Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर 'त्या' भागातील मलनिःसारण वाहिनीचे काम पूर्ण; नागरिकांना दिलासा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील प्रभाग क्रमांक-४ मयुरपार्क, मारोती नगर भागातील मुख्य रस्त्यावर अर्धवट मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी पूर्ण केल्याचे कनिष्ठ अभियंता संतोष जापकर यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गेल्या चार महिन्यांपासून येथील रस्त्यालगत मलनिःसारण वाहिनीचे चेंबर जमीनीत दडले होते.‌ मलनिःसारण वाहिनी देखील जुनाट झाली होती.‌ फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. ही मलनिःसारण वाहिनी बदलण्याची  मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत ‘टेंडरनामा’नेही वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने मलनिःसारण वाहिनी बदलण्याचे काम पूर्ण केले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक-४ मयुरपार्क परिसरातील मारोतीनगर येथील गुरूप्रसाद अपार्टमेंट ते अथर्व क्लासिक अपार्टमेंट दरम्यान मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मलनिःसारण वाहिनीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. या घाण पाण्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते.‌ घाण पाणी अंगावर उडत असल्याने दररोज पादचाऱ्यांमध्ये व वाहनधारकात भांडणे होत असत. शिवाय रस्त्यावरच गटारगंगा वाहत असल्याने रस्ता अरूंद झाल्यामुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असत.‌ आसपासचे रहिवाशांना दुर्गंधीच्या नरकयातना सोसाव्या लागत असत.‌ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.‌

याच भागात महापालिकेने प्रभाग-४ अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात विशेष देखभाल दुरुस्ती अंतर्गत लेखाशिर्षातून मारोतीनगर, हर्सुल परिसर, जाधववाडी, सुरेवाडी, मयुरपार्क भागासाठी २० लाखाचे ड्रेनेज दुरुस्ती, पाईप बदलने, चेंबरची उंची वाढवणे, काही ठिकाणी नवीन चेंबर बांधणे, ढापे बदलने आदी कामांसाठी वीस लाखांचे टेंडर काढले होते. सदर काम ऋषीकेश कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान गुरु प्रसाद अपार्टमेंट ते अथर्व क्लासिक अपार्टमेंट लगत २० फुट लांबी असलेली जुनाट मलनिःसारण वाहिनी बदलून चेंबरची उंची वाढवण्यासाठी या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेतील प्रभाग अभियंत्यांपासुन कार्यकारी अभियंता तसेच प्रशासकांकडे केली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत ‘टेंडरनामा’ने  वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने तातडीने मलनिःसारण वाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम झाल्यानंतर तेथील नागरिकांनी काम पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.