Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar: 'या' स्मारकाच्या सुशोभिकरणातही खाबुगिरी

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) :  सातारा गावठाणातील ऐतिहासिक हेमाडपंथी खंडोबा मंदिर मार्गावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोरील सुशोभिकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु हे कामे योग्य आणि पारदर्शी पद्धतीने होत नसल्याची तक्रार सातारा येथील ग्रामस्थांनी 'टेंडरनामा'कडे केली. या कामांविषयी तक्रार प्राप्त होताच प्रतिनिधी गावात जाऊन बारकाईने पाहणी केली असता तक्रारीत तथ्थ असल्याचे दिसून आले.

आमदार संजय शिरसाट यांच्या स्थानिक विकास निधीतून हे काम होत आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. त्यानुसार सुयोग्य पध्दतीने निधीचा वापर केला गेला पाहीजे. मात्र संबंधीत ठेकेदाराने संरक्षण भींत बांधताना जुन्या संरक्षण भिंतीवर काँक्रिटच्या भिंतीचे बांधकाम केले आहे. मुळात पायापासून असलेल्या संरक्षण भिंती या वरील बांधकामाला मजबूत ठेवण्यासाठी आहेत. मात्र यापुर्वी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या जुन्याच भिंतींवर कॉंक्रिटच्या भिंती बांधत आहेत. जुन्याच भिंतींवर पुन्हा दीड मीटर उंचीच्या भिंती बांधल्या जात असल्याने सुशोभिकरण कामाची शोभा घालवली जात आहे.

शिवाय जुन्या ठिसूळ आणि जीर्ण झालेल्या भिंतीवरच नवीन भिंतीचा लोड वाढून त्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासमोरील या कामाची सुरुवातच ठेकेदाराने खाबुगिरी पासून केलेली आहे. स्मारक सुशोभिकरणाची मुख्य कामे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामे न केल्यामुळे सातारकरांमध्ये नाराजी आहे.