Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : आमदार, खासदार निधीतील रस्ते धोकादायक; का भडकले महापालिका प्रशासक?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरात आमदार-खासदारांच्या निधीतून कोट्यवधींची सिमेंट रस्त्यांची कामे केली जातात.‌ मात्र, रस्त्याच्या कामात शोल्डर फिलिंग, फुटपाथ, पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था याचा अंदाजपत्रकात समावेश केला जात नाही. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या, फुटपाथचा अभाव आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्याने‌ संपूर्ण शहरात आमदार व खासदार निधीतील रस्ते तकलादू व धोकादायक ठरतात.

शहरातील मनपा हद्दीतील ९ प्रभागातील ११८ वार्डांचा समावेश आहे. मध्य, पूर्व व पश्चिम तसेच फुलंब्री मतदार संघाचा भाग येतो. गेल्या काही वर्षांपासून शहरात प्रत्येक आमदार आणि खासदार निधीतून शहराच्या विविध भागात सिमेंट रस्त्यांची कामे केली जातात. नावालाच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नावावर ही कामे लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांकडूनच केली जातात. दरम्यान या कामात पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था, फुटपाथ अथवा शोल्डर फिलिंग केली जात नाही. काही ठिकाणी जुन्या रस्त्याचा उकरलेला मलबा काम झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला टाकला जातो. पण तो पसरवला जात नाही.‌

त्यामुळे सिमेंट रस्त्याच काम झाल्यानंतर या रस्त्यांवर वारंवार छोटे-मोठे अपघात होतात.‌ काही दिवसांपासून पावसाने या रस्त्याचे नाल्यांमध्ये रूपांतर झालेले आहे. साइड पंखे भरले जात नसल्याने नागरिकांना घरासमोरून सिमेंट रस्त्यांच्या धोकादायक खटक्यांमधून वाहने काढताना दमछाक सोसावी लागते. मध्येच खिंडार आणि फुटपाथचा अभाव असल्याने पादचाऱ्यांना या अरूंद रस्त्यांवरून वाहनाच्या गर्दीतून मार्ग शोधावा लागतो. त्यात रस्त्याचे काम झाल्यानंतर झाडूने रस्ते स्वच्छ केली जात नसल्याने प्रत्येक रस्त्यांवर याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला खड्डे आणि रस्त्यात पाणी साचल्याने वसाहतीतील नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यांची ही अवस्था पाहुण छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी रस्त्याच्या कामातील अंदाजपत्रकात स्ट्राम वाॅटर यंत्रणा, फुटपाथ, शोल्डर फिलिंग या बाबींचा समावेश असला तरच आमदार खासदार निधीतील रस्त्यांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची सक्त ताकीदच त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.