छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील एमजीएम समोरील चिश्तिया काॅलनी ते ओम प्राथमिक शाळा या संपूर्ण रस्त्यावर पाचशे मीटर अंतरात पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी प्रवास करणे धोकेदायक नव्हे तर, जिवावर बेतण्यासारखे झाले आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यातून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तर सोडाच साधी सायकल आणि हातगाडी चालवणे कठीण झाले आहे.
अनेक ठिकाणी या रस्त्याच्या मध्यभागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले असून, यात दुचाकी आणि चारचाकी वाहने आपटून अपघात होत आहेत. असे असताना महानगरपालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यांना वार्ड अभियंत्यांना जाब विचारणेही गरजेचे वाटत नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.
महानगरपालिकेने याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने चिश्तिया चौक ते जकात नाका, आविष्कार चौक ते मथुरानगर चौक तसेच आसपासच्या वसाहतीत सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविले. परंतु एमजीएम समोरील चिश्तिया काॅलनी ते ओम प्राथमिक शाळा हा पाचशे मीटर लांबीचा व नऊ मीटर रुंदीचा रस्त्याचे बांधकाम केलेच नाही. या रस्त्यांसंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर "टेंडरनामा" प्रतिनिधीने त्या रोडचे पाहणी केली.
दरम्यान १८ वर्षांपूर्वी जेव्हा सिडकोचे महानगरपालिकेत हस्तांतर झाले होते. त्यापूर्वी सिडकोकडून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पुढे महानगरपालिकेत हस्तांतरण झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याचे आविष्कार काॅलनी व चिश्तिया काॅलनीतील रहिवाशांनी सांगितले. महानगरपालिकेने १८ वर्ष दुर्लक्ष केल्याने सदर रस्ता 'जैसे थे' त्या परिस्थितीत ठेवल्याने या पाचशे मीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.
एमजीएम समोरून रस्त्यावर खड्यांची मालिकाच सुरू होते. त्यात पावसाळ्यात आणि दररोजचे सांडपाणी वाहून खड्ड्यांत पाणी साचलेले असते. अनेक ठिकाणी खड्ड्यांचा आकार एवढा मोठा आहे की, त्यातून सायकल बाहेर काढणे कसरतीचे ठरत आहेत. रात्री दुचाकीच्या अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणाहून प्रवास करताना जीव मुठीत धरून वाहन चालकांना वाहने चालवावी लागतात.
आसपासच्या शेकडो वसाहतींना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून अनेक रुग्ण उपचारासाठी शहरातील विविध रुग्णालयात जातात. अनेकवेळा गंभीर रुग्णांचा जाताना या पाचशे मीटर अंतराच्या रस्त्यावर उपचाराविनाच मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.