छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक-५५ येथील प्रलंबित भुयारी मार्गाचा प्रश्न नुकताच मार्गी लागला. त्यापाठोपाठ आता सातारा-देवळाई अन् बीडबायपासकरांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील देवगिरी महाविद्यालय ते निर्लेप कंपनीलगत बीड बायपासला जोडणाऱ्या रेल्वे रूळावरील उड्डाणपुलासाठी एका पीएमसीची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ५० वर्षापासूनच्या उद्योजकांच्या लढ्याला यश आले आहे. येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी नाशिकच्या ई-कॅमव्हेंचर या पीएमसीची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन एमआयडीसीच्या परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम व्हावे, अशी येथील उद्योजकांची बरिच जुनी मागणी होती. या कामासाठी एमआयडीसी, रेल्वे आणि महापालिका यात दहा वर्षात किमान दिडशे बैठका झाल्या होत्या. मात्र कुणाचाही ताळमेळ लागत नसल्याने या कामाला मुहूर्त लागत नव्हता.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन एमआयडीसीच्या परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रडखडलेले होते. या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मान्यता न दिल्याने या कामाला मुहूर्त मिळत नव्हता. रेल्वे स्टेशन एमआयडीसीच्या परिसरात संग्रामनगरप्रमाणे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव उद्योजकांनी तत्कालीन महापालिका आयुक्त असीम कुमार गुप्ता यांच्यापुढे ठेवला होता. त्यांच्या कार्यकाळात बजाज हॉस्पिटल ते रेल्वे औद्योगिक वसाहतीपर्यंत रस्त्याचे काम करण्यात झाले होते. रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहत आणि बजाज हॉस्पिटलसमोरून रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतीकडे आलेला रस्ता यांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल उभारण्यासाठी तयारी दर्शनली होती. यासाठी रेल्वेकडून २१ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, या निधीच्या दोन टक्के रक्कम महापालिका प्रशासनाने देणे आवश्यक होते. या उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने २३ लाख आणि एमआयडीसी प्रशासनाने २३ लाख रुपये असे एकूण ४६ लाख रुपये दिल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार होता. यासाठी महापालिकेने आपला हिस्सा देण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठरावही पास केला होता. मात्र एमआयडीसी बोर्डाने या प्रकल्पाला खोडा निर्माण केला. त्यामुळे हे काम अनेक वर्ष मागे पडले होते.
बीड बायपासकडे जाण्यासाठी संग्रामनगर हा एकच उड्डाणपूल आहे. बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींचा झपाट्याने विकास होतोय. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी मनपा प्रशासनाने दर्शविली आहे. पुलासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली होती. बीड बायपासकडे जाण्यासाठी रेल्वेस्टेशन, संग्रामनगर, शिवाजीनगर आणि बाळापूर व चिकलठाणा जुना बीड बायपास व सुंदरवाडी कॅम्ब्रिज चौक ते झाल्टा फाटा हे मुख्य रस्ते आहेत. रेल्वेस्टेशन एमआयडीसीमधूनही १०० फुटांचा एक रस्ता बायपासला येऊन मिळताे. मात्र, एमआयडीसी भागात रेल्वे रूळ गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. या ठिकाणी एक उड्डाणपूल उभारला तर देवगिरी महाविद्यालयापासून नागरिकांना थेट बायपासला सहजपणे येता येईल. विशेष बाब म्हणजे दोन्ही बाजूने गुळगुळीत रस्ताही केला आहे. फक्त रेल्वे रुळावरून पूल बांधल्यास नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी दोन्ही बाजूंनी उंच टेकड्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात याठिकाणी पूल होऊ शकतो, अशी टेंडरनामाने ठाम भुमिका मांडत संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून तत्कालीन महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, त्यांनी बायपासला जोडण्यासाठी महापालिकेला सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे शहर अभियंता ए. बी. देशमुख यांना सांगितले होते. विशेष म्हणजे टेंडरनामाच्या पाठपुराव्यानंतर स्वतः तत्कालीन प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जागेची पाहणी केली होती. यावेळी शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपअभियंता संजय कोंबडे यांना प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले होते.यासाठी त्यांनी १५ कोटीच्या निधीची तरतूद देखील केली होती. चौधरी यांच्या बदलीनंतर नवनियुक्त महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी चौधरी यांचा निर्णयाची अंमलबजावणी करत येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाची तयारी दर्शवली होती. त्यांच्या आदेशाने पीएमसीची नेमणूक करण्याषमसाठी टेंडर काढण्यात आले होते. त्यात नाशिकच्या ई कॅमव्हेंचर या प्रकल्प व्यवस्थापन समितीला दहा दिवसात आराखडा तयार करून देण्याचे निर्देश दिले आहेत.