Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : धोकादायक शाळेचा नूर पालटला; खाली शाळा आणि वर पोलिस उपायुक्त कार्यालय

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील नागेश्वरवाडी भागातील कालबाह्य झालेल्या धोकादायक शाळेची इमारत तातडीने दुरूस्त करण्याचा निर्णय झाला. पण, महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने प्रक्रिया रखडली. दरम्यान दुरूस्तीचा निर्णय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून घेण्यात आला आणि शाळेचे रूपडे पालटले. आता खाली शाळा आणि वरती पोलिस उपायुक्त कार्यालय झाले आहे. वर्गखोल्यांची दुरूस्ती आणि खेळायला मोकळे मैदान झाल्याने विद्यार्थांना देखील शाळेचा लळा लागला आहे.

यापूर्वी मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका किर्ती शिंदे यांची शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत आणि शाळा बंद झाल्यानंतर उनाडांचा त्रास याबाबत तक्रारी होत्या. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी देखील तो विषय चर्चेसाठी अनेकदा उपस्थित केला. धोकादायक इमारतीची तपासणीही केली होती. पण निधी कुठुण आणायचा यात विषय कायम गुरफटून ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर ठोस धोरणात्मक निर्णय न झाल्याने शाळा दुरूस्तीचा तो प्रश्न प्रलंबित राहिला होता. त्यामुळे दिवसेंदिवस धोकादायक वर्गखोल्यांखाली विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मागील काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेविका किर्ती शिंदे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडे सदर धोकादायक शाळा इमारत व सुटीच्या काळात इमारतीआड गर्दुल्यांची भरत असलेली शाळा यामुळे आसपासच्या नागरिकांना नेहमीच होत असलेल्या त्रासाबाबत कैफियत मांडली. दरम्यान जी. श्रीकांत यांनी तातडीने शाळा दुरूस्तीचा निर्णय झाला. महापालिकेत पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने स्मार्ट सिटी प्रशासनाची मदत घेण्यात आली. स्मार्ट सिटी मार्फत निधी प्राप्तीसाठी योग्य पूर्तता करून २८ लाखाचा निधी मंजुर करून घेतला त्यानंतर शाळा दुरूस्तीसाठी टेंडर काढण्यात आले आणि २८ लाखात शाळा इमारतीचा कायापालट करण्यात आला.

यापूर्वी वर्गखोल्याच्या सर्दावलेल्या इमारती, छतांना गेलेले तडे, वारा अन् पावसामुळे छताचे तुकडे वर्गामध्ये पडणे, पावसाळ्यात वरच्या मजल्यावरील वर्गखोल्यांमध्ये गळती लागणे, असे प्रकार वर्गखोल्यांमध्ये सर्रास घडत होते. विद्यार्थांप्रमाणेच त्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांचाही जीव त्यामुळे टांगणीला लागत असे, काही दुर्घटना घडल्यास शिक्षकांना भिती वाटत असे, मात्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून महापालिकेला मदतीचा हात मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांचा जीव भांड्यातून बाहेर पडला आहे. याशिवाय यापूर्वी पोलिस उपायुक्त शहर विभाग क्रमांक-१ चे कार्यालय पैठण गेट येथील लोकमान्य वाणिज्य संकुलात होते. सदर इमारत देखील जुनाट आणि वाहनतळाची समंस्या असल्याने पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांनी देखील कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू केला होता.अखेर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्यांना नवी इमारत दिल्याने आता पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या चेहर्यावर देखील समाधान झळकत आहे. लवकरच या इमारतीत सर्व महापालिका अंतर्गत सर्व शिक्षा अभियानचे कार्यालय देखील स्थलांतरित होणार आहे.