छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) : G-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाच्या येण्या - जाण्याच्या मार्गावर महावितरण कंपनीने एक कोटी ८६ लाख रुपये खर्च करून विद्युत रोहित्रांची बकाली झाकण्यासाठी ऐतिहासिक गड किल्यांच्या लुक देणाऱ्या काॅंक्रिट भिंतीचे सुरक्षा कवच उभारले. मात्र सध्या अनेक भागात हे सुरक्षाकवच कोसळलेले दिसत आहे. दुसरीकडे ठेकेदारांनी रोहित्रांचा परिसर स्वच्छ न करताच भिंती उभारल्याचे दिसून येत आहे.
संभाजीनगर शहरात विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी गत तीन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू होती. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच महावितरण प्रशासनाने देखील चिखलठाणा विमानतळ ते नगरनाका, सिडको बसस्टॅन्ड ते हर्सुलनाका, हर्सुलनाका ते महावीर चौक, रेल्वेस्टेशन व इतर मार्गांवर १०७ विद्युत रोहित्रांची निवड केली होती. त्यासाठी प्रशासनाने एक कोटी ८६ लाख रुपये खर्च केले. उघड्या रोहित्रातील घाण, गवत व रानटी झुडपे आदी बकाली झाकण्यासाठी ऐतिहासिक गड किल्यांच्या लुक देणाऱ्या आकर्षक भिंती उभ्या केल्या. त्यासाठी आवश्यक बाब म्हणून विनाटेंडर काही मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देण्यात आली.
मात्र एकदा काम झाल्यावर पैसा खिशात पडला अन् ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी याकामाकडे दुर्लक्ष केले. परिणामी महिनाभरातच भिंतीच्या वर खाली कचऱ्याचे ढिग साचले असून बऱ्याच ठिकाणी भिंती पडू लागल्या आहेत. त्यामुळे तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून महावितरण कंपनीने जनतेच्या खिशाला झटका देऊन विदेशी पाहुण्यांच्या स्वागतापुरताच हा भूलभूलैय्या उभा केला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.