G. Shrikant Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : जी. श्रीकांत यांचा धडाकेबाज निर्णय करोडोंचा खर्च वाचविणार का? Tendernama चा खास रिपोर्ट...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन - ५ टाऊन सेंटर परिसरातील छोट्या नालेसफाईला ऐन पावसाळ्यात महापालिकेकडून सुरवात झाली आहे. यामुळे सखल भागात रस्त्यांवर पाणी साचून होणारे संभाव्य कोट्यवधींच्या रस्त्यांचे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. सोबतच सिडको व हडकोतील विकास आराखड्यानुसार सर्वच नाल्यांचा शोध घेऊन ते पूर्ववत करून त्यावर ढापे टाकण्याचे उत्तम काम महापालिकेने हाती घेतले आहे.

'टेंडरनामा'ची भूमिका आणि त्यावर महापालिका प्रशासकांच्या धडाकेबाज निर्णयाने सिडको - हडकोसह संपूर्ण शहरात रस्त्यांच्या कडेला बंदिस्त गटारी अन् त्यावर फुटपाथ बांधले जाणार आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणार असून त्यावर ढापे टाकून फुटपाथ केले जाणार आहेत. त्यामुळे पादचारी व पार्किंगची सोय होईल, रस्ते मोकळा श्वास घेतील, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पावसाचे डाबके रस्त्यावर साचणार नाहीत. डास माशांपासून सुटकारा मिळेल, रोगराई मुक्त शहर होईल,. रस्ते दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत होऊन तो पैसा इतर विकास कामांत वापरता येईल. यामुळेच महापालिका प्रशासकांच्या या ऐतिहासिक निर्णयाने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासकांच्या या निर्णयाचा 'टेंडरनामा'ने घेतलेला खास आढावा.

वास्तवात पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून महापालिकेकडून न चुकता प्रभाग अधिकारी आणि वार्ड अभियंत्यांकडून छोट्या व मोठ्या नाल्यांची सफाई होणे अपेक्षित आहे. मात्र, कारभाऱ्यांकडून या महत्त्वाच्या कामाकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. कॅनाॅट भागातील गटारावरील अतिक्रमणाबाबतची माहिती 'टेंडरनामा' प्रतिनिधीने धडाकेबाज महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली.

यापूर्वी या भागातील व्यापारी संघटना आणि येथील रहिवाशी याकरिता महापालिकेकडे पत्रव्यवहार करून थकले होते. कधीच पावसाळ्याच्या आधी कॅनाॅट परिसरातील बंदिस्त नाल्यांची सफाई होत नसे. परिणामी पावसाळ्यात आणि त्या व्यतिरिक्त इतर दिवसातही डाबके रस्त्यांवर साचलेले असायचे. यंदा मात्र पावसाळ्यात जरी सफाई सुरू झाली असली, तरी या भागातील नागरिक, व्यापारी समाधान व्यक्त करत जी. श्रीकांत यांचे मनापासून आभार मानले आहे.

नवीन शहराचे शिल्पकार अशी ओळख मिरविणाऱ्या सिडकोने १९८५ ते ८६ च्या दरम्यान सिडको एन - ५ टाऊन सेंटर येथे चंदिगडच्या धर्तीवर कॅनाट उद्यान उभारले. उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च निघावा यासाठी उद्यानाच्या चारही बाजूने १३३ गाळ्यांची निर्मिती केली. याशिवाय उद्यानाच्या सर्व बाजूने आर प्लस सी अर्थात निवासी व व्यापारी भुखंडांची निर्मिती करून बहुमजली इमारती बांधल्या.

पावसाळ्यात कॅनाॅट भागातील रस्त्यांवर पाणी साचून रस्ते खराब होऊ नयेत, नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सिडकोने अत्यंत काळजीपूर्वक विकास आराखडा तयार केला होता. जळगावरोड एसबीआय चौक ते चिश्तियाॅ काॅलनी येथील दोन्ही बाजूने चढ उतारावरून येणारे पाणी, तसेच एका बाजूने चढावर असलेल्या अरुणोदय काॅलनी व सह्याद्रीनगर तसेच  सावरकरनगर, मिलनगरातील उतारावरून येणारे पाणी यासाठी प्रत्येक सेक्टरनुसार पावसाळी गटारी तयार केल्या होत्या.

●  यात पहिली गटार चिश्तिया चौक ते शिवा नाष्टा सेंटर ते जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र ते थेट हाॅटेल ॲम्बेसेडर कडून रामा इंटर नॅशनल समोरून जालना रस्त्याच्या भुयारी नाल्यातून हायकोर्ट नाल्यात पाण्याचा निचरा केला जात असे.

● दुसरी गटार जीएसटी कार्यालय ते तुलसी अपार्टमेंट ते बाॅम्बे मर्कंटाईल लगत तयार करून हे पाणी अग्रसेन भवन ते हाॅटेल देसरडाच्या पाठीमागून जालना रस्त्याच्या मधोमध भुयारी मार्गाने सिडको एन - ३ नाल्याला जोडले होते.

● तिसरी गटार जीएसटी कार्यालय कॅनाट गार्डन ते बाॅम्बे मर्कंटाईल लगत गटाराला जोडून पाण्याचा जालना  रस्त्याच्या भुयारी मार्गातील नाल्यानेच पाण्याचा निचरा केला जात असे.

● चौथी गटार एसबीआय बॅकलगत एका व्यापारी संकुलाला वळसा घालत थेट हाॅटेल देसरडा यांच्या हाॅटेल दी वनच्या बाजूनेच जोडली गेली होती.

● याशिवाय सिडको बसस्थानक ते हाॅटेल ॲम्बेसेडर दोन्ही बाजुने येणाऱ्या नाल्यांचे पाणी देखील हाॅटेल दी वनच्या मागच्या बाजूने जोडले गेले होते. एकूणच सर्व भागातील पावसाचे पाणी एकत्रित जमा करून हाॅटेल दी वनच्या मागच्या बाजूने असलेल्या खुल्या नाल्याद्वारे जालना रस्त्याच्या भुयारी नाल्यातून सिडको एन - ३ ते जयभवानीनगर ते विमानतळ एसटीपी असा या पाण्याचा प्रवास होता.

कालांतराने सिडकोचे सन २००६ मध्ये महापालिकेत हस्तांतर झाल्याने रस्त्याच्या कडेला  असलेल्या पावसाळी गटारी नाल्यांना बंदिस्त केले गेल्याने त्यांचा संकोच झालेला आहे. यामुळे मोठा पाऊस आला तर खालच्या भागातील दुकाने आणि घरात थेट पाणी शिरते. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत.

याशिवाय रस्तेच पाण्यात बुडाल्याने वाहनचालक व पादचारी साऱ्यांचीच आबाळ उडते. शहरात गत दहा वर्षांपासून सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरले जात आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजुला पावसाळी पाण्याच्या गटारी केल्या जात नाहीत. फुटपाथ तयार केले जातात. पण माणसांसाठी तयार केलेल्या फुटपाथवर वाहनांचा बाजार उभा केला जातोय.

रस्त्यांच्या दुतर्फा पावसाळी गटारी आणि त्यावर ढापे टाकून फुटपाथ तयार केल्यास खालून रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा आणि रस्त्यांचा पृष्ठभाग खराब होऊन रस्तेही खराब होणार नाहीत. याशिवाय फुटपाथवरून पादचाऱ्यांची सोय होईल, अशी भूमिका 'टेंडरनामा'ने सातत्याने मांडली.

याच भूमिकेचे महापालिका प्रशासकांनी स्वागत केले. जी. श्रीकांत यांच्या आदेशाने  महापालिकेने कॅनाॅट भागात प्रायोगिक तत्वावर बंदिस्त नाल्या उकरून त्यांच्या सफाईचे काम सुरू केले आहे. मात्र, आता याकरिता आसपासच्या नागरिक व व्यापाऱ्यांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे. यात महापालिकेला सहकार्य केले तर, शहरातील रस्त्यांची दुर्दशा होणार नाही, खालून गटार वरून फुटपाथ अशी टू इन वन व्यवस्था होईल.

रस्त्यांच्या दुरूस्तीचा खर्च वाचेल व हा खर्च इतर विकास कामात वापरता येईल. रस्त्यांवरती वाहतूक कोंडी होणार नाही. कॅनाॅट भागातून या चांगल्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. अजून सिडको - हडकोसह जुन्या शहरात बऱ्याच ठिकाणी ते होणे बाकी आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गरज पडेल तेव्हा मदत पुरविण्याची तयारी उद्योजकांनी देखील सीएसआर  फंडातून करणे गरजेचे आहे. शहरातील  पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी देखील सेवाकर वेळेवर भरणे आवश्यक आहे.