Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : महापालिकेला जे जमले नाही ते पीडब्लूडीने करून दाखवले; हे आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील रस्त्यांबाबत नेहमीच ओरड सुरू असते. खड्ड्यात रस्ते आहेत की, रस्त्यावर खड्डे, असेच काहीशी टीका होते. सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकर शहरातील रस्त्यांबाबत नेहमीच नाक मुरडत असतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका महत्वाच्या रस्त्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी मंजूर करून आणला आहे. यातून मिल कॉर्नर ते लेणी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग -४२ या मुख्य सिमेंट रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे दर्जेदार काम पाहुण महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी तोंडात बोट घातले आहे, कसा असावा सिमेंटचा आदर्श रस्ता‌ पाहून छत्रपती संभाजीनगरकरांना वाटत आहे. रस्त्याच्या या कामासाठी खा. इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तगादा लावला होता. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारकडे निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. 

शहरातील पर्यटन स्थळांकडे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे तसेच शेकडो वसाहतींकडे जाणारा या मुख्य रस्त्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे रस्त्याचे दर्जेदार काम पाहून गेली कित्येक वर्षे महापालिकेला जे जमले नाही, ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून दाखवले, अशी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे बांधकाम पाहून काहीतरी बोध घ्यावा, इतका तो आदर्श रस्ता होत आहे. खा. जलील यांनी सातत्याने पाठपुरावा करून यात मंजूर सिमेंट रस्त्याच्या कामासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात टेंडर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी टेंडर खुले करण्यात आले होते. त्यात ३.३३ टक्के कमी दराने टेंडर भरणार्या पी.एस.बागडे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते.‌ सर्व कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ३ नोव्हेंबर २०२३ ला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. तब्बल ७ कोटी ८८ लाख ६९ हजार २१२ रूपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात येत आहे.

महापालिका आणि आमदार व खासदार निधीतून गेल्या दहा वर्षांत शहरात एक हजार कोटींचे सिमेंट रस्त्यांचे काम केले गेले. मात्र काही दिवसातच हे रस्ते उखडले. अत्यंत उंचवटे झाल्याने नागरिकांच्या घरादारात पाणी साचते. मात्र पीडब्लुडीकडून होत असलेल्या या आदर्श रस्त्याची पाहणी केली असता मिल क्वार्नरकडुन तसेच लिटील फ्लाॅवर शाळेकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उतार देऊन पावसाचे पाणी खाम नदीत सोडण्याचे नियोजन केले आहे. रस्त्याच्या मधोमध स्लोब दिल्याने पावसाचे पाणी साचणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी जी-२० च्या काळात पुढील सिमेंट रस्त्याचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊनच रस्त्याचा ढाचा तयार करण्यात आला होता. मात्र कंत्राटदारामार्फत दोन ते तीन फुट खोदकाम करूनच सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत असल्याने रस्त्याची उंची कमी करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात आसपासच्या वसाहतींना कुठलाही धोका नाही. रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रूंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक त्याला वाहतुक नियमानुसार काळे व पांढरे पट्टे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुटपाथ आणि बाॅर्डर असल्याने  शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्याच्या बांधकामामुळे रस्त्याचा चेहरामोहरा बदलला असून पर्यटन नगरीकडे जाणाऱ्या या रस्त्याने शहराच्या सौंदर्यात भर घातली असून वाहनचालकांना भूरळ घातली आहे.