Aurangabad Tendernama
मराठवाडा

पटेलनगरमधील नागरिकांना 40 वर्षांपासून तुडवावा लागतोय चिखल; कारण...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका हद्दीतील चिकलठाणा भागातील पटेलनगर, सावित्रीनगर आणि हिनानगर या किमान दहा हजार लोकवस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरक्ष: चिखलवाट झाली आहे. याभागातील रहिवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चिखल तुडवत आणि खड्ड्यात गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मागील ४० वर्षांपासून रस्त्याचा हा प्रश्न कायम आहे. परंतु, याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देताहेत, ना महापालिका प्रशासन!

लोकवर्गणीतून बुजवतात खड्डे

या भागातील बहुतांशी लोक कामगार आणि मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवतात. आपापल्या सोयीनुसार दर चार - सहा महिन्यांनी वस्तीतून लोकवर्गणी जमा करतात आणि रस्त्यावर माती - मुरूम टाकून खड्डे भरतात.

चिकलठाण्यातील जालनारोडच्या उत्तरेला वाय झेड फोर्डच्या आलीशान शो रूमच्या पाठीमागून बबनराव ढाकणे विद्यालयाला वळसा घालत सरासरी तीन किलोमीटर पेक्षा जास्त या रस्त्याची लांबी व पाच मीटर रूंदी आहे. तीन वसाहतींसह चिकलठाण्यातील शेतकऱ्यांचा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्ताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय पुढे सावंगी बायपासकडे जाताना देखील याच रस्त्याचा वापर होतो. चिकलठाणा जालनारोड ते सावंगी बायपास अवघ्या १० मिनिटात पार होणाऱ्या रस्त्यावर दीड तास लागत आहेत.

खड्डे, पाणी अन् अंधार

या रस्त्यावर तीन ते चार फुटांचे खोल खड्डे पडले आहेत. त्यात पाण्याचे तलाव साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना तीन किमीची ही चिखलवाट तुडवत शाळा गाठावी लागते. एवढेच नाहीतर, पावसाळ्यात वसाहतीत दुचाकीही जात नाही. त्यामुळे कोणी आजारी पडले तर त्यांना बाजेवर टाकून जालना रस्त्यापर्यंत आणून मग पुढे दवाखान्यात न्यावे लागते. मृतव्यक्तीची देखील हीच अवस्था आहे, असे असतानाही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही राजी नाही.

आश्वासनांचे गाजर!

प्रत्येक वेळी महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आश्वासन दिले जाते. परंतु, निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी फिरकत देखील नाहीत. आजवर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कुणीही केली झाली नाही. मध्यंतरी निवडणुकीच्या काळात बागडे यांनी देखील रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काम झालेच नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.