Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar: रस्त्यात येणारे 300 विद्युत खांब हटविणार; 15 कोटी..

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यामध्येच होते. हेच खांब लहान-मोठ्या अपघातांचे कारण ठरत होते. मात्र पंधराव्या वित्त आयोगातील पंधराकोटी रूपयांतून महापालिका आणि महावितरणच्या संयुक्त विद्यमाने हे काम आता सुरू झाले आहे. शहरातील डीनीअर इलेक्ट्रीकल सर्व्हीसेस कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

कंपनीचे राहुल नरवडे यानी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात शहरातील नऊ किलोमीटरचे मुख्य बाजारपेठ, वर्दळीचे ठिकाण आणि मुख्य रस्त्यांच्या मधोमध असलेले हे धोकादायक खांब आणि रोहित्रे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान ज्या ठिकाणी कामे मंजुर आहेत. अशा ठिकाणी केलेल्या खोदकामाची दुरूस्ती चांगल्या पद्धतीने केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी टेंडरनामाशी बोलताना दिली. असे असले तरी टेंडरनामाचे रस्त्यांच्या दुरूस्तीवर लक्ष असेल.

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध तसेच राहिले होते. हेच खांब लहान-मोठ्या अपघातांचे कारण ठरत होते. मात्र पुरेशा निधीअभावी महापालिकेला हे धोकादायक विद्युत खांब हटविणे शक्य होत नव्हते. आधी महापालिका आणि जीटीएल नंतर महावितरणच्या आर्थिक वादात खांब तसेच उभे होते. खांबामुळे तसेच त्यावरील ओव्हरहेड केबल आणि तारांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीसह अन्य धार्मिक सणोत्सवात मोठे विघ्न येत होते. काही वर्षांपूर्वी शहरातील नागरीकांनी आवाज उठविल्यावर जीटीएलने शहरातील ६ प्रमुख रस्त्यांवरील ३७ खांब हटवून हात वर केले होते.

रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे हे यमदुत नावाचे विद्युत खांब कधी हटणार? असा प्रश्न टेंडरनामाने सातत्याने उपस्थित केला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात भापकरांनी अनेक अडचणींना तोंड देत काही रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यानंतर महापालिकेने सरकारी अनुदानातुन अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले. २०११-१२च्या दरम्यान महापालिकेने धोकादायक खांब हटविण्यासाठी जीटीएलला २ कोटी रुपये दिले होते. त्यातून जीटीएलने ६ रस्त्यांवरील ३७ खांब हटविले, असा दावा केला होता. मात्र पुढील खांब हटविणयाबाबत महापालिका व जीटीएल यांच्यात आर्थिक वाद सुरू झाला होता. त्यानंतर गत दहा वर्षापासून क्रांतीचौक ते उस्मानपुरासह अन्य भागात खांब हटविण्याचे काम लांबणीवर पडले होते. रोज कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर किरकोळ अपघातांना ते कारण ठरत आहेत. खांबावर वाहने आदळत आहेत.

गेल्या दहा वर्षापूर्वी खांब हटविण्यासाठी महापालिकेने जीटीएलला २ कोटी रुपये दिले होते. त्यात महात्मा चौक (बळवंत वाचनालय) ते औरंगपुरा येथील पोलीस चौकीपर्यंत, औरंगपुरा ते गुलमंडी, महात्मा गांधी पुतळा ते सिटीचौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज, शहागंज ते मंजूरपुरा व पदमपुरा ते सिल्लेखाना या रस्त्यावरील खांब हटविल्याचा दावा तत्कालीन जीटीएलच्या ठेकेदारांनी केला होता. शहरातील बेगमपुरा ते बीबी का मकबरा रस्ता, मकाईगेट ते विद्यापीठगेटपर्यंतचा रस्ता तसेच जुन्या शहरात औरंगपुरा ते अंगुरीबाग रस्ता, दिवाणी देवडी रस्ता या रस्त्यावर ४८ खांब अडथळे ठरत आहेत.शहागंज ते जुना बाजारपर्यंतच्या (जुने पोस्ट ऑफिस) रस्त्याचे रुंदीकरण होऊन दहा वर्षे पूर्ण झाली; पण आजही या भागात रस्त्याच्या मधोमध उभे असलेले खांब रहदारीस अडथळा ठरत आहेत. यासंदर्भात टेंडरनामाने अधीक माहिती घेतली असता शहागंजमधील गांधी पुतळा ते जुना बाजारपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले. गेल्या दहा वर्षांत या रस्त्यावरील खांब हटविण्याची मोहीम अर्धवटच सोडण्यात आली होती. आजही या रस्त्यावर काही खांब वाहतुकीस अडथळे ठरत आहेत. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनदरम्यान सुमारे १५० खांब व १३ डीपीपैकी काही खांब हटविण्यात आले आहेत.

पंधरावा वित्त आयोग पावला

केंद्र सरकारने दिलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील १५ कोटी रूपये खर्च करून महापालिका आयुक्त तथा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी आणि महावितरणचे मुख्य अभियंता सचिन लक्ष्मीकांत तालेवार यानी शहरातील तब्बल ३०० धोकादायक खांब हटविण्यासाठी पुढाकार घेतला.जुन्या व नवीन शहरातील एकुन ९ किलोमीटरचे सर्वेक्षण केले. यात शिवाजीनगर ते विश्रांतीनगर ते अहिल्याबाई होळकर चौक, जयभवानीनगर ते सिडको टी पाॅईंट, एपीआय क्वार्नर ते सिडको बसस्टॅन्ड, मोंढानाका ते जाफरगेट, क्रांतीचौक ते पैठणगेट स्टेशनरोड ते संत एकनाथ रंगमंदिर व शहानुरवाडी एकता चौक ते उस्मानपुरा भाजीवाली चौक व अन्य भागात खांब हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

काय म्हणाले शहर अभियंता

महापालिकेचे शहर अभियंता आविनाश देशमुख यांच्याशी टेंडरनामाने संपर्क केला. त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर मधोमध खांब धोकादायकच होते. आता पंधराव्या वित्त आयोगातून प्रश्न मार्गी लावत आहोत. आपले छत्रपती संभाजीनगर शहर हे स्मार्ट सिटीत समावेशित आहे. त्यामुळे हायटेंशन आणि लोअर टेंशन वीज वाहिन्यांचे भूमिगत नेटवर्क करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे अपघाताचा धोका टळेल आणि शहराचे विद्रुपीकरण देखील नाहीसे होईल. केबल टाकण्यासाठी होत असलेल्या खोदकामावर जेथे सिमेंट अथवा डांबरी रस्ता असेल किंवा पॅव्हरब्लाॅक असतील तिथे पूर्ववत जैसे थे दुरूस्ती करण्याच्या सुचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत. याशिवाय कार्यकारी अभियंता आणि संबंधित प्रभाग अभियंत्यांना बारकाईने लक्ष देण्याच्या सुचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.