Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 3 कोटीत दिव्यांच्या रोषणाईने उजळले 18 रस्ते 

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ३ कोटीत छत्रपती संभाजीनगर शहरातील १८ मार्गावर आकर्षक पथदिवे आणि त्याच्या विद्युत रोषणाईने शहर उजाळल्याने नागरिकांकडून महापालिका विद्युत विभागासह तत्कालीन महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांचे कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात G-20च्या धर्तीवर शहर सुशोभिकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून तत्कालीन महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी शहरातील बाबा उद्यान पुल ते रणगाडा चौक, अहिल्याबाई होळकर चौक ते रेल्वे लाइन क्रमांक ३, मेजर स्टोअर ते नारेगाव, विद्यापीठ गेट ते मकई गेट, नगरनाका ते लक्ष्मी माता मंदीर रोड, सातारा खंडोबा मंदीर, रेणुका माता मंदीर ते चाटे क्लासेस रोड, नक्षत्रवाडी फैठणरोड ते ऑक्टोझोन, आमदार रोड, कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते सुधाकरनगर रोड, मा बाप दर्गा ते पैठण रिंग रोड, जयभवानीचौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड, मोंढानाका ते जाफरगेट, हर्सुल टी पाॅईंट ते देवीमंदिर, म्हसोबा चौक ते चिकुवाला बाग, बेबडे हाॅस्पीटलरोड, नारेगाव जाॅलीबुट कंपनी ते एचएमटी रोड आदी मार्गांवर पथदिवे लावल्याने रस्ते उजळून निघाले आहेत.

यासाठी जी-२० च्या निधीतून तब्बल तीन कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. पोल, दिवे आणि त्यासंबधित पायाभुत सुविधांसाठी महापालिका स्थायी समिती सभेत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. तीस दिवसाच्या मुदतीत पहिल्या टप्प्यात विद्युत विभागामार्फत ९९ लाख ९९ हजार ७४९ रूपयाचे व दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी ९९ लाख ६७ हजार ३३० रूपयाचे बी-टेंडर काढण्यात आले होते. यात छत्रपती संभाजीनगरातील मातोश्री इलेक्ट्रीकल ॲन्ड वाईडिंग वर्क्स या कंपनीवा पहिल्या टप्प्यातील टेंडर अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा वीस टक्के कमी दराने व दुसर्या टप्प्यातील टेंडर २७.४५ इतक्या कमी टक्के दराने भरल्याने १५ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. यात विविध मार्गावर साडेआठ मीटरचे २१, ९ मीटरचे ३२९ व ११ मीटर उंचीचे ४९ खांब बसविण्यात आले. रस्त्याच्या कडेला सिगल व दुभाजकात डबल असे शेकडो दिवे लावण्यात आले आहेत. यासंदर्भात विविध संघटनाकडून मागणी होत असल्याने तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी गत कित्येक वर्षापासून अंधारात असलेले रस्ते उजेडात आणले. या निर्णयामुळे रस्ते उजळून निघाल्याचे चित्र आहे.