sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाईपांची जाळपोळ सुरूच; मजीप्रा, कंत्राटदार मात्र गाढ झोपेत

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावल्यामुळे बाजूला पडून असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपांना पुन्हा आग लागल्याची घटना बुधवारी 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आली आहे. मात्र याबाबत मजीप्रा, कंत्राटदार व महानगरपालिकेला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसते.

याठिकाणी संपूर्ण रस्त्यावर कचरापट्टी झालेली आहे. येथे दररोज पाईपांवर कचरा टाकला जातो व आग लावली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत येथे जवळपास दीडशे पाईपांचा खच पडला आहे. काही पाईप जमिनीत गाडले गेले असताना जीव्हीपीआरचा कंत्राटदार आणि मजीप्रा निद्रीस्त का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील आयटीआय - एमआयडीसी अधिकारी - कर्मचारी वसाहतीच्या मार्गावर कचरा पेटविल्यामुळे बाजूला पडून असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपांना आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आली.आयटीआयच्या सुरक्षाभिंतीलगतच कचऱ्याचे डोंगर जळत असताना त्याखाली पाईप जळत असल्याचे दिसून आले.

सध्या शहरात केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेतून २७४० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरात ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी शहरभर पाईप ठेवण्यात आलेले आहेत. सर्वत्र या पाईपवर कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत.

यापूर्वी रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्याने शेकडो पाइप जळून खाक झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. असे असताना मजीप्रा आणि जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून दखल घेतली जात नाही.

बुधवारी आयटीआयच्या सुरक्षा भिंतीलगत  कुणीतरी कचरा पेटविला. त्यामुळे जवळच ठेवलेल्या अमृत योजनेच्या पाईपांना आग लागली. हा प्रकार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याही लक्षात येत नाही. त्यावर पाण्याचा मारा देखील केला जात नाही.

येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना नेहमी आग लावली जात असल्याने इतर पाईपांना देखील धोका पोहोचण्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिवाय आसपास सरकारी कार्यालय आणि औद्योगिक क्षेत्र असल्याने धोका निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.