Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सिडको वासियांना ग्रासले खड्डे अन् दूषित पाण्याने

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या तिजोरीत आगाऊ  कर भरणाऱ्या सिडको एन-चार या उच्चभ्रू परिसरातील सी-सेक्टर भागातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत मिसळल्याने वसाहतीमध्ये एकच हलकल्लोळ पसरला आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांना त्रास होत असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून  सुरू असलेला हा प्रकार थांबवण्यात महापालिका प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले असल्याने नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.

दुसरीकडे सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर गेल्या १९ वर्षाच्या काळात येथील अंतर्गत रस्त्यांची पार चाळणी झालेली आहे. सद्य:स्थितीत त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने फसत आहे. याशिवाय खाली खड्डे वरून नादुरूस्त पथदिव्यांचा अंधार असल्याने त्रासात भर पडली आहे. वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी देखील उच्छाद मांडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. उद्योगपती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीं, बडे व्यापारी, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, राजकीय नेते आदी निवास करत असलेल्या एन- ४ सिडकोमधील सी सेक्टरमध्ये मागील दोन महिन्यांपासून होत असलेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नळावाटे दूषित पाणी येत असल्याने अनेक जण बोअरचे पाणी वापरत आहेत. विशेष म्हणजे पिण्यासाठी बिसलरीच्या कॅन खरेदी करत आहेत. या परिसरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील राहतात. त्यांच्या निवासस्थानातील नळालाही दूषित पाणी येत असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रतिनिधींने संपुर्ण सी-सेक्टर भागाची पाहणी केली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वकिलांच्या घरातील नळांना देखील दूषित पाणी येत असल्याचे नमुणेच बघायला मिळाले. पिण्यासाठी अयोग्य असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच शहरात डेंग्यु, मलेरिया, टाईफाईड आदी साथरोगांचा फैलाव होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.

रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे वाहने अडकतात, कंबर, पाठदुखीचे आजार

या भागातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना रिक्षा, दुचाकी चारचाकी व शालेय वाहने आपटत असल्याने बंद पडत आहेत. परिसरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरुन सतत येजा करुन माण, पाठ, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे. सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर गत १९ वर्षात रस्त्यांची दुरूस्तीच झाली नसल्याने खडड्यात खंड्डे पडून मोठमोठ्या भगदाडात रूपांतर झाले आहे. यासंदर्भात परिसरातील नागरीकांनी वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करूनही पक्के रस्ते तर सोडाच पडलेले खड्डे  बुजविण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निदान पावसाळापूर्वीची खड्डे भरणीची कामे महापालिकेने न केल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर व  सततच्या वाहन वर्दळीमुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून त्रासात भर पडली आहे.

- मनोज बोरा (मामाजी)

श्वानराजांची दहशत

गेल्या वर्षभरापासून वसाहतीत  मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. दिवसाढवळ्या कुत्र्यांनी हल्ले केल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांत व विशेषतः ज्येष्ठ व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच काळे पाणी त्यात खड्ड्यांची शिक्षा याचबरोबर मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे. ओट्यांवर, पायऱ्यांवर ठाण मांडून बसत असल्याने व जाणारा-येणाऱ्यांवर जोरजोराने भुंकत असल्याने अनेकदा पादचाऱ्यांची घबराट उडते. कुत्रे भुंकत अंगावर आल्याने विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींची त्रेधातिरपीट उडते. यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा. कुत्र्यांची संख्या भितीदायकरित्या वाढली असून, त्यांच्यावर नियंत्रणाबाबत महापालिकास्तरावर कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाही. शिवाय प्राणिप्रेमींचाही कुत्र्यांना पकडण्याबाबत, मारणेबाबत विरोध आहे. अशा स्थितीत सामान्य नागरीकांनी मोकाट कुत्र्यांपासून स्वतःला वाचविण्यासाठी काय करावे, हा प्रश्न आहे.

कोंडाळ करून हे कुत्रे लहान मुलांवर, विद्यार्थ्यांवर हल्ला करतात. काही ठिकाणी घरात, कंपाउंडमध्ये घुसून घाण करतात. बंदोबस्ताची मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही.

- अर्जुन चव्हाण , सेवानिवृत्त अधिकारी