Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : वसाहतींमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात?; खड्डे अन् त्यात पावसाचे पाणी

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : धोकादायक प्राणघातक खड्डयात पडून पैठण रोडवर प्राणहानी झाल्याच्या घटनेनंतर देखील जीव्हीपीआरच्या कंत्राटदारात सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे.‌ नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात साडेबाराशे‌ किलोमीटर अंतरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कंत्राटदाराकडून शहरभर खोदकाम सुरू आहे. दरम्यान, जलवाहिनी टाकण्यानंतर जाॅइंट मारण्यासाठी पाईपांचा तुटवडा निर्माण होत असल्याने शहरातील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमध्ये मोठ्या अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात आतापर्यंत चार निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतर देखील कंत्राटदार बधत नाही.

रस्त्याच्या कडेलाच दहा ते पंधरा फुटाचे खोल खड्डे त्यात अवकाळी पावसाचे साचलेले पाणी आणि खड्डयांभोवती लावलेले सावधानतेचे इशारे देणार फलक खड्डयातच वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे चित्र शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या वसाहतींसह शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पाहायाला मिळत आहे. त्याचबरोबर बहुतांश खड्डे हे मुख्य रस्त्यांवरील वळण मार्गांवर मुख्य चौकात अगदी बाजारपेठ, बॅंका, सरकारी निमसरकारी कार्यालयासमोरच रस्त्याच्या कडेला तसेच रहिवाशांच्या घरांसमोर केलेले आहेत. यामुळे शहरात जागोजागी अशा प्राणघातक खड्डयांचे जाळे कंत्राटदाराकडून पसरले आहे.

यापुर्वी गेल्या पावसाळ्यात कंत्राटदाराने पैठणरोडवर केलेल्या नाल्यात ते मोठी दुर्घटना घडून कुटुंबातील चिमुकलीसह एका दाम्पत्याचा बळी गेला. पाठोपाठ आठवडाभरानंतर याच मार्गावर एका दुचाकीस्वाराचा बळी गेला. असे असताना कंत्राटदाराकडून जलवाहिनीचे जाॅईंट बसविण्याठी एक ते दिड महिन्याचा कालावधी लागत आहे. तोपर्यंत खड्डे तसेच उघडे ठेवले जात आहेत. शहर परिसरात जवळपास असे सहाशे खड्डे असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडून उत्तर दिले जात आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी देखील कंत्राटदाराला नोटीसा बजावल्या आहेत. मात्र कंत्राटदार नोटीसांना केराची टोपली दाखवत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला हे धोकादायक महाकाय प्राणघातक खड्डे मृत्युला आमंत्रण देत आहेत.‌सध्या अवकाळी पावसाचे ढग आकाशात जमू लागले आहेत. मोठ्या पावसाने हे रस्त्यालगत खड्डयात पाणी साचले तर भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कंत्राटदाराकडुन आधी जाॅईंटचे काम करणे गरजेचे आहे व काम झाल्यानंतर तातडीने खड्डे बुजवने गरजेचे आहे. तशी नागरिकांनी देखील मागणी केलेली आहे.‌