खर्च वसुल होईल व संबंधित एजन्सी ग्रीन वेस्ट पासून लांब काठ्या तयार करून विक्री करेल.

असा होणार फायदा

- प्लांट सुरू झाल्यानंतर शहरातील ठिकठिकाणी दिसणारे ग्रीनवेस्टचे ढिगारे नष्ट होतील. जाळपोळ होऊन महावितरणची केबल, डीप्या व झाड पाइप जळुन नुकसान होणार नाही.‌

- ग्रीन वेस्ट वेळेवर उचलण्यात मदत होईल.‌ झाडांची छाटणी झाल्यानंतर वेळीच उचलले जाईल. 

महापालिकेने हे करावे

- ग्रीन वेस्ट उत्पन्नातून महानगरपालिकेच्या तिजोरीत भर पडून विविध विकासकामात पैसा खर्च करता येईल.  

- प्रत्येक वार्डात ग्रीन वेस्ट संकलन खोलावे. जेणेकरून तो ग्रीन वेस्ट नागरिकांनाही आणून टाकता येईल.