AC Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : परवानगी नसतानाही AC च्या हवेने सरकारी अधिकारी चिल!

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : एकीकडे हलकासा पाऊस झाला, थोडे वारा वादळ आले तरी विजेचे संकट शहरात निर्माण होते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असल्याने काही भागात वीज कपात देखील केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात वीजेअभावी उद्योजकांना झळ सोसावी लागत आहे. ग्रामीण भागात तर एकदा गूल झालेली विज कधी परत येईल, याची शाश्वती नसते. वीजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. याशिवाय ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांना वीजेचे हे संकट सामान्य वाटत आहे.

बहुतांश अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांचा आदेश पायदळी तुडवत दिवसाढवळ्या एसी सुरू असतो. प्रत्यक्षात मुख्य सचिवांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कुठल्याही अधिकाऱ्याला एयर कंडीशन यंत्रणा बसविण्याची परवानगी नाही, असे असताना शहरातील बड्या बड्या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत आपापल्या कार्यालयात एयर कंडीशन यंत्रणा बसविली आहे. परिणामी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांचे आदेश कागदावरच राहिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात येणाऱ्या सामान्य जनतेला धड छतावरच्या पंख्याची सुविधा नाही. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सामान्य जनतेला लाइनीत काही तास उभे राहावे लागते.
या संदर्भात सामान्य जनतेशी टेंडरनामाने संवाद साधला असता बड्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात एअर कंडिशनची हवा खात आहेत. मात्र आम आदमीसाठी छतावरचे पंखे तर सोडाच साधी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची देखील सोय नसल्यामुळे जीवाचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात एअर कंडीशन लावल्याने वीजेचे बिल दुप्पट वाढत आहे. यात जनतेच्या कष्टाच्या घामाच्या कोट्यवधी रुपयांना चुना लावला जात आहे. यासंदर्भात टेंडरनामाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, की ज्या कार्यालयात मीटर लावलेले आहेत, त्यांनी जितकी वीज वापरली तितके बील आम्ही वसुल करतो. मीटरचा लोड कमी जास्त झाला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जेवढी वीज खर्च केली गेली, तितके बिल आम्ही संबंधित ग्राहकाकडून वसुल करतो.

यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शहरातील छावा संघटनेचे किरण काळे यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.‌ आता विभागीय आयुक्त चुकीच्या पद्धतीने लावले गेलेले एसी उतरवतात की जनतेच्या पैशाला चूना लावणारा हा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असाच चालू ठेवतात.

प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

अनेक सरकारी बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात नियम धाब्यावर बसवत वातानुकूलीत यंत्रे (एसी) बसविली आहेत. यामुळे कार्यालयांच्या वीज बिलांत भरमसाठ वाढ झाल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. टेंडरनामाशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारी अधिकाऱ्यांच्या दालनात एसी बसविण्याबाबतच्या राज्य सरकारने २५ मे २०२२ रोजीच्या परिपत्रकात नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार अधिक वेतनश्रेणीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनांत वातानुकूलीत यंत्रे बसविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यंत्र खरेदी करणे, बसविणे व त्यासाठी येणाऱ्या वीज बिलाचा खर्च संबंधित विभागाने त्यांना मंजूर असलेल्या अनुदानातून भागवावा, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. 

राज्य सरकारच्या या परिपत्रकानुसार, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम व जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी तसेच त्यांच्या पेक्षा वरिष्ठ असणारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य अभियंता, पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आपल्या दालनात एसी बसवू शकतात, असा दावा काळे यांनी केला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात एसी बसविले असून, परवानगी नसतानाही एसीमुळे सरकारी तिजोरीला चूना लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे मागणी

अधिकार नसतानाही एसीचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी तातडीने काढावेत. तसेच ती बसविण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून संबंधितांकडून वीज बिलाचा खर्च वसूल करावा, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण काळे पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या कारभाऱ्यांचा मनमानी कारभार

सर्व सरकारी कार्यालयात तसेच गोदावरी पाटबंधारे महामंडळात काही कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या दालनात अनधिकृतपणे एसी बसविली आहेत. एका कार्यकारी अभियंत्याच्या दालनात दोन एसी आहेत. छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांचे स्वीय सहायक असणाऱ्या अधिकाऱ्याच्या दालनाची शोभा एसी वाढवित आहे. जिह्यातील काही तहसीलदार, उपजिल्हाधिऱ्यांनी देखील रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एसीच्या थंडगार हवेत कामकाज करीत आहेत.