छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट शहर छत्रपती संभाजीनगर शहरातील वार्ड क्रमांक - १६ भीमनगर - भावसिंगपुरा परिसरात असलेल्या दोन्ही स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. यामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान याची दखल घेत माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा विनोद लोखंडे यांनी महापालिकेच्या सन २०२४ - २४ च्या अर्थसंकल्पात दोन्ही स्मशानभूमींसाठी सहा कोटीची तरतूद करावी, अशा आशयाचे पत्र देत महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांना विनंती केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिमेला असलेल्या भावसिंगपुरा - भीमनगर परिसरात दक्षिण - उत्तर- पूर्व - आणि पश्चिम दिशेला मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. अगदी उत्तरेच्या डोंगररांगापासून दक्षिणेकडे असलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ सोलापूर - धुळे हायवेपर्यंत वसाहतींचा आवाका वाढला आहे. गत ३० ते ४० वर्षाच्या काळात या भागात छोटे - छोटे नगर , काॅलन्या मिळून जवळपास एक लाखाहून अधिक लोकसंख्या वाढली आहे. परिणामी शहरातील भीमनगर - भावसिंगपुरा स्मशानभूमीत मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढली आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अंत्यविधी केले जातात. त्यासाठी शेकडो स्मशानभूमीत नागरिक येत असतात. मात्र या नागरिकांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या आहेत समस्या
भीमनगर-भावसिंगपुरा परिसरातील वार्ड क्रमांक १६ अंतर्गत दोन स्मशानभूमी खुप जुन्या आहेत. सद्य:स्थितीत स्मशान भूमींची अवस्था अतिशय जीर्ण व मरणासन्न अवस्थेत झाली आहे. ह्याच स्मशानभुमींवर मोठ्या वसाहती अवलंबून आहेत. या स्मशानभूमींच्या विकासासाठी माजी नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व माजी महिला बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा विनोद लोखंडे यांनी अनेकदा पत्र देऊनही अधिकारी लक्ष देत नाहीत. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी टाळाटाळ करतात. स्मशानभूमींचे पत्र्याचे शेड खुप जुणे झाले आहेत.पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मृत आत्म्यावर अंत्यसंस्कार करताना पाणी टपकते. येथे येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांना व लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली नाही. स्मशानभूमींना संरक्षण भिंती नाहीत. नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह स्मशानभूमीत शिरतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभूमीत स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही.स्मशानभूमीत आकाशाला गवसणी घालणारे गवत आणि रानटी झुडपे वाढली आहेत. त्याची स्वच्छता केली जात नसल्यामुळे स्मशानभूमीत सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी भिती पसरलेली आहे.
नाल्याचे पाणी स्मशानभूमीलगत पसरत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीमुळे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे; तर स्मशानभूमीत येणाऱ्यांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नळ उभारण्यात आले नाहीत. पाणीच नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. या सर्व गैरसोयींमुळे संताप व्यक्त केला जात आहे.स्मशानात सुरक्षारक्षक नाही, त्यासाठी खोली नाही. रेकाॅर्ड रूम देखील नाही. अस्थी लाॅकरची सोय नाही. विद्युत व्यवस्था पुरेशी नाही. स्मशानभूमीतील समस्यांकडे महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी गंभीरपणे पाहून लवकरात लवकर उपाय करावेत. येथील समस्यांमुळे नागरिकांचा संताप होत असून यावर त्वरित कारवाई न झाल्यास "शिवसेना" उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्टाईलने याकडे लक्ष वेधू, असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे.