Ellora Tendernama
मराठवाडा

'या' निर्णयामुळे अनुभवता येणार कैलास लेण्यांचे अद्भूत रुप

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : वेरूळ (Ellora) येथील कैलास लेणी ही अद्वितीय वास्तू आहे. कैलास लेणी वरच्या बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना (Tourists) ती अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती होईल. त्यासाठी कैलास लेणीच्या पर्वतावर एक रस्ता करण्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Indian Archeological Department) विभागाकडून तयार करण्यात आला असून, वर्षभरात या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी केला आहे.

आफ्रिका, तामिळनाडू आणि वेरूळ अशा जगभरात तीनच ठिकाणी कैलास लेणीसारखे एका दगडातील शिल्पाचे कोरीव काम झाले आहे. त्यापैकी भारतात मराठवाड्यातील वेरूळ येथील कैलास लेणी ही जगात सर्वात मोठी आहेत.

हे कळसापासून पायापर्यंत कोरीव शिल्प आहे. डोंगरावरून पाहिल्यावर या जागतिक वारसा स्थळाची खरी अनुभुती पहायला मिळेल व हे जागतिक वारसा स्थळ का आहे, या प्रश्नाचे उत्तर पर्यटकांना सापडेल. कैलास लेणीचे विहंगम दृश्य न्याहाळता यावे यासाठी वरच्या बाजूने बघण्यासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी वरच्या बाजुला जाण्यासाठी सध्या एक पाऊलवाट आहे. मात्र ती फारशी सुरक्षित नाही. त्याच पाऊलवाटेचे रूंदीकरण करून तिथे रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच वेरूळ लेणीची पाहणी केली होती. त्यांच्या या धावत्या दौऱ्यात येथील प्रस्तावित कामावर चर्चा झाली. त्यानुसार नियोजित कामे वर्षभरात मार्गी लागतील, असे चावले यांनी सांगितले.

'महाराष्ट्र दिना'पासून पर्यटकांसाठी ई-बस

- वेरूळ लेणीतील बॅटरीवर चालणाऱ्या बसेस १४ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र अजूनही या बसच्या तपासणीचे काम सुरू आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून बसेस सुरू होतील, अशी शक्यता आहे.