Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : गरवारे क्रिकेट स्टेडियम उजळणार; तब्बल 6 कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे गरवारे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष असले तरी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी येथील गरवारे क्रीडा संकुलाचा प्रत्यक्षात कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांनी क्रीडा संकुलाला भेट देत सुविधांची पहाणी केली. राज्यातून अधिकाधिक चांगले खेळाडू निर्माण होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत राज्याचा व देशाचा नावलौकिक व्हावा यासाठी क्रीडा विकासाला महानगरपालिका प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांच्या कामातून दिसून येत आहे.

येथील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर जी. श्रीकांत यांनी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून येथील मैदानात चार ठिकाणी हायमास्ट लावण्याचे काम सुरू केले आहे.

सदर काम हे पुण्यातील विजय पाटील यांच्या सुमी इलेक्ट्रॉनिक कंपनीला सहा टक्के कमी दराने दिल असून, आचारसंहितेपूर्वीच टेंडर काढण्यात आले होते. यासंदर्भात कंपनी, तसेच महानगरपालिकेतील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना 'टेंडरनामा'ने विचारले असता ३८ बाय ३८ लांबी रुंदीत फुटींगचे काम सुरू आहे.‌ त्याची रुंदी ४ मीटर असल्याचे त्यांनी सांगितले. १२ बाय १२ चे पिलर येणार असून, त्याची उंची जमिनीपासून अडीच मीटर असणार आहे.‌ १२ बाय बारा मध्ये हायमास्टसाठी टेम्प्लेट लावली जाणार आहे. बांधकामाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर शहरातील अरूण कानडे यांच्या श्री साई कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.‌

हे बांधकाम झाल्यानंतर ३३ मीटर उंचीचे अर्थात शंभर फुटाहून अधीक उंचीचे जीआय पाईप उभे करून त्यावर एका खांबावर ३४ फिटींग लावल्या जाणार आहेत. त्यात १५०० व्हॅटचे ६८ उर्जा बचत दिवे लावले जाणार आहेत. याकामामुळे आता गरवारे क्रीडा संकुलात रात्रीचे देखील क्रिकेटचे सामने रंगणार आहेत.‌ येथील क्रीडा संकुल विभागीय क्रीडा संकुलापेक्षा अधिक दर्जेदार निर्माण होईल यादृष्टीने ढोबळ मानाने २६५ कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. अद्याप अंदाजपत्रक तयार केले नाही. आचारसंहितेपूर्वी विकास आराखडा व अंदाजित खर्चासाठी प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार अजय ठाकूर व जैसील पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‌

गरवारे क्रीडा संकुलाचा विकास आराखडा अंमलात आल्यानंतर एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेइकल) यासाठी शासनाकडे परवानगी मागितली, पण अद्याप त्याला परवानगी देण्यात आली नाही. आचारसंहितेनंतर यावर विचार होईल, असे महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. क्रीडा संकुलातील मिळणाऱ्या उत्पन्नातून देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडले जाईल व एसपीव्हीलाच त्याचे सर्व अधिकार असतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

पुढील काळात गरवारे क्रीडा संकुलात विविध खेळांच्या ॲक्टीव्हीटीजसाठी कव्हर्ड स्विमिंग पुल, टेबल टेनिस, लाॅन टेनिस, प्रॅक्टीस पिचेस, प्रेक्षक गॅलरी, कॅपीट एरिया, क्रीडा संकुलाच्या दिशेने रस्त्यालगत शाॅपींग सेंटर, असे महानगरपालिकेचे नियोजन आहे. भाडेतत्वावर दिलेल्या दुकानांमधून मिळणारे उत्पन्न क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. असा विकास आराखडा मंजुरीसाठी महानगरपालिकेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे विनंती करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यावर संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाली नाही.

असे मिळवणार उत्पन्न

क्रीडा संकुलात कार्पोरेट बाॅक्स स्टँडचे अधिकार विकून उत्पन्न वाढविणार

कार्पोरेट कंपन्यांकडून सीएसआर फंड प्राप्त करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करणार

कुठल्याही कार्पोरेट बाॅक्समध्ये तिकिट विनामुल्य नसेल

काही क्रीडाप्रेमींसाठी दहा वर्षे राखीव सदस्य ठेवणार

सर्व प्रकारच्या खेळातून उत्पन्न मिळवणार

गरवारे क्रीडा संकुलाचा २७ एकर परिसर आहे.‌ यात अडीच एकर जागेवर एमआयडीसीने कलाग्रामची उभारणी केली आहे. सदर जागा ताब्यात घेण्यासाठी महानगरपालिकेने एमआयडीसी व एमटीडीसीकडे प्रस्ताव दाखल केला आहे.‌ ही जागा ताब्यात आल्यास क्रीडा संकुलाचा विस्तार वाढणार आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वच्छतागृह, जीमखाना, क्लब हाऊस व खेळाडुंसाठी फाईव्हस्टार हाॅटेल्स आदी सुविधा सदर जागेवर उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.‌