water tank Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कोट्यवधी खर्चूनही आठ दिवसाआड पाणी; महापालिकेने बघा काय दिली कारणे?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : कोट्यवधी रुपये खर्च करूनही छत्रपती संभाजीनगर शहरात काही भागात पाचव्या ते आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे.‌ भर उन्हाळ्यात शहरात दुष्काळाचे सावट पसरलेल आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे "टेंडरनामा" प्रतिनिधीने थेट सवाल केला असता बघा त्यांनी काय कारणे सांगितली, त्याचा हा खास रिपोर्ट...

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी वाढते.‌ प्रत्येक नळधारक मोटारी लाऊन पाणी ओढण्याचा प्रयत्न करतो, काही भागात चढ असल्याने पाणी चढत नाही, अशा भागात १५ ते २० मिनिट पाणी जास्त वेळ सोडावे लागते. शहरातील पाणीपुरवठा योजना ही बायपास पध्दतीची आहे, शहरात साठवन टाक्या कमी आहेत, ज्या आहेत त्यांची धोकादायक स्थिती आहे, त्यामुळे जलसाठा पूर्ण लेव्हलने केला तर टाक्याच कोसळण्याची भीती आहे. शहरासाठी दोनशे कोटीच्या योजनेतील ९०० मिलीलिटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, जलवाहिनी कार्यान्वीत करण्यात आली आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलशुध्दीकरणाला ती जोडण्यात आली आहे.‌त्यातून‌ १५ एमएलडी पाणी वाढल्याचा महापालिकेने दावा केला आहे. मात्र शहरातील वितरण वाहिनी खुप जुन्या असल्याने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत हनुमान टेकडी व टिव्हीसेंटर येथील जलकुंभ मजीप्राकडुन ताब्यात घेण्यात आले आहेत.‌ या महिन्याअखेर पाच जलकुंभ मजीप्राकडुन मिळण्याची शक्यता असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. जायकवाडी धरणात केवळ १४.५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात जपुन पाणी वापरावे, नळांना तोट्या लावाव्यात, पाणी वाया घालवू नये, असे आवाहन देखील अधिकार्यांनी केले आहे. हर्सुल धरणात केवळ सहा फुट पाणी पातळी आहे. सध्या दररोज येथुन ८ ते ९ एमएलडी पाणी उपसा केले जात असून हडको भागातील १४ वार्डांची तहाण भागवली जाते, असे अधिकारी म्हणाले.‌

नवीन पाणीपुरवठा योजनेची अशी आहे स्थिती

छत्रपती संभाजीनगरकरांना भविष्यात पाणी पाजणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे ६० ते ७० टक्के काम झाले आहे. जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी अर्थात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत जॅकवेलचे काम पूर्ण होईल, असे कंत्राटदाराने न्यायालयात शपथपत्र दाखल केल्याचे अधिकारी म्हणाले. नक्षत्रवाडीत एका जलशुद्धीकरण केंद्राचे काम झाले आहे. दुसर्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी मुख्य जलवाहिनीचे ३० किलोमीटरपर्यंत काम झाले आहे.. शहरातील वितरण आणि टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.