Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेनंतर प्रशासकांचा मोठा निर्णय; पण विकासाच्या बाता नको

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : १३ वर्षांपूर्वी गरवारे क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर महापालिकेने ७८ लाख रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतर बदलत चाललेल्या भूमिकेमुळे तलावाच्या गटांगळ्या सुरू झाल्या. दिवाळखोरीत असलेल्या मनपाचे ७८ लाख पाण्यात गेल्याची स्थिती आहे. प्रशासकीय इमारत व पॅव्हेलियनचीही स्थिती वेगळी नाही. त्यात तीन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी गरवारे क्रिडा संकुलाचा ६२ कोटींचा डीपीआर तयार केला. मात्र सरकारने पैसे दिले नाहीत. त्यामुळे पाण्डेय यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आता प्रशासक जी. श्रीकांत यांनी गरवारे क्रिडा संकुलाच्या विकासासाठी २६२ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्याला सरकारने अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही, असे असताना प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती कशासाठी करण्यात आली, हा सवाल उपस्थित होत आहे.

याआधी जलतरण तलावाचे बांधकाम बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१० मध्ये तत्कालीन महापौर विजया राहाटकर यांनी घेतला होता. परंतु तिजोरीतील खडखडाटामुळे याचा ताळमेळ बसला नाही. सुरुवातीपासूनच या तलावाच्या बांधकामाला नाट लागली. आधी बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. नंतर स्वत:च हा तलाव बांधावा, असा निर्णय मनपाने घेतला; पण दिवाळखोरीमुळे पुन्हा बीओटी तत्त्वावरच बांधकाम करण्याचा प्रस्ताव सादर केला. वारंवार बदलणाऱ्या या प्रस्तावाच्या खेळात तलावाचे काम अर्धवटच राहिले आहे. केवळ जलतरण तलावच नव्हे, तर एकूणच गरवारे क्रीडा संकुलाची भयाण अवस्था झाली असून संपूर्ण स्टेडियममध्ये गाजरगवताची शेती बहरली आहे. मैदानात जागोजागी खड्डे पडले आहेत. क्रीडा संकुलातील मुख्य प्रशासकीय इमारत, पॅव्हेलियन, वसतिगृहाची दैना झाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल बनविण्याचे स्वप्न हवेतच विरले असून मनपाच्या प्रस्तावांच्या नवनवीन फायलींमुळे जलतरण तलावाचाही खेळखंडोबा सुरू झाला. १ लाख ११ हजार ९८० चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाचे ६ ऑगस्ट १९९७ रोजी तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहनमंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले होते. या संकुलामुळे शहराच्या क्रीडाविश्वात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते; परंतु नंतर संकुलाच्या नशिबी वनवास आला आहे. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मैदानात गाजरगवत व रानटी झुडपांची शेतीच जणू बहरली आहे. त्यातच पाणी व दलदल वाढल्याने साप, विंचू-काटे, सरडे व बेडकांचा सुकाळ झाला आहे. मैदानावर अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्याने येथे कुठलाही खेळ खेळणे मुश्कील झाले आहे.

२००७-०८ मध्ये क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्याच्या प्रस्तावावर टेंडर काढण्यात आले. तब्बल अडीच कोटी रुपयांचे बजेट या तलावासाठी ठरविण्यात आले. ७८ लाख रुपये बांधकाम करण्यात घालवण्यात आले; परंतु त्यानंतर मध्येच मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढून व मनपाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण सांगून पुढील काम थांबवण्याची आदेश काढले. आजतागायत जलतरण तलावाची वाईट अवस्था वाईट आहे. त्यामुळे हा जलतरण तलाव अर्धवट राहिला. संकुलात पॅव्हेलियनखाली असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीची दुर्दशा झाली आहे. येथील मुख्य अतिथी सभागृहाची व अन्य खोल्यांची दारे तुटली आहेत. खिडक्यांच्या काचा फुटून त्याची खच तिथेच कित्येक दिवसांपासून पडून आहे. याशिवाय धूळ आणि कचर्याचा ढीगही येथे कायम असतो. शहराबाहेरील स्पर्धकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून बहुमजली वसतिगृह उभारण्यात आले. मात्र, येथील दारे-खिडक्याही शाबूत राहिलेल्या नाहीत. वसतिगृहाची संपूर्ण इमारत गाजरगवताने घेरली आहे.धक्कादायक म्हणजे वस्तीगृहाच्या लगत खुल्या पटांगणात भंगार वाहनांचे गोडाऊन झालेले आहे.‌संकुलातील दक्षिण बाजूला असलेले पॅव्हेलियनचीही अशीच अवस्था झाली आहे. येथील स्वच्छतागृहांची दारे-खिडक्या गायब झाल्या आहेत. या स्वच्छतागृहांना भगदाडे पडली आहेत. या ठिकाणी सर्वत्र कचराच कचरा पडलेला असतो. क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टची जागाही सध्या धूळखात पडून आहे. पूर्वी महापालिकेचे अधिकारीही येथे खेळायला येत असत; पण आता या कोटची अवस्थाही भयान झाली आहे. त्यामुळे हे अधिकारीही या ठिकाणी येणयाचे टाळतात.

बकोरियांच्या प्रयत्नाने खेळपट्टीचे भाग्य उजाडले

तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या पुढाकाराने गरवारे क्रिडा संकुलातील मैदानाचे रुपडे पालटले होते.‌ त्यांनी रणजी सामन्यांसाठी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली.‌ यासाठी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी तयार करणारे मुंबईचे नदीम मेनन यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. शहरात महानगरपालिकेचे एकच भव्य असे क्रिकेट मैदान आहे. येथे प्रारंभी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा झाल्या. याच मैदानावर सराव करून अंकित बावणे रणजीपटू बनला. मात्र पुरेशा सुविधांअभावी हवे तेवढे खेळाडू तयार झाले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खेळाडू असलेले आयुक्त बकोरिया यांनी गरवारे मैदानाचे रूप बदलण्यासाठी पाऊल उचललेे होते. मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी एक कोटी पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानाची खेळपट्टी तयार करणारे नदीम मेनन यांच्याकडून ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या मैदानावर रणजी सामने भरवण्यासाठी बकोरियांनी पूरेपूर प्रयत्न केले होते. शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रणजी सामने येथे व्हावेत. खेळपट्ट्यांचे काम संपल्यानंतर‌ क्रिकेट संघटनेशी बोलणी करून बकोरिया यांनी पुढाकार देखील घेतला होता. त्यांच्याच काळात मैदानावर मुख्य चार खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.‌ सरावासाठी त्यांच्या दोन्ही बाजूंना सात खेळपट्ट्या म्हणजे एकूण ११ खेळपट्ट्या मधोमध तयार करण्यात आल्या आहेत.‌  कोचसाठी मैदानाच्या चार बाजूंना चार ठिकाणी आठ खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.‌ त्यांचा दर्जाही सराव खेळपट्ट्यासारखा आहे. मैदानात इनडोअर हॉलमध्ये चार खेळपट्ट्या आहेत. त्यात बॉलिंग मशीन, मैदानावर टायमरचे स्प्रिंकलर, स्कोअर बोर्ड, साइड स्क्रिन, सोकर, ग्रासकटर, हँड रोलर, रोप, ड्रेन, पाण्याची  सुविधा त्यांच्याच काळात उपलब्ध झाल्या.

अस्तीककुमार यांचा प्रस्ताव बारगळला

३१ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी गरवारे क्रिडा संकुलाच्या विकासासाठी ६२ कोटी रुपयांची तरतूद करून त्याचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला होता. ऑलिंपिक दर्जाच्या क्रीडा सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती.  जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात हा 'डीपीआर' त्यांनी शासनाला सादर केला होता.मात्र पुढे काहीही झाले नाही. महापालिकेने काही वर्षांपूर्वी गरवारे कंपनीच्या सहकार्याने चिकलठाणा एमआयडीसी परिसरात स्टेडियम विकसित केले. त्याला गरवारे स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. विकास कामानंतर हे स्टेडियम महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आले. या ठिकाणी केवळ क्रिकेट खेळाचीच सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचेदेखील एक स्टेडियम सिडको एन २ परिसरात असल्यामुळे गरवारे स्टेडियमवर क्रिकेटचे सामने फारच कमी वेळा खेळवले गेले. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने हे स्टेडियम सामाजिक, राजकीय उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याला उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आक्षेप घेतला व केवळ क्रीडा प्रकारांसाठीच या स्टेडियमचा उपयोग करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. तेव्हापासून केवळ क्रिकेटचे सामनेच या ठिकाणी आयोजित केले जातात. महापालिकेने याच स्टेडियमच्या परिसरात ऑलिंपिक दर्जाचा पोहण्याचा तलाव तयार करण्याचे काम हाती घेतले होते, पण निधीच्या उपलब्धतेअभावी हे काम बंद पडले.यासह अनेक समस्यांवर "टेंडरनामा " ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर या ठिकाणी क्रिकेटसह अन्य खेळांसाठी सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला होता.

त्यात प्रामुख्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पोहण्याच्या तलावाचे काम पूर्ण करणे, टेनिस कोर्ट तयार करणे, जिम्नॅशियम हॉल बांधणे, इनडोअर गेम्ससाठी विविध हॉल्स तयार करणे, ऑलिंपिक दर्जाचा रनिंग ट्रॅक तयार करणे, टर्फ ग्राउंड तयार करणे अशी कामे केली जाणार होती. या कामांचा डीपीआर तयार करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संदर्भात "टेंडरनामा" अधिक माहिती मिळवली असता, शहरातील अजय ठाकूर असोसिएट मार्फत डीपीआर तयार केला होता. ६२ कोटींचा हा डीपीआर शहर अभियंत्यांना सादर करण्यात आला होता. त्यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. सुधारणांसह तो डीपीआर जानेवारी महिन्याच्या  आठवड्यात तयार केला होता.‌त्यानंतर तो शहर अभियंत्यांच्या माध्यमातून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाकडे सादर केला होता. मात्र गरवारे क्रिडा संकुलाच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला नाही.‌ सुधारीत डीपीआरमध्ये गरवारे स्टेडियमसाठी तीन प्रवेशद्वारांची रचना करण्यात आली होती. क्रीडा प्रकारानुसार प्रवेशद्वार असेल. त्यामुळे खेळाडूला संपूर्ण स्टेडियमला वळसा घालून जावे लागणार नाही. प्रवेशद्वारानुसारच पार्किंगची व्यवस्थादेखील दाखवण्यात आली होती. त्यामुळे पार्किंगच्या जागीदेखील गर्दी होणार नाही असा उल्लेख केला होता.