Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरकर हळहळले; सूर्य तळपत असताना 20 हजार झाडांची कत्तल

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्चून अमृत योजनेंतर्गत चार वर्षांपासून जगविलेल्या पंधरा हजार झाडांवर जेसीबी चालून झाडे बुडासोबत उखडून पाडले. छत्रपती संभाजीनगर येथील जळगाव रस्त्याच्या दुतर्फा महापालिका उद्यान विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करुन चार वर्षापासून जगविलेल्या २० हजार झाडांवर जेसीबी चालवून झाडे बुडासोबत उखडून पाडले. याबाबतची तक्रार सिडको एन भागातील नागरिकांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडे शुक्रवारी केली असून जीव्हीपीआर कंपनी व मजीप्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

एकीकडे शहरात सुर्य कोपलेला आहे.‌छत्रपती संभाजीनगर शहरात गत आठ दिवसांपासून‌ तापमान ५.५ अंशांनी वाढले आहे. दिवसेदिवस तापमान वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ४३.५ अंश अशी सर्वाधिक तापमान झाल्याची हवामान खात्याने नोंद केली आहे. उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे. अशा वाढत्या तापमानात सावलीचा आधार देणारी आणि संपूर्ण शहरवासीयांना मोकळा ऑक्सिजन देणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट या साडेपाच किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या उद्यान विभागाने केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेतून चार वर्षांपूर्वी जवळपास तीन कोटी रूपये खर्च करून तत्कालीन सिडको प्रशासनाने या रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राचा विचार करून सिडको-हडको भागात प्रदुषणाचा विळखा कमी करण्यासाठी दुतर्फा साडेपाच किलोमीटर अंतरावर हरितपट्ट्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागेत जवळपास एक लाख झाडांची लागवड केली होती. कंत्राटदारामार्फत या झाडांची जोपासणा करुन ही झाडे जगविली आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगर नवीन  पाणीपुरवठा योजनेंतर्गत हर्सूल भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे काम सुरु असून गत दोन महिन्यांपासून महानगरपालिकेच्या काही क्रुर अधिकाऱ्यांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना दर्शविलेल्या उजव्या बाजुने असलेल्या हरितपट्टयातील वृक्षांच्या रांगामधून जेसीबीने पाईपलाईनसाठी मोठी चर खोदली. यामुळे वृक्षारोपण केलेली सुमारे पंधरा ते वीस फुटाची झाडे बुंध्यासह उखडली.यात सिडको बसस्थानक ने गरवारे कंपनीपर्यंत २० हजार झाडांची कत्तल होणार आहे.

सिडको एन वन वासीयांनी संबंधीत कंत्राटदारादाराला वृक्षांच्या बाजूला अंतर सोडून पाईपलाईन खोदण्याचे सांगीतले असताना हेकेखोरपणे चक्क दोन महिन्यांपासून काम सुरूच ठेवले आहे. यामध्ये २० हजाराच्यावर झाडे बुथ्यासोबत उखडून पडली. महानगरपालिका उद्यान विभागाने हरित पटट्याचे रक्षणाकरिता शेकडो अतिक्रमणे हटवली त्यांनंतर येथे मोठी वनराई निर्माण करण्यात आली होती. आता हा भव्यदिव्य हरितपट्टयातील महाकाय वृक्षांची कत्तल होत असताना आणि हरितपट्टाच भूईसपाट होत असताना उद्यान विभागाकडून अद्यापही दखल घेतली नाही.‌ दुसरीकडे याच हरितपट्टयात एसबीआय चौकात तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. विनायक निपुण यांनी दोन कोटी रुपये खर्च करून स्मार्ट संभाजीनगरच्या धर्तीवर पिरॅमिडचा देखावा तयार केला होता. त्याची देखील पडझड होणार आहे. विशेष म्हणजे याच हरितपट्टयात दिड कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या नाईकांच्या पुतळ्याचे आता काय होणार? असे सवाल उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे संपुर्ण हरितपट्टयात १५ ते २० ट्रान्स्फार्मा असताना व त्यांना जी. २० च्या काळात गडाच्या भिंतीचा आकार असलेले कोट्यावधींचे सुरक्षाकवच चढवण्यात आले. अद्याप हरितपट्टयातून ते हटविण्यात आले नाहीत. यासाठी जागा कुठे शोधणार, असा निम्म्या नव्या शहराला वीजपुरवठा करणाऱ्या हायटेंशन लाईन कुठे टाकणार एकुणच महापालिका, मजीप्राच्या अधिकाऱ्यांवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून दररोज येथील वृक्षांना टंचाईच्या काळातही पाणी देण्याचे काम उद्यान विभागाने केले.मात्र पाईपलाईनसाठी वृक्षांची कत्तल झाल्याने शासनाच्या कोट्यावधी रुपयांवर पाणी फेरले गेले असून वृक्षारोपणाचा उद्देशही साध्य झाला नाही. याबाबत उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे वृक्ष कत्तलीसाठी महापालिका उद्यान विभागाने तर छुपी परवानगी दिली नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा वृक्षांची कत्तल करणार्‍या संबंधित ठेकेदार व उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.