Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अधिकाऱ्यांच्या टक्केवारीत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट; व्यापाऱ्यांची आता मनपावारी

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार होत असल्याची नागरिकांची कायम ओरड आहे. विशेष म्हणजे, नुकताच बांधकाम करण्यात आलेला रस्ता जुन्या मोंढ्यातील शशी अगरबत्ती ते दुर्गा ट्रेडर्स या १२० मीटर‌ इतक्या छोट्याशा लांबीत तयार झालेल्या काँक्रिट रस्त्याबाबत मोंढ्यात चर्चेला उधाण आले आहे. अधिकाऱ्यांच्या टक्केवारीत तयार झालेल्या या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी आता मनपावारी सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपा हद्दीत विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी मिळतो. त्यामुळे बहुतांश प्रमाणात रस्त्यांची कामे झाली. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाने अधिकाऱ्यांची  टक्केवारी उघड केलेली आहे. अशाच एका रस्त्यासाठी मनपा फंडातून १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातून जुना मोंढा येथील एका रस्त्याचे काम आठ दिवसांत उरकण्यात आले. १५ लाख रुपये किमतीच्या १२० मीटर लांबीचा रस्ता शशी अगरबत्ती ते दुर्गा ट्रेडर्स पर्यंत करण्यात आला आहे. मात्र, ज्या पध्दतीने रस्त्याचे काम करण्यात आले आहे, त्याचाच दर्जा खालावलेला आहे.

संबंधित कंत्राटदाराने जेसीबीच्या पात्यांने जुना रस्ता स्कॅरीफ्राय करत त्यावर अत्यंत कमी जाडीचा बेड काॅंक्रिटचा थर टाकत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. आधी कुठल्याही पध्दतीने रस्त्याची लेव्हल केली नाही, दबाई केली नाही, परिणामी, रस्त्याचे काम निकृष्ट केले गेले. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइड पंखे न भरल्याने बाजारात येणारी वाहने पलटी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाय त्यात पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खटक्यांमधून वाहने आत - बाहेर करताना होणारा त्रास टाळण्यासाठी ग्राहक व व्यापारी रस्त्यातच वाहने उभी करत असल्याने रस्त्यावर वाहनतळ झाले आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे काम निकृष्ट झाल्याने आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्हाला मनपा वारी करावी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून मोंढ्यातील या महत्वाच्या रस्त्याचे काम रखडले होते. इतक्या वर्षांनंतर रस्ता झाला. मात्र आता अधिकाऱ्यांच्या टक्केवारी मुळे कंत्राटदार बी. के. कन्सट्रक्शन कंपनीने मनपा निधीतून केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तेच ते चौकशी पथक वगळून आय. आय. टी. अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रण व दक्षता पथकामार्फत रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत व्यापाऱ्यांना मनपा वारी करायची वेळ आली आहे.

नुकत्याच तयार झालेल्या या रस्त्यावरून उतारावरील माती वाहून येत दुर्गा ट्रेडर्स समोरील नव्या रस्त्यावर साचत आहे. शिवाय पावसाच्या पाण्याचा देखील निचरा होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली आहे. व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून या रस्त्याच्या बांधकामाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करून त्यामध्ये चार इंच जाडीच्या दगडांचा अर्धा फूट थर टाकून त्यावर थोडा मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते. नंतर त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचा थर टाकण्यात येतो, परंतु असे न करताच  कंत्राटदाराने चक्क डांबरीकरणाचा जुना रस्ता पूर्ण न खोदता खडीकरण व मजबुतीकरण न करता आहे त्याच रस्त्याचा बेस वापरून त्यावर आधीचा बेड काॅंक्रिटचा थर टाकून अंतिम सिमेंटचा थर टाकून दोन थरात आठ दिवसांत रस्त्याचे काम संपविले.

अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आले नाही. त्यात चार इंच जाडीच्या दगडांच्या अर्धा फुटाच्या थराला बगल देण्यात आली असून, या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या शाखा अभियंत्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.