Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर प्रशासनाला जाग आली; भावसिंगपुरा स्मशानभूमी रस्त्यासाठी 7 कोटींचा निधी

Road Work Tender : स्मशानभूमी रस्त्याची दुरवस्था दूर; ७ कोटींच्या निधीने कामाला सुरवात

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुरा परिसरातील साई कम्पाऊंड - स्मशानभूमी - स्लाटर हाऊस या रस्त्याचे डांबर गायब होऊन कच्चा मातीचा रस्ता तयार झाला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे व त्यात दर पावसाळ्यात पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत असे‌. त्यातच वाटेतच स्मशानभूमी असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील माजी नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मनिषा लोखंडे यांनी केली होती. याबाबत ‘टेंडरनामा’ने ही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.

भावसिंगपुरा परिसरातील साई कम्पाऊंड ते सार्वजनिक स्मशानभूमी ते स्लाटर हाऊस या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांंमुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते. पावसाळ्यात तर रस्ता असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली होती.  खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. १९८२ च्या दरम्यान भावसिंगपुरा या गावाचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता. मात्र गत ४२ वर्षांपासून महानगरपालिकेने थातूरमातूर दुरुस्तीकरत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील स्थानिक नगरसेविका मनिषा लोखंडे यांनी गत दहा वर्षांपासून महानगरपालिका प्रशासनाकडे लाऊन धरली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत लोखंडे यांनी अनेकदा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. प्रशासनावर पत्रांचा आणि स्मरणपत्रांचा भडीमार करत जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मात्र प्रशासनातील कारभाऱ्यांकडून दखल घेतली जात नव्हती.

अखेर लोखंडे यांनी ‘टेंडरनामा’कडे या रस्त्याबाबत कैफियत मांडली होती. 'टेंडरनामा'ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने सदर रस्त्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीने या जवळपास चार किलोमीटरच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जीवन खडतर असते तर मृत्युमुळे सगळ्या त्रासातून सुटका होते असे म्हटले जाते, मात्र मृत्युनंतरही ही वाट बिकटच राहिली तर काय करावे? अशीच काहीशी वेळ भावसिंगपुरा परिसरातील नागरिकांवर आली होती. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत कमरेएवढ्या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागत असे. आधीच स्मशानभूमीची झालेली दुरवस्था, त्यातच रस्त्यांची दयनीय स्थिती आणि यातच या मार्गावर वाढलेला शेकडो वसाहतींचा विस्तार, यामुळे स्मशानातील ओट्यांपर्यंत पोहचण्याची वाटच बंद झाली होती.

पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यावरच साचत असल्याने अत्यंत कसरतीने मार्ग काढावा लागत असे. महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ४२ वर्ष या रस्त्याच्या पक्क्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले होते.

थोड्याशा पावसामुळे हा मार्गच बंद होऊन अंत्यविधीसाठी नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत जावे लागत असे. या मोठ्या पावसाने रस्त्यासह स्मशानभूमीला देखील पाण्याचा वेढा पडत असे. गत अनेक वर्षांपासून अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांची पाणी, चिखल आणि खड्ड्यांमुळे वाट अडविले जात असे. मात्र अधिकवेळ थांबणे कठीण होत असल्याने नागरिक जीव धोक्यात टाकून कसरतीने मृतदेहासह पाण्यातून मार्ग काढीत अंत्यविधी पार पाडत असत.

स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने व आहे तो मार्ग अत्यंत अरुंद व चिखलाचा असल्यामुळे या रस्त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. या मार्गावरील नदी नाले आणि ओव्हळलगत पुलांचीही पडझड झाल्याने पुलांवर पावसाचे पाणी वाहत असे, त्यातून अंतविधीसाठी नातेवाईक जीव धोक्यात घालून मार्ग काढत असत. अन्य नागरिकांना मात्र दूरवरच थांबावे लागत असे. या स्थितीबद्दल माजी नगरसेविका मनिषा लोखंडे यांनी अनेकदा प्रशासनापुढे संताप व्यक्त केला होता.

महानगरपालिका कारभाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

चारशे वर्षांपूर्वींची पुरातन हेमाडपंथी मंदिरांची ख्याती असलेल्या भावसिंगपुरा परिसरात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या भागातील लोकसंख्या वाढली. तरीही गावातील स्मशानभूमीची अवस्था अजूनही दयनीय आहे. दोन वर्षांपूर्वी दानशूर गणेश लोखंडे यांच्या मदतीने स्मशानातील ओट्यांची दुरुस्ती केली गेली. यानंतर पत्रे बदलले गेले. मात्र महानगरपालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले होते. लोकसहभागातून केलेली तात्पुरती डागडुजी फार काळ टिकली नाही.

गावापासून स्मशानभूमी पर्यंतचा  रस्ता पूर्णपणे उखडला होता. या भागात जमिनींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी मनिषा लोखंडे यांनी केल्या होत्या. त्यावर 'टेंडरनामा' वृत्तमालिका आणि लोखंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर सात कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचा कायापालट होत आहे. आता स्मशानभूमीकडे देखील महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी लोखंडे यांची मागणी आहे.