somthana Tendernama
मराठवाडा

Sambhajianagar : राज्यभरात प्रसिद्ध 'या' देवस्थानाची वाट कधी होणार सुसाट?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. मात्र डोंगरकड्यावर वसलेल्या या देवीच्या रस्त्याची बिकट वाट होती. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून गडावरील रस्त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांची वाट सुसाट होणार असल्याचे चित्र आहे. मात्र कंत्राटदारामार्फत अतिशय कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची गावात चर्चा सुरू आहे. निदान पावसाळ्यापूर्वीच कंत्राटदाराने काम मार्गी लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.‌

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. नवरात्रोत्सवास भाविकांनी दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होते. दरम्यान, संस्थानकडून‌ नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. डोंगरावर श्री रेणुका देवीचे मंदीर आहे.

या डोंगरावरील देवीकडे जाण्यासाठी यापूर्वी एकच रस्ता होता. परंतु ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जैस्वाल व सर्व विश्वस्तांनी पुढाकार घेवून आमदार नारायन कुचे यांच्याकडे पर्यायी घाट रस्ता करण्यासाठी पाठपुरावा केला होता. कुचे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. २१८४ मीटरचा या घाट रस्त्याचे काम चालू झाले आहे. दुधनवाडी फाटा ते गडापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. एकाच रस्त्यावर भाविकांची गर्दी होत होती. अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. याशिवाय एकच रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये. व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी रस्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .

सद्यस्थितीत उपलब्ध असलेला सोमठाणा फाटा ते रेणुकागड हा रस्ता अरूंद असल्यामुळे अनेक वेळा येथे वाहतूककोंडी होत होती. यासाठी दुधनवाडी ते समृध्दी महामार्गाच्या पुलाखालून थेट देवीच्या गडापर्यंत डांबरी रस्ता करण्यात येत असल्याने बदनापूर शहरासह तालुक्यातील सैय्यदपूर, औरंगपूर, लाडसावंगी, अकोला, निकळक, गेवराई, देमणी वाहेगाव, सागरवाडी, ठासला, शेकटा, करमाड  व पंचक्रोशीतील शेकडो गावकऱ्यांची वाट सुसाट होणार आहे.

जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणी सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता विजय राठोड यांनी सांगितले. या रस्त्याच्या दर्जाबाबत टेंडरनामाने ग्रामस्थांशी चर्चा केली असता बदनापूरचे कंत्राटदार गोविंद रानड यांना हे काम भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ पठाडे यांच्या पाठपुराव्याने‌ मिळाले असल्याची माहिती मिळाली. कंत्राटदारामार्फत पावसाळा तोंडावर असताना कासवगतीने काम सुरू असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. सुरवातीला थातूरमातूर खोदकाम करून खडी व मुरुमाच्या दोन लेअर टाकल्या मात्र ग्रेडींग मशीनने रोलींगने दबाई केली नसल्याने व त्यावर पाणी मारत नसल्याने भाविकांना धुळफेकीचा त्रास सोसावा लागत आहे. 

कंत्राटदाराने नावाला एकदोनदा पाणी मारले.‌ रस्त्याची ग्रेडरने देखील लेव्हल केली नसल्याने चालू कामावर खड्डे पडल्याचे पाहणीत समोर आले आहे. जेसीबीने खडी पसरवल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. हा रस्ता दर्जेदार आणि लवकर मार्गी लावला तर गेवराई बाजार, ढवळापूरी, रामवाडी, गाढे जळगाव, फेरण जळगाव, शेक्टा, कुंभेफळ, करमाड आदी ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल असे ग्रामस्थांनी सांगितले. यासंदर्भात भाजपचे जालना जिल्हा अध्यक्ष बद्रिनाथ पठाडे यांच्याशी संपर्क केला असता निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे ते म्हणाले.‌ दुसरीकडे कंत्राटदार गोविंद रानडे व अभियंता राठोड यांना विचारले असता रस्त्याचे काम दर्जेदार होणार आहे, नैसर्गिक पध्दतीने वाहनांकडून दबाई केली, तर काम चांगले होते. अद्याप काम संपलेच नाही, मग काम निकृष्ट कसे, असा दावा करत त्यांनी ग्रामस्थांनी केलेले आरोप फेटाळले. यापुढे नियमित काम सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.