Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : ग्रामपंचायतीच्या लढ्याला यश; अखेर 'त्या' रस्त्याचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ ला जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग - १८ - फत्तेपूर - हिरापूरवाडी- वरूड  मुख्य रस्त्याचे काम साखळी क्रमांक २/६०० ते २/८०० या दरम्यान २५० मीटर अंतरावरील काम ६ शेतकऱ्यांनी जमिनीचा वाद घालत बंद केल्याने या भागातील शेकडो गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती.

यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसिलदार तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांची समजूत काढत अखेर २० दिवसांच्या विश्रांतीनंतर या रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.‌ कंत्राटदाराने गुरूवारी २० जून रोजी धुमधडाक्यात काम सुरू केल्याचे 'टेंडरनामा' पाहणीत आढळून आले.‌ यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता पंकज चौधरी यांनी पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू केल्याचे कंत्राटदारामार्फत सांगण्यात आले.

जमिनीचा वाद घालत रस्त्याचे काम बंद पडल्याने यासंदर्भात ३१ मे २०२४ रोजी सुलतानपूर, हिरापूर, कच्चेघाटी व वरूड ग्रुप ग्रामपंचायतीने तहसिलदारांकडे तक्रार दाखल केली होती.‌ त्यात २९ मे २०२४ रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी देखील तहसिलदारांना पत्र दिले दिले होते.‌ त्यावर ३१ मे २०२४ रोजी तहसिलदारांनी सदर रस्ता हा ३३ फुटाचा शिव रस्ता असल्याचे म्हणत अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकारी नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश दिले.

या आदेशानंतर मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षकांना पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी देखील रस्त्यावर काटेकुपाटे टाकून रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांच्या गैरसोयीत अजून भर पडली होती.‌

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली प्रमुख जिल्हा मार्ग-१८ ते हिरापुर ते वरूड फाटा या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. सुमारे ३० वर्षांनंतर खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या कामास ग्रामस्थांच्या मोठ्या पाठपुराव्यानंतर २०१९ - २० महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थाने एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसहाय्याने या रस्त्यासाठी पॅकेज क्र. ADE AUR. - १३ नुसार दोन कोटी १२ लाख रुपये मंजूर केले होते.

सदर रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा पाच वर्ष कालावधीनुसार १४ लाख रूपये सुरक्षित अनामत रक्कम कंत्राटदाराकडून स्विकारण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला १९ जून २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्याला १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्णत्वाची तारीख देण्यात आली होती. नगरच्या किरण पागोरे यांच्या मे. मनिषा इन्फ्राकाॅम प्रा.लि. या कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र मुदत संपल्यानंतर देखील रस्त्याचे काम अर्धवट होते.‌ सहा शेतकऱ्यांनी हिरापुरवाडी साखळी क्रमांक २/६०० ते २/८०० या दरम्यान २५० मीटर अंतरावरील काम जमिनीचा वाद घालत बंद केल्याने या भागातील शेकडो गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. दुसरीकडे कंत्राटदाराला रस्त्याच्या शोल्डरमध्ये मुरूम टाकता येत नव्हते.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, फत्तेपूर हद्दीतील रस्त्याच्या बाजूच्या सहा शेतकऱ्यांनी जमिनीचा वाद घालत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम बंद केल्याने सुलतानपूर , हिरापूर, कच्चघाटी व वरूड येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांनी तहसिलदारांकडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी साखळी क्रमांक २/६०० ते २/८०० दरम्यान काही जमिनीच्या मालकांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारास काम करू देण्यास विरोध करत आहेत. या शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याने इतर शेतकऱ्यांनी देखील भर रस्त्यात बाभळीचे काट्यांच्या फांद्या टाकून बंद केला असल्याचा उल्लेख केला होता.

हा रस्ता छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सीला जोडणारा मुख्य रस्ता असून तो अचानक बंद झाल्याने आसपासच्या शेकडो ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. तसेच शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची व पालकांची तसेच कामगारांची अडचण निर्माण झाली आहे. रहदारीचा रस्ता असल्याने नोकरदार वर्ग, विद्यार्थी, प्रवासी यांची वर्दळ या रस्त्यावर नेहमीच असते. मात्र हा रस्ता बंद केल्याने सर्वांनाच गावामध्ये जाण्या - येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. गावातील दुग्ध, भाजीपाला व्यावसायिक यांना देखील अडचण निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

संध्याकाळच्या वेळी बाजूने फिरून जाताना अंधार असतो त्यामुळे विद्यार्थिंनी, महिला व जेष्ठ नागरिक यांचेसाठी धोकादायक स्थिति निर्माण झाली आहे. सदर रस्ता मंजूर विकास आराखड्यामध्ये असून ग्रामीण मार्ग क्रमांक - ५४ जुना वहिवाटीचा रस्ता असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे होते.‌ ग्रामपंचातीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसिल कार्यालय, पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी दखल घेत २० दिवसाच्या अवधीनंतर गुरूवारी ता. २० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कंत्राटदारामार्फत काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.‌