छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे देशभरात आयुष्यमान भारतचा डंका मिरवला जात असतानाच छत्रपती संभाजीनगरातील शहानुरवाडी येथील आरोग्य केंद्र मोठ्या समस्यांच्या कचाट्यात अडकल्याचे टेंडरनामाच्या स्पाॅट पंचनाम्यात उघड झाले आहे. आरोग्य केंद्र परिसराला चोहोबाजूंनी कचरा आणि घाणीचा विळखा पडला आहे. थेट इमारतीच्या भिंतीतच झाडांनी डोके वर काढल्याने या इमारतीलाच धोका निर्माण झाला आहे. यामुळे आरोग्य केंद्राची इमारतच कोसळण्याच्या मार्गावर असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सर्वच आरोग्य केंद्रांची ही अवस्था
यासंदर्भात प्रतिनिधीने माहीती घेतली असता शहरातील सर्वच आरोग्य केंद्राची ही अवस्था आहे. दोन महिन्यापूर्वी महापालिका प्रशासकांनी आरोग्य केंद्रांचा समंस्यांचा आढावा घेतला होता. त्यात बांधकाम, पुरवठा आणि विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या होत्या. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी मोजमाप घेऊन दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र अद्याप टेंडर काढायला मुहुर्त लागत नाही.
मेघगर्जना होताच दमछाक
इकडे अवकाळी पाऊस आणि वारावादळात मेघगर्जना होताच आरोग्य केंद्राच्या भिंती आणि छत थरथरते. आधीच तुटलेल्या दाराखिडक्यांचा खुळ-खुळा झाला आहे. त्यात मेघगर्जना होताच त्या अधिक खिळखिळ्या होत आहेत. या इमारतीची स्थिती पाहता तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पाडून नव्याने बांधणेच योग्य असल्याचे मत स्थापत्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात गेला.
शहानुरवाडी वार्ड क्रमांक-११० झोन क्रमांक-७ येथील आरोग्य केंद्राबाबत असंख्य तक्रारी आल्यानंतर प्रतिनिधीने गुरूवारी तब्बल तीन तास पाहणी घेतली. येथील अधिकारी आणि कर्मचार्यांकडून समस्यांचा आढावा घेतला. त्यात आरोग्य केंद्र परिसराला चोहोबाजूंनी कचरा आणि घाणीचा विळखा पडल्याचा गंभीर प्रकार समोर दिसला. त्यामुळे जिथे रुग्ण आरोग्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जातात तेच आरोग्य केंद्र अनेक कारणांमुळे आजारी पडले आहे. त्रिकोणी आकारात बांधकाम झालेल्या या आरोग्य केंन्द्राच्या मागील सर्व बाजूस मोठ्या प्रमाणात घाण, जुनाट बांधकाम आणि गाजरगवतासह रानटी झाडाझुडपांचे जंगल झाले आहे. धक्कादायक म्हणजे इमारतीच्या आतील बाजुस मोठमोठी झाडे उगवल्याने काँक्रिट खिडक्यांची मोडतोड होऊन जनतेच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
कक्षात विषारी सापांचे 'राज'
आरोग्य केंद्राच्या पाठीमाघे असलेल्या मोकळ्या जागेत उठसुठ कोणीही जुनाट बांधकामाचे ढिगारे आणून टाकतात. सर्वत्र मातीची डोंगर, त्यात सर्व बाजुंनी भुसभुशीत काळी माती असल्याने येथ मोठ्या प्रमाणात विषारी सापांची बिळे आहेत. पावसाळ्यात बिळात पाणी शिरताच ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासह इतर कक्षात खिडकीतून प्रवेश करतात. परिणामी थेट आरोग्य केंद्रात सापांचे वास्तव्य असल्याचा धक्कादायक प्रकार येथील कर्मचाऱ्यांनी सांगितला.
असा आहे दुष्काळात तेरावा महिना
येथे पाण्यासाठी बोअरवेल नाही. नळाच्या पाण्यावर अवलंबुन राहावे लागते. आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यात पाणीसाठवण करणारा हौदच गळका असल्याने दुष्काळात तेरावा महिना झाला. पाण्याअभावी स्वच्छतागृहांचा वापर देखील बंद असल्याने याचा फटका रूग्ण आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे.
दारवाजे-खिडक्यांचा बॅन्ड वाजला
इमारतीतील गरोदर माता तपासणी कक्ष, औषधालय, लसीकरण आणि नोंदणीकक्षासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या सर्वच दाराखिडक्यांचा खुळखुळा झाला आहे. दरम्यान अशा फुटक्या अवस्थेत असलेल्या कक्षात गरोदर मातांची तपासणी होत असल्याने येथे नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोलमडलेल्या विद्युतयंत्रणेमुळे पावसाळ्यात भिताडांना स्पर्श करताच झटके बसतात.
मुख्य आरोग्य अधिकारी झोपलेत का?
इतक्या साऱ्या समस्यांचा डोंगर असताना आणि इमारतच पोखरून निघालेली असताना यासंदर्भात महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा झोपा काढत आहेत का? यांना देखभाल-दुरूस्ती करणार्या संबंधित विभागाला सूचना देता येत नाहीत का? गरोदर मातांची तपासणी थेट फुटक्या दाराखिडक्यांच्या कक्षात होते, बाहेर उनाडांच्या मैफली बसलेल्या असताना आणि केंद्राची सुरक्षाच वार्यावर असताना या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला जराही गांभीर्य असू नये का?, असे अनेक प्रश्न उपस्थित करत रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाइकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पत्रांवर उपचार नाहीत
याबाबत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इमारतीच्या विविध दुरूस्त्यांबाबत संबंधित विभागांना एकदा नव्हेतर पाचदा पत्र दिली आहेत. मात्र, त्यांच्या पत्रांची देखील दखल घेतली जात नाही. या आरोग्यकेंद्राच्या इमारतीबाहेर स्वच्छता राखली जात नसल्याने येथे उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याची वेळ आली आहे.
२३ वर्षांपूर्वीची इमारत
गेल्या २३ वर्षापूर्वी लोडबेरिंगमध्ये बांधलेल्या या इमारतीचा उद्घाटन सोहळा माजी महापौर डाॅ.भागवत कराड , माजी सभागृहनेता संजय शिरसाट यांच्या काळात झाला होता. सद्यःस्थितीत डाॅ.कराड हे केंद्रात वित्तीय राज्यमंत्री आहेत. शिरसाट सत्ताधारी पक्षात आमदार आहेत. केंद्र आणि राज्यातून या आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करणे फारसे त्यांना अवघड नाही. विशेष म्हणजे शिरसाट यांच्या पश्चिम मतदार संघातच हे आरोग्य केंद्र आहे.
अर्धालाख लोकसंख्येची जबाबदारी मनुष्यबळाचा अभाव
आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने येथील कामकाजात देखील व्यत्यय येत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या आरोग्य केंद्रावर परिसरातील शहानुरवाडी, देवानगरी, शंभूनगर, शम्सनगर, प्रियदर्शनी इंदिरानगर, हिम्मतनगर, मयुरबन काॅलनी, सातारा-देवळाई, बीडबायपास श्रीकृष्णनगर, पीडब्लुडी काॅलनी, जिजाऊनगर, देवगिरी काॅलनी व अन्य भागातील ४७ हजार ६५६ रूग्णसेवेची जबाबदारी आहे.
असा आहे कर्मचारी वर्ग
सद्यःस्थितीत आरोग्य केंद्रात ९ आशावर्कर, १ एमपीडब्लु, ४ आरोग्य सेविका, १ वैद्यकीय अधिकारी, १ फार्मासिस्ट, १ स्वच्छता कर्मचारी आणि १ लॅब टेक्निशियन आहे. लॅब टेक्निशियन आठवड्यातून ३ दिवस उपलब्ध असतो. त्यामुळे विविध तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे विशेषतः गरोदर आणि स्तनदा मातांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना तपासणीसाठी हकनाक इतरत्र जावे लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांना न्याय मिळत नाही. येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, येथे आल्यावर कधी अपुऱ्या सुविधेमुळे व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे घोर निराशेला सामोरे जावे लागत आहे.
४० आरोग्य केंद्रांची हीच अवस्था:
● डाॅ. पारस मंडलेचा (मुख्य आरोग्य अधिकारी )
येथील स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याने या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची अवस्था मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच होऊन बसली आहे. याप्रश्नी टेंडरनामा प्रतिनिधीने महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांना संपर्क केला असता त्यांनी राजनगर हे , एकच नव्हे, तर शहरातील सर्वच ४० आरोग्य केंद्रांची वाइट अवस्था असल्याची त्यांनी धक्कादायक माहिती दिली. दिड वर्षापूर्वीच स्वतः पाहणी करून सर्वेक्षण अहवाल तयार केलेला आहे. तत्कालीन प्रशासकांकडे देखील पाठपुरावा केला होता. मात्र कोव्हीड काळात आर्थिक अडचणींमुळे आरोग्य केंद्र दुरूस्ती झाली नाहीत. गत दोन महिन्यांपूर्वी प्रशासकांसह सबंधित वैद्यकीय अधिकार्यांसमवेत या सर्वच आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांनासह कर्मचार्यांनी गैरसोयींचा पाढा वाचला. त्यामुळे प्रशासकांनी याप्रश्नी लक्ष घातले आहे. येत्या काही महिन्यात सर्वच आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून टेंडर काढण्याचे आदेश प्रशासकांनी बांधकाम विभागाला दिलेले आहेत. यात इमारतींचे बांधकाम, रंगरंगोटी, सुरक्षाभिंत, विद्युत आणि प्ल॔बींगच्या कामासह बर्याच पायाभूत सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
टेंडर निघेल तेव्हा निघेल तुर्तास याकडे लक्ष द्या....
● नळाला तोट्या बसवा, हौदाची गळती थांबवा, छताचे वाॅटरप्रुफींग करा, दारा -खिडक्यांची दुरूस्ती करा, विद्युत यंत्रणा नीटनेटकी करा, सुरक्षाभिंत बांधा, झाडेझुडपे काढून बाहेरचा परिसर चकाचक करा, रेकाॅर्ड जतन करण्यासाठी पुरेसे फर्निचर द्या, रूग्णांसाठी बाकडे आणि खुर्च्या द्या.सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक द्या.
साडेपाच कोटीतून नशिब उजळणार
शहरातील महानगरपालिकेच्या मालकी व ताब्यातील आरोग्य आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे सरकारच्या धोरणानुसार नुतनीकरण केले जाणार आहे. यासाठी साडेपाच कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सहा महिन्यात आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार आहे.
- राजीव संधा, कार्यकारी अभियंता, मनपा