छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सातारा परिसरातील फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीमधून फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीचे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्याच्या उतारावरून रेणुकापुरम सोसायटीलगत वाहुन एका बिल्डरने मुरुमासाठी खोदलेल्या खड्डयात साचत होते. सदर सांडपाण्यामुळे रेणुकानगरातील कुपनलीकांत दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिसळत होते. याशिवाय सोसायटीच्या आवारात उघड्यावर वाहणाऱ्या या दूषित एक उच्च लल दर दर नवंदुर्गंध प्रसार होत होता. याबाबत येथील रहिवाशांनी संबंधित सोसायटीच्या परिसरात मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली होती. आठ दिवसांत विविध समंस्यांवर तोडगा न निघाल्यास मनपावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देताच मनपा अधिकाऱ्यांनी तातडीने मलनिःसारण वाहिनी बदलण्यासाठी कंत्राटदार शोधला. शहरातील शैलैश काबरा या कंत्राटदारामार्फत काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीड बायपास - रेणुकामाता मंदिर कमान - अहिल्याबाई होळकर चौक - म्हाडा कॉलनी - सातारा - देवळाई - सहा वर्षांपूर्वी कोट्यावधी रूपये खर्च करून डांबरीकरण केलेला रस्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदून ठेवला. दरम्यान संबंधित कंत्राटदाराने जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम केल्याने या संपुर्ण मार्गावरील मलनिःसारण वाहिनी देखील फोडुन टाकली. याचा या भागातील जवळपास ५० हजार रहिवाशांना फटका बसला . रस्ता वर आणि नागरी वसाहतींच्या दोन्ही दिशेने उतार असल्याने फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी अनेक वसाहतीत शिरून मोकळ्या भुखंडांवर तलाव साचलेले आहेत. त्यात सातारा - देवळाई परिसरातील चिखलमय रस्ते असल्याने घंटागाडी देखील कचरा संकलणासाठी नागरिकांच्या घरापुढे जात नसल्याने नाविलाजास्तव नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याने सांडपाण्याच्या तलावात कचऱ्याचे साम्राज्य सुद्धा झाले आहे. रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी रोड ते सातारा - देवळाई या रस्त्याची व मलनिःसारण वाहिनीची जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने दोन वर्षांपासून वाट लावलेली आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीव्हीपीआर कंपनी व मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.
दरम्यान याच मार्गावरील आहेत. रेणुकापुरम सोसायटीसमोरील फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील मुख्य ड्रेनेजलाइन फुटल्याने रेणुकापुरम सोसायटीलगत खड्ड्यात ड्रेनेजच्या पाण्याचा मोठा तलाव साचला आहे.त्यात पुन्हा पावसाच्या पाण्याची भर पडली आहे. यासोबत फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील नागरिकांसह इतर परिसरातील नागरिक याच खंड्डयाचा वापर कचरा कुंडी म्हणून करत असल्याने दुर्गंधीत भर पडली आहे. याशिवाय फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील जाहिरातीचे होर्डींग्ज वादळाने रेणुका पुरम सोसायटीच्या अंतर्गत मुख्य रस्त्याकडे झुकल्याने जीवीत व वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे.सदर समस्याबाबत रेणुकापुरम सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी संबंधित सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांसह मनपा अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार केली होती. परंतु समस्या जैसे थे होती. मनपाच्या ड्रेनेज व आरोग्य विभागाने संबंधित सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना सांगुन मलनिःसारण वाहिनी दुरुस्त करून सांडपाण्याची नियोजन करावे, याबाबत रेणुकापुरम सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी येथील रहिवाशांसह फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील नागरिक व व्यापार्यांसमोर मोर्चा काढला व विविध समंस्या दुर करण्याबाबत निदर्शने केली. रेणुकापुरम सोसायटीवासीयांचा रूद्रावतार पाहुण तातडीने दखल घेत बिल्डर पंजाबराव तौर यांनी मनपातील मलनिःसारण विभागामार्फत मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. समस्या निराकरण झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी ‘पंजाबराव तौर’यांचे आभार मानले. मात्र अद्याप तौर यांच्या मालकी हक्कातील खुल्या भुखंडावरील रानटी झाडेझुडपे व गवताचा निपटारा केला नाही. पावसाचे पाणी व कचरा कुंडी असणार्या मुख्य समंस्यांची जड असलेला धोकादायक खड्डा बुजवला नाही. धोकादायक फलक काढला. पण, त्याची योग्य ठिकाणी विल्वेवाट लावली नाही. त्यामुळे रेणुकापुरम सोसायटीच्या रहिवाशांनी बिल्डर तौर यांना आठ दिवसाचा अल्टीमेट दिला आहे. अन्यथा भुखंडावरील बजबजपुरीच्या संदर्भात मनपात मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
या मागण्यांकडेही मनपाने लक्ष द्यावे
- रेणुकापुरम ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी रोड ते सातारा - देवळाई या रस्त्यावरील सर्व दुकानदारांना मनपा अतिक्रमण विभागाने तंबी देऊन रस्त्यांवरील शोल्डरमधील अतिक्रमण काढावे, रस्ता वाहतुकीस मोकळा करून द्यावा.
- रेणुकामाता मंदिर कमान ते पटेल काॅम्पलेक्स दरम्यान हातगाडीधारक व रस्त्यापर्यंत कब्जा करणार्यांवर तातडीनं कारवाई करावी.
- सिडको झालर क्षेत्राच्या नकाशा नुसार सदर रस्त्याचे ६० फुट रूंदीकरण करून सिमेंट रस्त्यांची बांधनी करावी.
- वाहतुक पोलिसांनी या संपुर्ण रस्त्याचे सर्व्हेक्षण करून नियमीत रस्त्याच्या कडेला सार्वजनिक जागेवर दुचाकी व कार पार्किंग करणार्यांवर कारवाई करावी.
- मलनिःसारण वाहिनी व जलवाहिनी करिता सातारा - देवळाईतील खोदण्यात आलेल्या रस्त्यांसाठी पुरेशा निधीची तरतूद करुन रस्ते दुरुस्त करण्यात यावेत.
- संग्रामनगर उड्डाणपुलाखालील सर्व्हीस रोड मोकळा करून तेथील भाजी व फळविक्रेत्यांमुळे होत असलेली वाहतुक कोंडी दुर करावी.
- संपुर्ण सातारा - देवळाई परिसरात खाली चिखल वरून अंधार यासाठी पथदिव्यांची तातडीने दुरूस्ती करावी.
- देवळाई चौक ते धुळे - सोलापूर हायवेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करावे. शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे.
- सातारा - देवळाईतील खुल्या भुखंडाच्या मालकांचा शोध घेऊन स्वच्छता करण्यात यावी.
- सातारा - देवळाईतील मुळ रेखांनकनातील खुल्या जागांचा शोध घेऊन क्रीडांगणे व उद्याने विकसित करण्यात यावी.
- सातारा - देवळाईत स्वतंत्र भाजी - फळ मार्केट व जीवनावश्यक वस्तुंची बाजारपेठ निर्माण करावी.
- सातारा - देवळाईभागातील रहिवाशांसाठी स्वतंत्र बसस्टॅंन्डची निर्मिती करून अखंडित बससेवा सुरू करावी.